मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

News are not good

मागे - पुढे

21.04.2020

               आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अठ्ठावीसावा दिवस.  काल रात्री दहा वाजता पुढच्या अंगणात पाणी मारलेले. थंडाव्यासाठी. खूप उकाडा आहे. रात्री बेडवर झोपच येईना. अंग भाजून निघू लागले. शेवटी एक वाजता खाली लादीवर झोपलो. थोडे बरे वाटले पण पुरेशी झोप मिळालीच नाही. पहाटे आम्हां दोघांनाही एकाच वेळेस स्वप्नं पडत होते. गंमत म्हणजे आम्ही प्रवासात होतो. ही तर कर्नाटकात पोचली होती.  मला स्वप्नातले स्थळ काही समजले नाही. आम्ही एकदम जागे झालो तेव्हा पहाट झाली होती.  जराशी झोप लागली नाही तोच सहा वाजले. जाग आलीच. पण पडून रहावेसेच वाटले. नशीब,  सहापस्तीसला धडपडत उठलो. पाण्याची वेळ झाली होती. पावणेसातला पाणी आले. ते भरले. पाण्याची टाकी कालच खाली करून ठेवली होती. ती काठोकाठ भरली. पाणी गेले. 

                 पाणी गेले तसा मी खालच्या कंपाऊंडमधल्या पिंपळाच्या छोटया झाडाकडे वळलो. गेल्या तीन चार महिन्यांपासून पिंपळाच्या पानांचा रस प्यायचा हे आमच्या कुटुंबाने ठरवलेले होते. पण काही ना काही होऊन हा कार्यक्रम पुढेच जात होता. प्रत्येक घटनेची वेळ यावी लागते हेच खरे ! (माझ्या  dehpatilbestwords या ब्लाॅगवरील  What will happennext या लिंकवर what will happen  next ही पोष्ट वाचा ).  तर पिंपळपानांचा रस घेण्याची वेळ आज आली. मी आठ पाने आणून ती पाण्यात उकळत ठेवली. नंतर सौ.ला उठवले. थोडया वेळाने पिंपळपानांचा तो रस प्यालो. चव थोडी ओळखीचा वाटली. कुठल्या तरी काढयासारखी. कोणत्या तरी काढयात पिंपळपाने घातली जात असणारच. आता पंधरा दिवस दररोज पिंपळपानांचा रस प्यायचा आहे.  अकरा वाजता सौ. मिलेशच्या बाईकवरून शहरात गेली ती एक वाजता आली. औषधे व थोडा जिन्नस घेऊन आली. आज मंगळवार. आज शाकाहारीच जेवण.  मी बराचसा शाकाहारीच आहे. अधूनमधून मांसाहारही करतो. दुपारी वाट्याण्याची आमटी मस्त झाली. थोडा भात जास्त खाल्ला. हल्ली आम्ही चपात्या सकाळी नाश्त्यालाच खातो. बातम्या पाहवत नाहीत , ताण येतो. त्यातही काही लोक त्यांच्या सोईचे राजकारण करीत आहेतच. लाखो लोक जगात मरत आहेत. जगातच नव्हे तर आपल्या दारात मरत आहेत. पण काहींना या वेळीही राजकारण केल्याशिवाय चैन पडत नाही. राजकारण ही दारू झाली असावी आणि हे पक्के बेवडे झाले असावेत, अशी अवस्था आहे. जुनेच पत्ते पुन्हा पुन्हा टाकून काहीच साध्य होत नाही , त्यामुळे ते अधिकच वेडे होत आहेत. बातम्यांनी ताण वाढवला तरी पुण्यामुंबईच्या बातम्या बघाव्याच लागतात. मुंबईत भाऊ आणि इतर नातेवाईक व मित्र आहेत , पुण्यात तर मुलगा आहे . मुलगा राहतो ते घरमालक आहेत. परिस्थिती निवळून निदान तीन मे नंतर तरी पुण्याला जायला मिळू दे, या विचारातच आम्ही जेवलो. जेवण तसे वेळेवर झाले . दुपार असल्याने तापमान खूपच वाढले आहे. वामकुक्षीला पाठ लादीवर टाकली तर बेडरूममधली लादीही गरम लागत होती. अवकाळी पाऊस आसपास  घोटाळतो आहे. साडेतीन वाजता हिला स्नेहाचा फोन आला. सुरूवातीचा विषय कधीच बाजुला पडून उखाळयापाखाळ्यांचे विषय सुरू झाले. मी अधूनमधून मुद्याचे बोला, मुद्याचे बोला , असे टोकूनही काही उपयोग झाला नाही. त्यांनी अर्धा तास चैत्रीच्या दिवशीचा एकच विषय चघळला . शेवटी त्या थांबल्या. नंतर आम्ही चहा घेतला. तोपर्यंत पावणेपाच वाजले. 

          मी पुढच्या दारी पायरीवर बसलो . लेखन केले. नंतर झाडांना पाणी दिले. आज दिवसभरात बीना तीनदा येऊन गेली. काय करायचं या मुलीचं ? घडीत असं बोलते, घडीत तसंं बोलते. हीचे भवितव्य काय ? काळजी वाटते. ती ख-या अर्थाने मूळ विषयातून बाहेर पडत नाही तोपर्यंत कोणीच काही करू शकणार नाही , हे खरे आहे. संध्याकाळी लंबूवहिनी आणि एक काकी येवून गेली. बाकी कोणी विशेष असे आले नाहीत. गेला तासभर बातम्या बघतोय. पुणे शहर संपूर्ण सील केले आहे. तरी लोक चक्क माँर्निंग वाॅकला रस्त्यावर येत आहेत. पोलीस वेगवेगळ्या शिक्षा करीत आहेत. आता अश्यांचे पार्श्वभाग सुजवण्याबरोबरच त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमीचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे, असे दिसते. हे काही विशिष्ट विचारधारेचे लोक तर नाहीत ना ? हे तपासले पाहिजे. संचारबंदीलाच त्यांचा विरोध नाही ना ? हजारोंनी माणसे बाधित होत असतांना हे लोक स्वत:च्याही जीवावर इतके उदार का होत आहेत ? हे तपासावे लागेल.  केवळ हिंडणे हा हेतू फारसा पटण्यातला दिसत नाही.  महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात यावर नियंत्रण ठेवावेच लागेल. या विचारातच आज जेवण न घेता दूध बिस्कीटस् खाऊन आम्ही अंगणात शतपावली करू लागलो आहोत. अजून कोणी बोलायला आले तर ठीकच , नाही तर अकरा वाजता बेडरूमच्या लादीवर अंग टाकूच. थोडक्यात, रात्रीची बात उद्या ! भेटूच तर ...उद्याही !


( क्रमश: )









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: