रविवार, १९ एप्रिल, २०२०

Home qurantine

मागे - पुढे

18.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग पंचवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो.  आज नळाला पाणी आले. तशी काल रात्रीही गरम्यामुळे नीट झोप लागली नाहीच. डोळा लागला तर भयानक स्वप्नं पडले. खालच्या रस्त्यावरून सुमारे तीस फूट उंचीच्या घोडयावरून  पप्पू चाललेला आहे. त्याच्या हातात तलवार आहे. मी व सौ. दक्षिण दिशेच्या दरवाजात बसलेलो  असतो. मला पप्पू सांगतो की अरे मुंबईला बघ काय चाललंय ते . दंगा उसळलाय . तो पूर्वेकडे बोट दाखवतो तसा मी धावतच पुढच्या दारात येतो. पूर्वेकडच्या डोंगरावरून तलवारी घेऊन काही लोक धावतींना दिसतात .  खरे तर , मुंबई आमच्या उत्तरेला आहे , हे माझ्या पूर्वेकडे पाहतांना लक्षातच आले नाही. 

            आज विशेषत: मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्या स्वप्नात दंगा दिसला होता , तोच तर हा कोरोनाचा कहर नाही ना ? कोरोनाचा दंगाच. पुण्यातही आज कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. कालचा दिलासा आज क्षणभंगूर ठरतो आहे.   लोकांचे नको ते गूण मात्र फारसे कमी झालेले नाहीत.  अजूनही लोक गर्दी करतातच.  अजूनही अवैधरित्या जात आहेत. गर्दीमुळे कोरोना प्रसारक मोकळे फिरत आहेत. एक कोरोनाबाधित पोलीसच मुंबईतून सोलापूरात गेल्याने तिकडे प्रसार वाढला. आपण आपले सैन्य कमकुवत करीत चाललो आहोत. वैद्यकीय , पोलीस आणि सैन्यदलातही कोरोनाचा शिरकाव होतो आहे. आपण आपल्याच सुरक्षा व्यवस्थेला भगदाड पाडत आहोत. सतत बेशिस्त टारगटांना शिस्त लावणा-या पोलीसांवरच हात उगारला जातोय.  संचारबंदी काळात रस्त्यावर हिंडणारे हे बेभान हजारो देशद्रोही गेली काही वर्षे सतत पोकळ देशभक्तीचा डंका पिटणा-यांना दिसत नाहीत का ? ते देशभक्तीवाले लोक आज कुठे आहेत ? आजही भारतीय लोकशाही मतांच्याच विकासाभोवती फिरते आहे आणि लोकशिक्षणाचा विकास शुन्याकडे सरकतो आहे. संस्कृतीच्या उच्चतेचे डंके पिटून उपयोगी नसते , ती योग्य प्रकारे प्रत्यक्षात आचरणात दिसावी लागते. 

             विचार करून मन थकले आणि जेवणानंतर झोपी गेले. संध्याकाळी स्नेहा, क्रांती आणि कलू आते आली. तेव्हा मी खालच्या बागेत झाडे शिंपायला गेलो आणि थोडया वेळाने सौ.सुध्दा गप्पा आटोपत्या घेऊन बीनाच्या आईकडे गेली. काही दिवसांपूर्वी रात्री बीना येवून आमच्याबरोबर बोलत बसली होती. तेव्हा त्यांच्या भावकीत पिशाच्च फिरत राहिल्याने कोणीच सुखी नाही असं काही तरी ती म्हणाली. त्यावर , तुमच्या भावकीत लोक एकमेकांवर खूप जळतात, तेच खरं पिशाच्च आहे , असं स्वाभाविकपणे व सरळ मनाने मी बोललो. थोडयाच वेळात ती येते म्हणून सांगून निघून गेली. तेव्हापासून ती आलेलीच नाहीय. बीनाचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा आहे. ती लवकर त्यातून बाहेर पडावी, हीच सदिच्छा. 
         


                मी पाणी शिंपत होतो आणि सौ. बीनाकडे होती त्यादरम्याने राजूच्या बायकोचा फोन येवून गेला होता. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. मी दिवाबत्ती व प्रार्थना करून झाल्यानंतर सव्वासात वाजता तो मिसकॉल पाहिला. मग दोघांना फोनवरूनच शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे जाऊही शकत नाही. राजू बराच वेळ बोलत होता. जुन्या आठवणी निघाल्या. तेव्हा ही मुलं बरेचदा आमच्याकडेच असायचीत. तेव्हा भावना प्रबळ होत्या , आता व्यवहार प्रबळ झाले आहेत. माणसाचे माणसाकडे हक्काने जाणे येणे आता होत नाही. आता माणसांमाणसांत भिंती निर्माण झाल्या आहेत. कोरोना ही परिस्थिती बदलण्यासाठी तर आला नाही ना ? किमान हया भिंती तुटण्याची नांदी ठरू दे , या माझ्या शब्दांनी आमचा संवाद संपला.  नंतर रात्र झाल्याने मागची पुढची दारे बंद करून आम्ही कोरोना पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन होऊन गेलो.
          

( क्रमश: )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: