गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

Jugglery of corona virus

मागे - पुढे

22.04.2020

                  आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणतीसावा दिवस. काल संपूर्ण रात्री दोघांनाही झोप आली नाही. लादीवर झोपूनही उपयोग झाला नाही. पंखा आणि गूड नाईट मँट लाऊनही नाईट काही गूड झाली नाही. तिकडे पुण्यात मुलगा वर्क फ्राँम होम करतोय. अजूनही त्याला रात्रीचेच संगणकावर काम करावे लागते आहे.  रात्री दीड वाजता मुलाला फोन केला , तर तो काम सांभाळून चक्क जेवण बनवत होता ! अर्थात , त्याला जसे जमेल तसे ! कोरोनाने सगळे वेळापत्रकच बदलून टाकले आहे. पहाटे कधी तरी थोडा वेळ डोळा लागला असावा. कारण स्वप्नं पडले . स्वप्नात एका फळयावर भावाने एक कोडे तयार केलेले होते व मुलगा ते सोडवत होता. भाऊ त्याला काही तरी क्ल्यू देणार तोच मी बोलतो की थांब , तू काही सांगू नकोस. त्याचा तोच सोडवू दे. तो ते सोडवीलच. इथपर्यंत सारे नाँर्मल होते. पण दुस-याच क्षणी भावाच्या ठिकाणी मला चक्क देव श्रीकृष्ण हसतांना दिसतो. तोच निळा सावळा, घनश्यामल कृष्ण आपला ! मी कौतुकाने त्याच्याकडे बघत असतांनाच मला जाग आली. चुकचुकल्यासारखे झाले. स्वप्नात का होईना पण साक्षात श्रीकृष्णाशी बोलायची संधी हुकली होती ! जवळजवळ रात्रभर झोप लागली नसतांनाही मी सवयीने सहा वाजता उठलोच. पावणेसात वाजता पाणी आलेच. मी पाण्याची व्यवस्थित व्यवस्था लावली आणि पिंपळपानांकडे वळलो. 

         काल संध्याकाळी खालच्या अंगणात फिरतांना सौ. ने पिंपळपाने खुडून आणली होती. रात्रीच पाण्यात भिजत ठेवली होती. मी ती सकाळी उकळत ठेवली. उकळल्यावर नीट झाकून ठेवली. ही उशिरा उठणार हे नक्कीच होते. तिला सहाच्या दरम्यानच झोप लागली होती. मी तिला स्वत:लाच उठायला द्यायचे ठरवले व इतर कामांकडे वळलो. मागच्या दारावर सगळे संत्याबंत्या आपापल्या उद्योगात मग्न होते. नुकताच सत्त्या जयच्या घराचे बांधकाम शिंपून बंदूच्या घरात शिरतोय. त्याच्याकडे चहापाणी , गप्पाटप्पा होतील. त्यात लमाने , विसू व विकूही यथावकाश सामील होतील . मी मागचा दरवाजा बंद करून पुढे आलो. अंगणात आलो . खालच्या दिशेने मासळी बाजार पूर्ण जोरात आहे. कोरोनाची कुठलीच वार्ता तिथे नसावी असे निदान जे दिसते आहे त्यावरून म्हणता येते. दुपारपर्यंत बीना दोनदा येऊन हिला भेटून गेली. आम्ही जेवतांना तिस-यांदा येऊन गेली. मध्येच चार दिवस ती एकदाही आली नव्हती. तिचे मूडस् वारंवार बदलतात. हे दुष्टचक्र बराच काळ सुरू आहे. सगळयांना तिची काळजी वाटते. जेवतांना घासाबरोबर बातम्याही गिळाव्या लागतात. जेवल्यानंतर मी लिहीत बसलोय. ही वामकुक्षी करतेय. थोडया वेळाने मीही जरा लवंडलो. चार वाजले तोच हिच्या दूरच्या दुर्मिला मावशीचा डोंबिवलीहून फोन आला. त्या अर्धा तास बोलतच होत्या. 

             चहापानानंतर बातम्या लावल्या. अजूनही संचारबंदीत माँर्निंग वाॅक प्रकरण सुरू आहे. लोक खरेदीसाठी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत धावत आहेत. हे सर्वसामान्य लोक इतक्या संख्येने कायदे धुडकावून का लावत आहेत ? कोरोनासोबत एक वर एक मोफत असे काही पँकेज तर आलेले नाही ना , जे सर्वसामान्य जनतेच्या मेंदूवरच आक्रमण करून त्यांना विचित्र वागायला लावेल  ?  अन्यथा ही माणसे अशी वागलीही नसती कदाचित. कोरोनाचे हे काही गौडबंगाल तर नाही ना ? शेवटी हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर ताबा मिळवण्यासाठीचे काहींचे कारस्थान तर नाही ना ? उत्तर कोरियाच्या जोनच्या बातम्याही येत आहेत. ते आणखीच वेगळे प्रकरण निघण्याची शक्यता आहे. तिकडे अमेरिका चीनवर उशिराने आरोप करते आहे आणि चीनही पलटवार करतो आहे. हे काय गौडबंगाल आहे ? भारतातही एकमेकांकडे बोटे दाखवण्याची परंपराच आहे. जगभर मरणारे सर्वसामान्य लोक उल्लू बनत आहेत का ? कोरोनाने असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत व छोटयाश्या खेडयात बसून मी त्याबाबत विचार करतो आहे ! मी बातम्या बंद करून झाडे शिंपायला आलोय. आज पाणी भरपूर मिळाले.  मनसोक्त पाणी शिंपले. बरे वाटले . आज भावाच्या घरात झोपायला जायचे रद्द झाले आहे. आजही उकाडयाने झोप आली नाही तर उद्या तिकडे एसीचा गारवा घेत झोपायचा विचार आहे. बरेच महिने एसी लावलेलाही नाहीय. तो लावला पाहिजे. बघू उद्या काय काय होते ते. आता रात्रीचे अकरा वाजत आले आहेत. मुलाला फोन करून झाला आहे. तर आजपुरते थांबू. उद्या भेटूच. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. तुमच्या घरातच थांबा आणि हो, उद्याही तुमच्याच घरी थांबून कोरोनाला घालवा. 


( क्रमश: )

     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: