रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

स्फूट लेखन ६

 जीवन शिक्षण


शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात. संवाद, वादविवाद आणि मग वाद होतात. स्थानिक राजकारण आणि समाजकारण यांचे व्दंव्द यात हिरीरीने भर घालते. शैक्षणिक विकास हा विषय कधीच गायब होतो. उरतात ते आरोप प्रतीआरोप आणि वैयक्तिक हेवेदावे ! सामाजिक विषय वैयक्तिक पातळीवर हमरीतुमरीवर येतो. पूर्ण वेळ शाळा अर्धवेळ होत होत अखेर बंद होते. पिक्चर संपता संपताच पुन्हा सुरू होतो. पालक मुलांना दुसऱ्या शाळेत घालतात. तिथेही शिक्षणाची हेळसांड होते असे वाटून शिक्षण समिती जन्मते. सभा होतात... पूर्णवेळ.. अर्धवेळ.. .. होत....तीही शाळा अखेर बंद होते आणि हाच पिक्चर ठिकाणं बदलून चालूच राहतो ! पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१


.................

जलद, विश्वसनीय सेवा...जगभर


मुंबईहून आठ तारखेला कुरीयर केलं गेलं. केल्याची कुरीयरवाल्याची स्लीप मला कुरीयर करणाऱ्याने लगेच व्हाॅटस अॅपवर पाठवली. कुरीयर किमान तिसऱ्या दिवशी येणे अपेक्षित होते. तीन दिवस फोनवर नकारघंटा ऐकून चौथ्या दिवशी कुरीयर आॅफीसलाच गेलो. तिथल्या माणसाला स्लीप दाखवली. म्हटलं आज चौथा दिवस उजाडला. एक लखोटा यायला एवढे दिवस लागतील असं वाटतं नाही. तसा आतला दुसरा माणूस बोलला , लखोटा आहे का, मला पार्सल बोलले होते. लखोटा बघतो हा. मी आशेने हो म्हणालो. पण दोन मिनिटे शोधून तो मान हलवत नाही म्हणाला. मी निराश ! तसा पहिल्या माणसाने मुंबई आॅफीसला फोन लावला. स्लीपचा फोटोही व्हाॅटस अॅपवर पाठवला. मुंबईवाला बोलला बघून सांगतो. मी म्हटलं आम्ही सांगून बघितलं, तू बघून सांग ! मी थांबतो. पंधरा मिनिटे झाली तसा समोरचा माणूस बोलला, तुमचा नंबर द्या, मी फोन करतो. नंबर देतांना माझं लक्ष समोरच्या बोर्डाकडे गेलं. त्यावर जाड ठसठशीत ठळक अक्षरात छापलं होतं : जलद, विश्वसनीय सेवा...जगभर ! मी जग विसरून जलदगतीने घर गाठलं !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

विषय कट !


पोरं कसली तरी वर्गणी गोळा करीत होती. नेमके त्याचवेळी त्यातल्याच कुणाच्या तरी मोबाईलवर गाणे सुरू होते : " तुझ्या नामाचा व्यवहार ..." . विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१२.०२.२०२१ 

.................

देवळासाठी निधी संकलन


काही वर्षांपूर्वी गावातील देवळासाठी निधी संकलन करीत होतो. मी देवळाच्या शेजारीच राहतो. शेजारधर्म म्हणून मीही पावती पुस्तक घेऊन शहरात गेलो. ओळखीचे लोक भेटत होते. कोणी पावती फाडत होते, कोणी बहाणे सांगून सटकत होते. एकाने कहर केला. तोही ग्रामीण भागात राहणारा होता. त्याचं गांव तर अवघ्या दहा किमी वर होतं. गावातली परिस्थिती त्याला चांगलीच माहिती होती . त्यामुळे मला वाटलं तो चांगलीच पावती फाडेल. मी देवाचे आभार मानले. झालं भलतंच. तो म्हणाला, " मी राहतो दहा किमी वर. तुमच्या गावच्या देवळाचा मला काय फायदा? मी तर तिकडे कधी येत पण नाही. " आणि तो निघून गेला. अवघ्या दहा किमी अंतरावरच्या माणसाची ही कथा !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१३.०२.२०२१

.................


बाबू, ये पब्लीक हैं !


मांजर भलेही चोरून दूध पितांना डोळे झाकत असेल; पण ते दूध पितानाचा चपाचपा किंवा पचापचा येणारा आवाज काही थांबवू शकत नाही. जग उघड्या डोळ्यांनी ( आणि कानांनी पण ! ) बघते ! बाबू, ये पब्लीक हैं , सब जानती हैं ! बोलो हैं ना ...?


   अरे हो, 💞💞 हॅपी व्हॅलेंटाईन डे !💕💕


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०२.२०२१

.................

गांवपॅनेल : लोकशाहीची नवी दिशा


नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी गांवपॅनेल्सनी बाजी मारली. गांवपॅनेल्सचा हा प्रवास राजकीय पाठिंब्यावर की अराजकीय लोकमतातून झाला हे पाहणे आवश्यक आहे. राजकीय पाठिंब्यावर निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्या व पूर्णत: अराजकीय लोकमतातून निवडून आलेल्या गांवपॅनेल्सची संख्याही अभ्यासली जाणे आवश्यक आहे. गांवपॅनेलला विरोध झाला का आणि झाला तर तो पक्ष , काही राजकीय / अराजकीय लोक की दोन्हींकडून झाला , हे पाहणेही आवश्यक आहे. तसेच गांवपॅनेल्सच्या पुढील प्रवासाबाबतही विचारमंथन झाल्यास ते महत्त्वाचे ठरेल. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०२.२०२१

...................

जया

आज त्याची आठवण आली. सुधरीन वहिनी सौ.ला कुवरी खातेस काय म्हणून विचारत होती. जया अशाच कुवऱ्या विकायला यायचा. तो माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. जया घरंदाज कुटुंबातला मुलगा. केवळ दारू प्यायला पैसे हवेत म्हणून दारोदारी कुवऱ्या विकायचा. माझ्या लग्नापूर्वीची ही सत्यकथा आहे. अखेरीला त्याची हालत बघवत नव्हती. दारूने त्याला पोखरलं होतं. खूप वाईट वाटायचं. आम्ही कधी कधी कुवऱ्या घ्यायचो. तो मागेल ते पैसे द्यायचो. जया ढोल खूप छान वाजवायचा. पण शिमग्यात ढोल वाजवण्यावरून त्याच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या. खरं तर तेव्हा माऱ्यामाऱ्या हा ट्रेंडच होता. आता बरीच सुधारणा झाली. जया आता असता तर सुधारला असता का, हा विचार मनात येतो. 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०२.२०२१

...............


आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

काही वेळा आपल्याला चांगली परिस्थिती मिळते. तिचा उपयोग जीवन अधिक चांगले करण्यासाठी आपण किती करतो, हे महत्त्वाचे ठरते. आपले जीवन इथून पुढे सुखी झाले पाहिजे, ही आपली प्रामाणिक ईच्छा असली पाहिजे. यासाठी वास्तवतेने विचार केला पाहिजे. मिळालेल्या छान परिस्थितीचा लाभ कसा घ्यायचा हे लक्षपूर्वक तपासले पाहिजे. आताची एक चूक सुंदर वर्तमान आणि भावी जीवन , दोन्हीही उध्वस्त करू शकतात.‌ इथे भावनेने नव्हे तर वास्तव विचार केला पाहिजे. असे केले तर काय होईल, तसे केले तर काय होईल, हे कागदावर निरपेक्षपणे मांडले पाहिजे. उत्तर मिळेल. वास्तव निर्णय घेतला तर आहे ती परिस्थिती आणि पुढचीही परिस्थिती चांगली राहीलच. पुढचे आयुष्य अधिक सुंदर होईल. आयुष्य तुमचे ; निर्णयही तुमचाच ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०२.२०२१

...............


मी नाही त्यातली ....


सार्वजनिक अव्यवस्थेबद्दलचा काहींचा पुळका हा तात्कालिक विरोधासाठी किंवा फायद्यासाठी असू शकतो. सोयीस्कर असू शकतो. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे ! अगदी नालायक कार्टे ! अंदरकी बात अशी असते की त्याच नालायक कार्ट्याशी विरोधकांची आतून व्यावसायिक भागीदारी पण असू शकते ! म्हणजेच साळसूदपणे वरून कीर्तन, आतून तमाशा ! त्यामुळे विरोधही , खबरदारी घेऊनच , तुटणार नाही अशा पद्धतीनेच होतो. कारण दोघांची लफडी दोघांना माहीत असतात. तंगडयात तंगडी, लंगडयात फुगडी चालतेच ! मी नाही त्यातली , कडी घाला आतली , यातलाच हा सोज्वळ प्रकार ! आता भ्रष्टाचार निर्मूलन कसे करायचे ब्बा ! 😃😄😃😄 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०२.२०२१

..............

देवाक काळजी 

हतबल सामान्य माणूस देवाक काळजी असं म्हणून सगळं देवावर सोडून देतो आणि देव म्हणतो, ही तुझी लढाई आहे, तू लढ ! वर फळाची (म्हणजे जिंकण्याचीही) ईच्छा धरू नकोस असं सांगतो ! काय करावं बा, चांगल्या सामान्य माणसांनी ?


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

...............

एका लग्नाला गेलो होतो. कोरोनाची दाट छाया कुठेही जाणवत नव्हती. सोशल डिस्टंसिंगवगैरे काही भानगड नव्हतीच. काहींनी मास्क घातले होते. काहींचे मास्क गळ्यात टांगलेले होते. काहींनी नियमानुरूप ठेवले होते. महिलावर्गाची काहीशी गोची होत होती. मास्क सौंदर्याला मारक की तारक हा त्यांच्याबाबतीत संशोधनाचा विषय होता. लग्नं लागलं . आईस्क्रीम आलं. त्यासरशी माझ्यासहीत होती तीही मास्क गळ्यात आलीत. विषय संपला !

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

................

२५.०२.२०२१

वाह वाह वाह....सगळेच शेर अप्रतिम...

किती खुल्या मनाची असतात नाही माणसं ! पटकन दाद देऊन मोकळी होतात.‌ ही खरी माणसं.‌ शेर पूर्ण व्हायच्या आधीच ह्यांची दाद पूर्ण झालेली असते. कवी महाराजांनाही आता सराव झालेला असतो आणि ते उफाळून येऊन कविता सादर करीत असतात. तेव्हाही त्यांच्या मनात आपल्यालाही दुसऱ्या कवींना अशीच दाद द्यायची आहे हा एकमेव उदात्त विचारच असतो. 

हा त्याला म्हणतो, तो हयाला म्हणतो . दोघांनाही दाद हवी, दुसरे काय ? ते ठराविक वर्तुळातले ' अखिल विश्व एकमेकांची पाठ थोपटू ' मंडळातले कवी असतात. त्यांची पाठ थोपटायला कोणी येतच नाहीत. मग कवी तरी काय करणार ! हा कवी असो वा तो कवी असो ; शेवटी कवीला दाद तर हवीच असते ना मित्रांनो ! देव जसा भावाचा भुकेला असतो तसा कवी (पित्ताच्या नव्हे !) दादीचा भुकेला असतोच की ! 

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२५.०२.२०२१

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

मागे पुढे पुन्हा एकदा

 ०९.११.२०२०


गेले २ - ३ दिवस राकेश तसा झालाय. 


शेवटच्या गझलकाराच्या गझला , परिचय , फोटो म. नानिवडेकरांकडे आजच पाठवल्या. 


सायं. ०६.३७ ला सुनील आडीवरेकरचा सावंतवाडीहून फोन आला. भाऊ सुधीर व दोन मित्र असे चौघेजण उद्या रत्नागिरीत व आमच्याकडेही येणार आहेत.


अरविंद ग्रील बसवायला आज येणार होता. आला नाही.‌ फोन करून उद्या यायला सांगितले. 

........


१०.११.२०२०


स. ०९.३० वा. सुनीलला फोन केला तर त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने सुधीर येत नाही व सुनील आत्ताच मित्रांसह निघाल्याचे कळले. 


संध्या. ०४.३० वा. अरविंद व पब्यादादा चंदरकर ग्रीलचे साहित्य घेऊन आले व अंगणात ग्रील तयार करू लागले. 


.....तोच सुनीलची गाडी आली. सावंत , कंग्राळकर हे सावंतवाडीचे व मागाहून आलेले टाकळे मिऱ्याचेच असे चौघेजण आले.‌ एल एम एल बिझीनेस. नो इंटरेस्ट.


११.११.२०२०

काल रात्री एक गझल सुचली. पण मधल्या एका शेराची दुसरी ओळ स्फुरली पण दुसरी समर्पक ओळ येईना. अखेर आज सकाळी ती ओळ सुचली. 


काल सतीश टोपकर आमच्याकडे येणार होता तो आला नव्हता. खालच्या अंगणात ठेवलेल्या वाळूच्या २८ पिशव्यांपैकी ०२ कमी झाल्याचे लक्षात आल्याने सतीशला त्याच्या माणसांकरवी त्या आमच्या अंगणात ठेवायला सांगितले होते. आता हे नोंदीत असतानाच सतीश त्या पिशव्या हलवतोय. सकाळचे १०.२० झाले आहेत. तेव्हढ्यात उदू आलाय.‌ दिवस पुढे सुरू झाला आहे.


दुपारी जेवणाच्या वेळी समोर लक्ष गेले. तीन तरूण बंगल्याच्या रहाटाजवळ दिसले. कदाचित भैय्या भाभी सोडून गेल्याने रिकामा झालेल्या बंगल्यात काॅलेजकुमार रहायला येणार असतील किंवा ती मालकाची मुलेही असतील, असा विचार करून मी किचनकडे वळलो. 

संध्याकाळी केस कापायला गावातला मुलगा आला. मी केस कापून घेतले. उद्या सौ. ते रंगवणार आहे. केस कापले जातांना कडीपत्ता न्यायला विकास आला. त्याला 

विचारले तर बंगल्यात नवीन कोण रहायला येणार हे त्यालाही माहिती नाही म्हणाला.


संध्याकाळी पुढच्या दारी पायरीवर मोबाईल बघत बसलो होतो तर क्रांती आली. ती स्वत:च म्हणाली की ती बंगल्यात रहायला येतेय. म्हणजे लवकरच आमच्या शेजारी क्रांतीपर्व सुरू होणार...

........


१२.११.२०२०


आज वसुबारस. 

सकाळी स्वप्नं पडले. मी व नार्वेकर एका काॅलेज हाॅस्टेलमध्ये आहोत. आणखी तीन चार जणही आहेत. ते फिरायला जाणार आहेत. तत्पूर्वी नार्वेकर मला संगणकावर महाकोष दाखवण्यासाठी संगणक सुरु करीत असतात. मी पासवर्ड नीट बघून ठेवला पाहिजे, हे बाहेर गेले की पंचाईत नको, असा विचार करतो. प्रोग्रामच्या टचमध्ये राहिले पाहिजे, असे मी बोललो तर तेही म्हणाले की , नाही तर विसरायला होतं. तेवढ्यात दोन काॅलेजकुमारी काही तरी विचारतात. मी त्यांना तुम्हाला तिकडे रुम दिली आहे असे समोर बोट दाखवून सांगतो. इथेच स्वप्नं संपते. 



आज सकाळी सौ.ने माझे केस काळे केले. 



आज‌ मुलाने मला नवीन शर्ट आणला आणि हिच्यासाठी दोन साड्या आणल्या. तीनही सुंदर आहेत. मुलाने स्वत:ला मात्र सांगूनही काहीच घेतले नाही. त्याचा मूड नाही हे मला कळते आहे. पण मी काही करू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. आयुष्यात कधी नाही तेवढा मी हताश झालो आहे. काळाच्या मनात काय आहे ते कळत नाही. आज मी तुम्हांला काही सांगू शकत नाही.



आज क्रांती बंगल्यात येईल असे वाटले होते पण अजून तरी कुठे जाग नाही. 



दुपार झाली. अरविंद अजून तरी आलेला नाही. संध्याकाळी तरी येतोय का ते बघू. 



अरविंद आला नाहीच. पण संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बंगल्यात झाडलोट सुरू झाली. सतरा तारीखच्या आत रहायला येणार असं क्रांती माझ्या सौ.ला म्हणाली . 


.................


१३.११.२०२०


सकाळी ०७.३० वा. अरविंदला फोन केला. तो थोड्या वेळाने येतो म्हणाला. तासाभरात जोशी , चौगुले व अरविंद पण आला. आज दिवसभरात दुसरे ग्रील तयार होऊन दोघांनाही रंग पण काढून झाला. साडेपाच वाजता ते तिघेही निघून गेले. उद्या दिवाळी आहे. परवा येतो म्हणाले. 


संत्याने दोन्ही घरात आकाश कंदील लावून दिले.‌


स्वाती वहिनीने घरातली सगळी लादी पुसून काढली व ती गेली.  सौ.ने व मी पणत्या लावल्या. दोन्ही घरातील आकाश कंदील पेटवले. दरवर्षीप्रमाणे आम्ही लायटींगही केली आहे. पण खरं सांगू, आमच्या मनालाच उजेड हरवलाय. आताही रात्री साडेनऊ वाजता मुलगा गाडी घेऊन बाहेर गेला. बाहेर जातोय हे सांगितले पण आता रात्रीचा कुठे जातोयस विचारले तर जाऊन येतो म्हणाला आणि निघून गेला. मुलाचं हे विक्षिप्त वागणं आम्हां दोघांनाही अनाकलनीय झालंय. तो वीस मिनिटात परत आल्याने आमच्या जिवात जीव आला.‌



१४.११.२०२०


काही विशेष नाही.


१५.११.२०२०


आज दिवाळी. लक्ष्मीपूजनही. 


पहाटे स्वप्नं पडले. मी एका घरात पहिल्या मजल्यावर खिडकी जवळ खुर्चीत बसलेला. समोर कोणी तरी आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो तर रिक्क्षाजवळ उभा असलेला रिक्षा ड्रायव्हर अगदी ओळखीचा असल्यासारखा मला हात दाखवून हसतो.‌ दुसऱ्याच क्षणी तो अनोळखी असल्याचे लक्षात येऊन मलाच विचित्र वाटते. मी खुर्चीतून खाली बसतो. पण तरीही तो मला दिसत असतो व त्यालाही मी दिसत असतो. तो पुढे येऊ लागतो. मी मान आणखी खाली घालतो. तो पुढे येऊन सांगतो की साॅरी हा, मला माझ्या ओळखीचेच वाटलात... म्हणून मी हात केला. त्यालाही आता ओशाळवाणे वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.‌ इथे स्वप्नं संपले.




१६.११.२०२०


बंदूचे व त्याच्या वहिनीचे जोरदार भांडण झाले. सौ.चे आजारपण, मुलांचा गंभीर होणारा प्रश्र्न या पार्श्र्वभूमीवर एकूणच सगळे कठीण बनले आहे. 


 २७.११.२०२० ला तुळशी विवाहादिवशी अशोक व गार्गी आली.  


२९.११.२०२० ला अशोकच्या कारने वेंगुर्ल्याला गेलो.१.१२.२०२० ला सकाळी सावंतवाडीला गेलो.

वीस दिवस तिकडेच होतो. मुलांचे वर्क फ्राॅम होम सावंतवाडीतूनच चालू होते. सौ.च्या पायदुखीमुळे तिथल्या एका डाॅक्टरने तिच्या पायातून रक्तही काढले. नासके रक्त आहे म्हणाला.


मध्येच एक दिवस वेंगुर्ल्यात खवणे बीचला  पेडणेकर व हडकर फॅमिली बरोबर जाऊन आलो. तिथेही मुलाचा व सौ.चा खटका उडालाच.


वीस दिवसांनी घरी आलो.


२१.१२.२०२० पासून मुलाचे वर्क फ्राॅम होम नवीन बांधलेल्या वरच्या माळ्यावर सुरू झाले. 


२१.१२.२०२० ला बावादादा आला.


२५.१२.२०२० ख्रिसमस


मंगलला ११.४५ ला झोप लागल्यानंतर मुलगा खूप डिप्रेस्ड झाल्याचे लक्षात आल्याने , काल रात्री १२ ते १.३० पर्यंत त्याच्याशी बोललो. त्याला समजावून माळ्यावरुन खाली आलो आणि दोन वाजता सौ. अंगावर रॅशेस उठल्याने अंग खाजवत जागी झाली.  सुदैवाने मुलाचे काम लवकर संपले होते. मग आम्ही चार वाजेपर्यंत सौ. वर उपचार करीत राहिलो. नंतर थकून झोपलो तो ७.३० ला बावादादाने बेल मारली तेव्हा जागे झालो. असा आमचा हॅपी ख्रिसमस झाला.


.......

०२.०१.२०२१

मुलगा ३१.१२.२०२० रोजी रात्री मुंबईला गेला. आई आजारी असूनही थांबला नाही. त्याचा चेहरा बघून थांबवणेही जमले नाही. ०४ तारीखला सकाळी येतो म्हणालाय. 


भाची , तिचे मिस्टर, त्यांचा मामेभाऊ , दुसरी भाची तिची मुलगी गौरांगी असे कुडाळातून आले‌. जेवले आणि गेले पण. एवढ्या ला़बून येऊन थांबले नाहीत. 


संस्थेची पॅन अॅप्लीकेशनची रिसिप्ट आज ११ वा.  मिळाली. बॅंकेत फोन केला. बॅंकेचे साहेब म्हणाले , चार वा. या. गेलो. दिली. संस्था रजिस्ट्रेशनला एक वर्ष लागले ! आता बॅंक अकाऊंट कधी ओपन होणार त्याची वाट बघायची. जागतिक महासत्तेच्या स्वप्नांचा वेगच जास्त आहे. 


संध्याकाळी ०६ वा. पुण्याहून कांतीचा फोन आला. गेले काही दिवस आजारी असलेली विलासची छोटी गेली. अतिशय दुर्दैवी घटना.  


घरात सौ.ची पायदुखी वाढलीय. तेलाने माॅलीश करून इस्त्रीने शेकतोय. काय करावे तेच कळत नाहीय. 


...................


१०.०१.२०२१

आज सकाळी दादाची तब्ब्येत बिघडली. परकार हाॅस्पीटलला नेलं. बरा झाला. दादाची काळजी वाटते. 


दुपार चांगली गेली. संध्याकाळ सुंदर होती. 


पण रात्री साडे दहाला आम्हां तिघांचे घरगुती नाट्य सुरू झाले. ते दोन वाजेपर्यंत चालले. अडीचच्यानंतर कधीतरी झोप लागली असेल. 


.................


गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री असे द्रष्टे कवी सुरेश भट साहेब लिहून गेले. अशा ओळी कालातीत असतात. अमर असतात. अक्षय असतात. भटांनी केवळ विजा घेऊन येणाऱ्या पिढीलाच ओळखले होते असे नव्हे, तर आणखीही काही जणांची कुंडली त्यांना ज्ञात होती. म्हणूनच वाकुल्या दाखवी निकाल मला असेही ते लिहून गेले होते. उच्च पातळीवर काय होऊ शकते , हे सर्वसामान्य माणसाला कळतही नाही आणि कळू दिले जातही नाही. 


शिखंडी आडून येतो बाण एखादा

लबाडीने प्राण घेतो बाण एखादा


यंत्रणांना शिखंडी समजून त्यांच्याद्वारे अशी गत केली जाते. खास खोज्यांनी तशी व्यवस्था केलेली असते. भटांनी यावर कायम स्वरूपी मार्मिक भाष्य केले आहे. तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते हेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हे खोजे वेळकाढूपणा करणार. समिती जन्माला घालणार, भिजत घोंगडे ठेवणार आणि त्यांना सोईच्या वेळेला ते वरही काढणार . म्हणून भटसाहेबांनी त्यांना बेगुमान म्हटलेलं आहे. आपण काय म्हणायचे ते ठरवा आणि म्हणा पण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१

...............


२४.०१.२०२१ रविवार एका फाॅर्मसाठी निलेश पाटील ने माळनाक्यावर आहार रेस्टाॅरंटमध्ये बोलावले. दादा व मी सह्या करून आलो. 


२६.०१.२०२१ सुट्टी


२७.०१.२०२१ निलेश पाटील ना अॅक्सिस बॅंकेत जाऊन बावादादासह भेटलो. आवश्यक त्या अंतिम दुरूस्त्या करून दिलेल्या.निलेश पाटील म्हणाले, आता फक्त एक फाॅर्म ६०चं एक अॅप्रूव्हल राहिले आहे. एक आठवड्यात ते मिळेल. मग अकाऊंट ओपन होईल. तेव्हा तिथे शेजारचा  हर्षद हेमंत सावंत (अॅक्सिस बॅंक कर्मचारी ) आला. त्यालाही ही गोष्ट बोललो. तो म्हणाला मी बघतो. एका बॅंकेत खाते उघडायला महिना लागतो ही डिजीटल युगाची शोकांतिका आहे. 

२८.०१.२०२१ सकाळी बावादादा मुंबईला रवाना. सौ. व मी बावनदीला डाॅ. बनेंकडे आजपासून जायला सुरुवात केली.

........

०७.०२.२०२१

आज बावनदीला जाण्याचा शेवटचा दिवस. घराजवळच रिक्षा भेटली. रिक्शावाला ओळखीचा निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याने रिक्शा थांबवली. सरपंचपदी निवड जवळजवळ निश्र्चित झालेल्या उमेदवाराचे त्याने अभिनंदन केले. मग आम्हीही केले. पुढे रहाटाघरातून पांगरीमार्गे देवरूख बसने नेहमीप्रमाणे बावनदीला गेलो. अडीच वाजता घरी आलो तर मुलगा शहरात निघालेला. नीटसं जेवलाही नव्हता. नीट बोललाही नाही. मी लवकर ये म्हटलं. तो हा म्हणाला. त्याचा मूड कालपासूनच ठीक नव्हता. काळजी वाटत होतीच. साडेपाच वाजले तरी तो आला नाही. म्हणून फोन करीत असतांनाच एक बाई पाटीलवाडीत सुनील पाटीलने आत्महत्या केल्याचं सांगत आली. आमच्या काळजात धस्स झालं. मुलाला फोन करीतच होतो, पण रिंग होऊनही तो उचलत नव्हता. आमचं टेंशन वाढतच होतं. आम्ही फोन करीतच होतो. शेवटी साडेसहाला त्याने फोन उचलला. घरी येतोय म्हणाला. आम्ही पुन्हा पुन्हा फोन करीत राहिलो. तो येतो म्हणत राहिला. शेवटी तो रात्री आठ वाजता आला तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास सोडला. रात्री आमच्याजवळ झोपवला. आता उद्या काय होईल या विचारात झोप नीट लागलीच नाही.‌

............

१०.०२.२०२१

पहाटे पाच वाजता मला स्वप्नं पडलं. पुढच्या अंगणात दक्षिण दिशेला दादा उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला माझा मुलगा बहुतेक खाली बसलेला आहे. ते दोघे काही तरी शोधतायत. मी उत्तरेकडे उभा राहून काय शोधतायत ते विचारतो. दादा सांगतो की ते आमचा जुना खुणेचा दगड शोधतायत. माझ्या हातातल्या काठीने मी वायव्य आग्नेय अशी खूण करून तो दगड या पट्ट्यात कुठे तरी जमिनीत गाडला गेला आहे, असे सांगतो. इथे स्वप्नं संपलं. खरं तर तो दगड दादाच्याच अंगणात आमच्या शेवटच्या पायरीपासून दीडेएक फुटांवर पूर्वापार होता.  दादाने जुने घर पाडून नवे घर बांधले तेव्हा तो उभा दगड अंगणात घातलेल्या नवीन लादीखाली गेला. तो आम्हां तिघांनाही माहीत होता. मग दादा तो आताच का शोधत होता आणि मी छेद द्यावा तशी काठीने माझ्याच अंगणात रेषा आखून का दाखवतो ? काही तरी तिरकस घडणार या विचाराने मी दिवसभर अस्वस्थ होतो. तो छेद मनातून जात नव्हता. गेले काही दिवस मुलगाही विचित्र वागत होता. नीटसं जेवतही नव्हता. कुठलेच उत्तर सरळ आणि सहजतेने देत नव्हता. संध्याकाळी घाईघाईने शहरात गेला. परत आला तो चिडलेलाच होता. रात्री तो जेवलाच नाही. भूक नाही म्हणाला. आम्ही दोघंही टेंशनवरच होतो. काय झालंय तेही सांगेना.  रात्री अकरा वाजले तरी तो जेवायला तयार होईना.  आमचा जीव राहिना. अखेर मी जिन्याने वर जाऊन पुन्हा विचारले तर तो भडकलाच. मला एकट्याला राहुद्या म्हणाला. मी निराश होऊन खाली आलो. साडेअकरा वाजता त्याला वरती गारठा असल्याने खाली ये म्हणून हिने त्याला सांगितले. खूप मिनतवारीनंतर तो दणदणत खाली आला. शेजारी झोपला. पण रडू लागला. ही समजवायला गेली तर त्याने हिला झिडकारलंच. मी पण आमच्या दोघांच्या आजारपणांना आणि मुलांच्या ह्या विचित्र वागण्याला कंटाळलो होतो. मी माझ्या दुर्दैवाबद्दल काही तरी बोललो. त्यावर हिने मला दुजोरा दिला. त्यामुळे भडकून मुलगा हिला काही तरी बोलला ‌ झाले, मायलेकांचे भांडणं सुरू झाले. ही हायपर झाली. त्या उद्रेकामुळे हिच्या अंगाला खाज सुटली. हिचे दुखणे पुन्हा सुरू झाले. श्र्वास कोंडून ही तडफडू लागली. तसा तो माझ्या मदतीला आला. 

..............

१३.०२.२०२१ रात्रीच्या बसने मुलगा पुण्याला गेला. मित्राचे लग्नं आहे.

...............

१९.०२.२०२१ मित्राचे लग्न काल झाले. काल रात्री पुण्याहून निघून मुलगा आज सकाळी घरी आला. 

............................................................


गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

Short stories - 5

 स्फूट


बंडखोर संतकवी


आठवीत होतो. कवितेचा तास होता. सर संत , पंत, तंत कवींबद्दल सांगत होते. संत कवींबद्दल सर म्हणाले संत कवी हे बंडखोर कवी होते. त्यांनी अन्यायावर कठोर शब्दप्रहार केले. झाले. सरांचे हे वाक्य माझ्या डोक्यात जाऊन बसले. माझ्या बुद्धीमान डोक्यात बंडखोरपणा शिरला. मला अन्याय दिसू लागला. शिक्षकही काही वेळा मुलांवर अन्याय करतात असे मला दिसून येऊ लागले. मी शिक्षकांविरूध्दच बंडखोरी करू लागलो ! अक्कल ठिकाणावर येईपर्यंत हे चालूच होते. तोपर्यंत शाळेत आणि शाळेतल्या तक्रारी घरी आल्याने घरीही बराच (+बौध्दिक!) मार पडला होता !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२१

...............................


काही तरी असेलच ना ?

परवा एकाकडे बऱ्याच वर्षांनी जायचा योग आला. घरात दोघंजणच दिसली. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोन मुलांपैकी एकही दिसेना. ती दोघंही मुलांबद्दल काहीच बोलत नाहीत हे लक्षात आल्याने मलाही विचारण्याचा धीर झाला नाही. अखेर मी निघालो. पण मनात एकच विचार आला म्हातारा म्हातारी ब्लाॅकमध्ये बंदिस्त. पंख फुटलेली पाखरे स्वाभाविकपणे उडून गेली असावीत. पण त्यांचा विषयही आई वडिलांनी का काढला नसावा ? काही तरी असेलच ना ? हसऱ्या चेहऱ्याआडही काही दु:खं असेलच ना ?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२

................................


फुटुराचा तवा


परवा शेजारणीची घरभरणी होती. घर म्हणजे चाळीस लाखांचा सुंदर बंगलाच तो ! स्विमिंग पूल नाही एवढीच त्रुटी फारतर ! बाकी तिच्यासारखाच भरभक्कम बंगला ‌. घरभरणी पण सुंदर झाली. कशात कमतरता नव्हती. पण शेजारणीला एक कमतरता जाणवलीच ! ती माझ्या सौ.ला म्हणाली, " मला प्रेझेंट म्हणून पाकीटातून पैसे घालू नकोस. तवा दे, तो पण फुटुराचाच दे ! " दिला. आम्ही हजार रूपयाचा फुटुराचा तवाच तिला प्रेझेंट म्हणून आणून दिला ! आमचे (मनातले !) आणखीचे हजार रूपये वाचले म्हणून आम्ही खूश आणि तवा मिळाला म्हणून शेजारीण खूश ! करना पडता हैं भाई !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.०१.२०२१

...............................


तावातावाने....


नोकरीत असतानाचा एक प्रसंग. एक कर्मचारी तावातावाने बोलत माझ्या टेबलसमोर उभा राहिला. मी शांतपणे त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. माझी ती पध्दतच होती. हो ना करता करता तो अखेर बसला. काय झालंय , एवढा का वैतागलायस , असं मी विचारता तो घुश्श्यातच बोलला, किती दिवस झाले माझं तुम्ही कामच करीत नाहीयत. हे काय चाललंय ? त्यावेळी मी नेमकं त्याचंच काम करीत होतो. मी कागद पुढे केले. हे बघ मित्रा तू यायच्या आधीच मी तुझंच तर काम हातात घेतलेलं आहे. यावर किंचित नरमून तो म्हणाला, होय पण किती दिवस लावलेत ? मी शांतपणे त्याला त्याच्या विभागाकडून माझ्याकडे त्याचा अर्ज पाठविल्याची आणि माझ्याकडे अर्ज आल्याची तारीख दाखवली. आजच माझ्याकडे अर्ज आल्याचं आणि मी आजच त्यावर कार्यवाही करीत असल्याचं बघून तो गडबडलाच ! आठ दिवस त्याचा अर्ज त्याच्याच विभागात होता हे बघून त्याने माझी क्षमा मागितली आणि धन्यवादही दिले. पुढच्याच क्षणी , मघाशी ज्या तावातावाने तो माझ्याकडे आला होता त्याच तावातावाने तो त्याच्या विभागाकडे भांडायला निघून गेला ! तिकडे काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०२.२०२१

....................

भविष्य जाणले कुणी ?

वास्तव ओळखूनही पुढे काय होणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. अनेकदा भविष्यात असेही होते, तसेही होते. सर्वसाधारण आकलन होऊनही तारूण्याच्या उर्मीमुळे वा बुध्दीला पडलेल्या भुलीमुळे मन मानत नाही. मन ऐकत नाही; बुध्दी चालत नाही अशी अवस्था होते ! हेलकावे खात खात शेवटी काही तरी निर्णय घ्यावाच लागतो. तो बरोबर निघाला तर आनंदच. पण  तो चुकीचा निघाला की वाईट वाटतेच, पण वेळ निघून गेलेली असते. दुर्दैव आहे ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०८.०२.२०२१

.........................................................

पोटदुखीसे मजबूर !

तो आज त्या पदापर्यंत पोचला तशी काहींची पोटदुखी जागी झाली. हा जगभरातला आजार. कायमचा. कोरोनापेक्षाही चिवट. काहींनी तो इथपर्यंत कसा पोचला याची खमंग चर्चा सुरू केली. कोण म्हणाला कोणाच्या तरी पाठी फिरून, तर कोण म्हणाला , बायकोचे योगदान आणि ते सारे छद्मी हसले. पण कोणीच म्हणाला नाही की तिथपर्यंत येण्यासाठी त्याने काय काय आणि किती किती सोसले ! किती वर्ष पड खाऊन काय काय भोगले ! त्याची ही किंमत कोणीच जाणली नाही. पोटदुखीसे मजबूर ! काय करणार !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

........................................................

डॅंबीस

" तो तसो चांगलो हाय, पण त्याच्याभवती जे हायत ना, ते डॅंबीस हायत " एक अशिशित खेडूत महिला एका राजकारण्याला सर्टिफिकेट देतांना म्हणाली. खरं तर, राजकारणात आता चांगलेपणाचा उपयोग आणि एकूणच राजकारणाची पातळी यातून सर्वत्र जे पसरायचे ते पसरले तर नवल नाही  ! आता हेच बघांना, जिने हे सर्टिफिकेट दिलं ते काय तिचं खरं मत थोडंच होतं ! तिला त्या नेत्याकडून पैसे उकळायचे होते ( तीच म्हणाली !) ! न जाणो तो पक्का डॅंबीस आहे हे तिचं खरं मत ती माझ्याशी बोलली आणि मी ते त्यालाच सांगितलं तर....या हुशारीने तिने सराईतपणे भाषा बदलली होती. गंमत म्हणजे तो नेता तिला अशिक्षित, अडाणी , गरीब बाई म्हणतो ! आता यात नक्की डॅंबीस कोण ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

................

रोजगार उद्योगाची गंमत


नुकतीच बातमी वाचली. सगळ्या योजना तालुक्यातील एकाच गावात राबवून तरूणांना रोजगारामार्फत उद्योगशील बनवायचे व एक आदर्श गाव तयार करायचा , ही  योजना एका चांगल्या संस्थेने सदहेतूने जनकल्याणार्थ जाहीर केली होती. पण जाहीर केलेल्या योजनेला शून्य प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांना जाहीर करून पुन्हा जाहीर आवाहन करावे लागले आहे.‌ बहुतेक तरूणवर्ग तालुक्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील काही 'उद्योगा'त गुंतवला गेला असावा ! कोण म्हणतो युवक बेरोजगार आहेत म्हणून आणि त्यांना 'उद्योग' नाहीत म्हणून ? 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

११.०२.२०२१

................

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

स्फूटलेखन ४

  मेघ भरून येतात तितका पाऊस कोसळतोच असं नाही. काही मेघ तर हुलकावणी देत न बरसताच पुढे निघून जातात. आपण पुन्हा वाट पहात राहतो ... वाट पाहणे एवढेच आपल्या हातात असते. ढगांवर कसली तरी फवारणी करून आपल्याला हवा तेव्हा पाऊस पाडण्याची स्वप्नें आपण स्वत:ला थोडीच दाखवू शकतो ! हे स्वप्नं दाखवणे वगैरे काही आपली मक्तेदारी नाही. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


निसर्गात विविध घटकांमध्ये काही ना काही साम्य असणारच. माणसांसारखी माणसे दिसतात. नीट निरीक्षण केले तर झाडांसाठी झाडेही दिसतीलच. पण काही माणसे झाडांसाठी दिसणे शक्य आहे आणि काही झाडे माणसांसारखी दिसणेही शक्य आहे. दिसण्यात आणि वागण्यातही एकमेकांचे काही गूण आढळतात. जीव वाचवणारी माणसे आहेत तश्या जीव घेणाऱ्या वनस्पतीही आहेतच. मोठे मासे लहान माश्यांना खातात. हा महत्त्वाचा गूण माणसातही आहेच की. अशी दिसण्याची आणि वागण्याची बरीच साम्यस्थळे निसर्गात आहेतच. आज एका मित्राने गदेसारखे दिसणाऱ्या फुलाचा फोटो फाॅरवर्ड केलाय आणि याला हनुमान गदा फूल म्हणतात, असं लिहिलंय. सोयीस्कर ठराविक ठिकाणी संदर्भ जोडण्याचा गूणही माणसात पूर्वापार आहे. हा गूण निसर्गातही अन्य घटकांत असेल आणि ते घटकही त्यांना सोयिस्कर माणसांची नांवे कशाशी तरी जोडत असतील. काही सांगता येत नाही. इथून तिथून सगळं सारखंच दिसतंय. एकच तत्व आहे ना सगळीकडे. 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०१.२०२१

..................

काही माणसांना मोठेपणा देऊन त्याव्दारे स्वत:ची तुंबडी भरून घेता येते , हे काहींनी पुराणकाळातच अचूक ओळखले होते. ज्यांच्याकडून फायदा करून घेतला गेला ते देव म्हटले गेले. देव ज्यांना घाबरून असायचे त्यांना राक्षस म्हटले गेले. देव महात्म्यबध्द झाले. पूजेला लावले गेले. पण राक्षस संपले नाहीत. आता हे राक्षस सगळ्यांनाच छळतात. 

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०१.२०२१

..................

मेस्त्री उवाच


एका मेस्त्रीला घराचं काही काम दिलं होतं. मध्येच चार दिवस तो गायब होता. या लोकांचं हे नेहमीचं असतं. ते तरी काय करणार ? आमच्या एका कामावर त्यांचं पोट भरत नसतंच. चार ठिकाणची कामं केली तरच त्यांचं आणि त्यांच्या हाताखालच्यांचं पोट भरणार. हे समजून मी शांत होतो. पण माझंही काम होणं आवश्यक होतं, म्हणून पाचव्या दिवशी सकाळी मी फोन केला. तो कामात असल्याने त्याच्या माणसाने फोन उचलला. मी विचा‌रलं कुठे आहात ? तर तो माणूस उत्तरला : मिऱ्यावर. मी म्हटलं , कोणाकडे ? तर तो चक्क म्हणाला, देवदास पाटलांकडे. माझा त्याने देवदास करून टाकलाच वर माझ्याच घरात काम करतोय म्हणून मलाच सांगत होता !  शेवटी मी देवीदास पाटीलच माझ्या घरातूनच बोलतोय हे सांगितल्यावर तो उडालाच ! मीच सांभाळून घेत , " माझ्याकडे लवकर या . वाट बघतोय. मेस्त्रीना सांगा " असं म्हटलं आणि हसतहसत फोन बंद केला. संध्याकाळी दोघेही हजर. काम फत्ते ! 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०१.२०२१

..................

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन ३

 तीळ तीळ तुटतंय मन

अपुरं जीवन

फुलेल बघ

तू फक्त एकदा

तीळगुळ देऊन

गोड बोल म्हण !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१४.०१.२०२१ मकर संक्रांत

.............

होय आणि नाहीची असंख्य आंदोलने

आणि या दोन टोकांमध्ये हेलकावे खाणारे आपण

आयुष्य किती क्रूर आहे

संधीच देत नाही आपल्याला

पुढे काय होणार आहे हे कळण्याची

आणि काही करण्याचीही

कुठलाच डाव आपल्या हातात येत नाही

आपण हेलकावे खात राहतो पुन्हा पुन्हा आशेने

नक्की काहीच ठरत नाही

होय नाहीचे.....

.

.

.

.

फार तर 

निकाल आल्या नंतर पाहू

किंवा

निक्काल लागल्यानंतर पाहू....


.

.

.

.आज तरी काहीच सांगता येत नाही ....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०१.२०२१

..............

आयुष्य गणिताप्रमाणे आखून चालत नाही. आयुष्याचं एखादं गणित चुकलं तर बाकीची सगळी गणितंही चुकू शकतात. निदान काही गणितं तरी चुकतात. आयुष्याच्या गणितात कुठल्याच पायरीची हमी देता येत नाही. उद्या काय होईल आज नक्की सांगता येत नाही. आयुष्य चकवा देण्यात हुशार आहे. डाव आणि प्रतीडाव कधी उलटतील सांगता येत नाही. फाजील आत्मविश्वास नडतोच. समतोल वृत्तीने व्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास आणि हार जीत वा यशापयश सहजतेने स्वीकारल्यास जीवनात पुढे जाणे सुकर होते. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१७.०१.२०२१

................

कधी कधी मनावर अनावर ढग दाटून येतात. पण बरसत नाहीत. सावट धरून बसतात. चावट होऊन लगट करीत राहतात. हाकलले तरी जात नाहीत. बरसला तर काळोख बरसतो. आशेच्या कवडशालाही वाव मिळत नाही असा चांगला वावभर पट्टा तयार होतो मनाभोवती. कमी जास्त दाबाचा. मन तसे कमी जास्त हेलकावे खात राहते. दोन टोकांना. आपण नक्की कुठले हेच कळत नाही. पण आपले आपल्यालाच सावध व्हावे लागते. आपल्याच मनातल्या भावनांचा उपसागर आपल्यालाच ऐकत नाही म्हणजे काय ? त्याला विवेकाने वठणीवर आणून आपल्यालाच आपली कोंडी फोडावी लागते. पाॅझिटीव्ह थिंकींग म्हणजे काय आहे की नाही ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

............

कसे आहे आपल्याही नकळत कोळी जाळं विणतो. आपण त्यात अलगद पडणार हे तो पक्के जाणून असतो. एकदा अडकलो की सुटका नाही. तेवढा चिकट आणि चिवट द्राव त्याने आधीच सोडून ठेवलेला असतो. आपल्या सभोवती अनेक कोळ्यांनी अशी यंत्रणारूपी जाळी पसरून ठेवलेली आहेत. फक्त पाऊल उचलण्यापूर्वी सावधपणे डोळ्यावरची बेसावधपणाची झापडे काढून पाहिले पाहिजे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१८.०१.२०२१

....................


Nothing happens. Looks still. Silent. No movements. No work. No objectives. No problems. No plans. No objections. No information. No explosion of information. Nothing to do. Nothing to worry. No reason to hurry. All stars are silent. World is silent. Universe is silent. Be silent and imagine this for a moment. The moment of silence. 


...Devidas Harishchandra Patil

18.01.2021

............


मला वाटते माणसाला सतत कशात तरी गुंतत रहायला आवडतं. समोर काही नसेल तर एक जीवघेणी पोकळी तयार होते. वेळ कसा घालवायचा हा प्रश्र्न पार बेचैन करून टाकतो. काही माणसांनी यासाठीही देव निर्माण केला नसेल ना ? 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१


........

फाॅर्म असो वा अंदाजेबयाॅं असो, अती डोक्यावर घेण्यात अर्थ नाही. ओघवते काव्य असले पाहिजे, वाचकाला लगेच कळले पाहिजे आणि वाचायची ओढ लागली पाहिजे. इतकेच. बाकी काय ? गझलबद्दल म्हणतोय मी. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०१.२०२१

.............


पैसा आपलं काम करतो. किंबहुना करतोच. त्यातही दिवसाच्या आणि रात्रीच्या पैशात फरक असू शकतो. ते काही असो. पैसा काम करतोच.‌ पण दरवेळी पैसाच काम करतो असं नाही. शब्दही काम करतात. त्यातही दिवसा दिलेले आणि रात्री दिलेले शब्द यात फरक असू शकतो, बरं का ? काही लोक पैशाला जागतात. काहींना पैशाची गरजच पडत नाही. ते शब्दालाच जागतात. काही जण पैसे घेऊनही उलटे फिरतात तर काही जण शब्द देऊनही तो फिरवतात. अगदी तुमच्यासोबत राहूनही , बरं का ! असे अनुभव रोज येतात. काहींना अगदी काल परवाही आले असतील !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

............

कधी ना कधी ....


अंधारातले काम उजेडात येते ; कधी ना कधी ! तो मी नव्हेच किंवा ती मी नव्हेचवाले साळसूद चेहरे सत्य नाकारतात . अगदी तोंडावर. डोळ्यात डोळे घालून. नजरेला नजर भिडवून. पडदयाआडचे सूत्रधार पडदयापुढेही येतात ; कधी ना कधी ! आज ना उद्या ! बदलत्या जगाची ही कहाणी आहे. कहाणीचे सत्य कळते ; कधी ना कधी !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२०.०१.२०२१

.................

कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१

....................

जवा नवीन पोपट हा...


हल्ली नेटला गती नाही मिळत पूर्वीसारखी. नेटच्या रस्त्यात गतीरोधक आल्यासारखे वाटते आहे. शायद समय बदल रहा हैं... परिवर्तन हो रहा हैं...बोलो हैं ना ...?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०१.२०२१

..................

दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

२२.०१.२०२१

.................

नेत्यांची मांडवली नि कार्यकर्त्यांची गोची ! ही नवी म्हण काही वेळा ऐकू येते.‌ कोण नेता कशासाठी कुठे उडी मारील आणि आपल्याच कार्यकर्त्यांचा कसा गोंधळ उडवील यांचा युती आणि आघाड्यांच्या जमान्यात काहीच भरोसा राहिलेला नाही. सत्तेच्या गणितात न पडता व स्वत:ची बुध्दी न वापरता मतदारांनी गोंधळून केलेले विस्कळीत मतदान हे युती आणि आघाड्यांना जन्म देताना दिसते आहे. मतदानातील संभ्रम पुढील गोंधळांना कारणीभूत होतो आहे. त्यातच पक्षाचा आदेश या गोंडस नावाखाली दिवसरात्र एक बाजू पूजारासारखी नेटाने लावून धरणाऱ्या कार्यकर्त्यांची नेत्यांच्या गणितांनी दमछाक होते आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण होते आहे आणि निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेकडे उदास लोकशाही हताशपणे बघते आहे. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२३.०१.२०२१

..................


शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन २

 दोन मांजरी


दोन मांजरी तावातावाने भांडत होत्या. म्याव म्याव करता करता भांडणं पंजावर आले. पंजावरून नखांवर आले. मग चाव्यांची भर पडली. म्हणजे दोघी एकमेकींचे चावे घेऊ लागल्या. जमलेल्या तमाम प्रेक्षकांनी श्र्वास रोखून धरला. त्यांना वाटले आता आता फाडाफाडीच होणार. त्या एकमेकींच्या पार झिंज्या उपटणार.  पण तसे काहीच झाले नाही. उलट चावे कमी होऊन त्यांची जागा गुरगुरण्याने घेतली. थोडं गुरगुरल्यानंतर हळूहळू दोघींनीही तिथून काढता पाय घेतला. जमलेल्या प्रेक्षकांमधल्या एका अननुभवी बोकोबाला राहवले नाही. तो म्हणाला, असं कसं झालं ? जंगी मारामार होणार असं वाटतं असतांनाच त्यांनी मैदान का सोडलं असेल ? एक जाणता बोका उत्तरला, तुटेल एवढं ताणणार कसं ? हिच्या भानगडी तिला माहीत आहेत आणि तिची लफडी हिला माहीत आहेत ! एका मर्यादेच्या पलीकडे त्या जाऊच शकत नाहीत एकमेकींच्या विरोधात ! नुसत्याच गुरगुरण्याचा तो शो आपल्यासाठी होता बाळ ! दाखवलं जातं तसं नसतं हे बाळला आता कुठे कळलं !

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

स्फूट लेखन

 कुटुंब प्रमुखाचे नांव


स्वयंसहाय्यता गट निर्माण करायला सन २०१५ मध्ये चार महिला देशावरून गावात आल्या‌ आणि गटांशी आख्ख्या गावाची ओळख झाली. आमचे कंपाऊंड आणि गेट बघून कुत्रा असेल या भीतीने बिचाऱ्या आमच्याकडे कसे यावे या विचारात असतांनाच माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. मी पुढे होऊन त्यांची चौकशी केली. कुत्र्याऐवजी एक (भला !) माणूसच स्वागताला आल्याचे पाहून त्यांना धीर आला. पहिला गट आमच्याच घरी स्थापन झाला. पत्नीकडे सचिव पद आले. त्यावेळी त्या महिलांशी आणि गटातील महिलांशीही बरीच चर्चा झाली. आता ह्या छोट्याश्या गावात महिलांचे १५ गट कार्यरत आहेत ! सुरुवातीला आणि त्यानंतरही स्वयंसहाय्यता गटांशी नोंदवहया लेखन, हिशेब आणि सरकारी माहित्या यासंदर्भात आजतागायत माझा थोडाफार संपर्क येतोच आहे. अशीच एक माहिती नुकतीच मागवलेली आहे. माहिती म्हटली की रकाने आलेच. पहिला रकाना महिलांच्या नांवांचाच आहे. पण दुसऱ्या रकान्याने लक्ष वेधून घेतले. कुटुंब प्रमुखाचे नांव हा तो रकाना. खरे तर, मालमत्तेत पतीबरोबर पत्नीचेही नांव आता येते‌. बरेचदा पत्नीही आता कमावती असते. शिवाय, महिला स्वयंसहाय्यता गटांचा हेतूच मुळी महिलांना कर्त्यासवरत्या बनवण्याचा आहे. तशातच, नवरेमंडळींच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्तृत्व आणि विविध गूण(उधळणे)दर्शन  कार्यक्रमांमुळे पुरातन काळापासून काही पुरूषांचे लक्ष (आपल्या) संसारात किती असते हा संशोधनाचा विषय आहे ! त्यामुळे निदान गावात तरी पन्नासहून अधिक वर्षे मी काही महिलाच धडाडीने संसार चालवताना पाहतो आहे. एरव्हीही बायको पुढे कुठल्या नवऱ्याचे चालते आहे ! त्यामुळे महिलांचीच नांवे कुटुंब प्रमुखाचे नांव या रकान्यात टाकावीत असे मला मनापासून वाटले. पण मी बिचारा नवराच असल्यामुळे घरचे आणि दारचे अशा दोन्ही सरकारांपुढे हतबल होऊन मी नवऱ्यांचीच नांवे कुटुंब प्रमुख म्हणून तिथे लिहिली.  


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०१.२०२१

शनिवार, २ जानेवारी, २०२१

Kahi kavita

 कवितेतून शोधत आलो 



कवितेत शोधत आलो 

जीवनभर दिलासा 

कधी वाट चुकतांना, 

कधी निराश होतांना

कवितेनेच धीर दिला...


बाकी आजूबाजुला माणसेच होती 

कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून ,

ज्यांना मी कवितेइतकीच माझी समजत आलो !

ठेवली नाही कधीच मी अपेक्षा 

की माझ्या कवितेला कुणी चांगलं म्हणावं,

कौतुक करावं ,

माझ्यासाठी एक छंद म्हणून मी लिहीत आलो

दु:खावरचे औषध म्हणून कविताच पीत आलो 

कवितेनेच कंठातील वीष भिनू दिलं नाही शरीरात

आणि बनू दिलं नाही रक्ताला व्देषयुक्त !



कवितेनेच धीर दिला 

कधी निराश होतांना

कधी वाट चुकतांना 

जीवनभर दिलासा

कवितेतच शोधत आलो....



जाऊ कुठे, जाणार कुठे 

कवितेशिवाय 

माणसे अशी कोरोनाग्रस्त झाल्यासारखी अंग चोरून असतांना 


माणसापासूनच .....



... अर्थात आपलीच !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



....................


तुझ्यामुळे कवितेला

जाग माझ्या आली ;

एक एक ओळ माझी

तुझ्या श्रावणात न्हाली !



तुझ्या चांदण्यात माझा

शब्द शब्द मोहरला ;

तुझी साद येता कानी

जीव माझा आतूरला !



बघे आयुष्य नव्याने

पुन्हा वळायास मागे;

असे अचानक आले

बघ जुळायास धागे !



सुन्या सुन्या मैफिलीला

सूर नवा सापडला ; 

तू वाचताच कविता

देह सारा झंकारला !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील.




मेघांआडून चंद्रानं अधूनमधून डोकवावं 

तसं तुझं व्हाॅटसअॅपवर डोकावणं

मनाला भुरळ पाडून जातं...


असं कधी झालं नव्हतं

पण आज वाटतंय कुठे तरी

मनाला विचारावं स्वत:च्याच...


हे स्वप्नं आहे की सत्य ?

किती सांभाळलं होतं ...

आज ओठात आलंच ! 


पण कसं सांगू ? 

.........


कविता ओलांडते हद्द

अनावर होऊन बरसते

आषाढासारखी...



ऐकतच नाही मनाचं

मनालाच उतरवते

कागदावर....



कोणी तरी वाचील

ही धाकधूक मनात

असते तरी....


........


असे होऊ नये

असे वाटते तरी

असे होत आहे...



कधी होत नव्हते

कधी झाले नव्हते

तसे होत आहे...



आता प्रश्न हा

सुरु राहूदे का

जसे होत आहे....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


............................................


उदास एकटेपण


उदास एकटेपण

रिते मन ;

कुणी न सोबती

 हे घुमेपण !


मूळचा देवीदास 

बिनधास्त ;

आता तसा

दुरापास्त !


चेहरा ओळखीचा

आरशास ;

प्रतिबिंब

हाच भास !


कळे न जातसे

कुठे जीवन ;

वळणामागून

येई वळण !


चालत राहणे

हेच हाती ;

विझेपर्यंत

जीवनवाती !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


रत्नागिरी. २०.१२.२०२० सायं. ०६.३५

............................................


असाच मी बसतो कुण्या संध्याकाळी

अंधाराला सोबत घेऊन 

कातरवेळेनंतर अंतर वाढत जाते उजेडापासूनचे 

दुस-या दिवशीचा सूर्य येईपर्यंत

काही पडला उजेड तर पडला माझ्याही डोक्यात

म्हणून असाच मी बसून राहतो डोक्यावर किरणे घेत 

बाकी काही नाही झाले तरी डोके उबदार होते

आणि सुचते एखादी कविता ही अशीच एखादी....


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

..........................

वाढलेल्या अपेक्षांचं ओझं वागवीत 

वाकलेल्या अवस्थेत चालत असतो

म्हातारपणाच्या दिशेने

अशा वेळी पावलं जड तर होणारच ना...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

29.12.2020

...............


अस्व:स्थ मनस्थितीत बाकी काहीच सुचलं नाही तरी कविता सुचते ! 

हे कसं होतं काहीच कळत नाही

पण होतं हे खरं आहे

कविता इतकी कशी अभिन्न आणि समजूतदार निघाली ?

कोण सांगू शकेल काय ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

.....................


इतक्या सगळ्या खस्ता खाल्ल्या त्या कशासाठी ?

आता अखेरच्या पर्वात तरी शांतता, समाधान मिळून मनाजोगते जगायला मिळावे ही अपेक्षा गैर वाटावी

असे जीवन पुन्हा वाट्यास का यावे ? 

सृष्टीचक्रात काही घोळ तर नाही ना ? 

की देवाचे आणि दैवाचे अस्तित्व जाणवावे म्हणून हा अट्टाहास आहे ? 

की काळच सूड उगवतोय माझ्यावर ? 

रावणाने अशाच कुणाची तरी सत्ता मानण्यास नकार दिल्यानेच त्याला मारण्यात आले का ? 

मला शरण आलेच पाहिजे हा मत्तपणा 

आणखी किती मानवांचे बळी घेणार आहे ? 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.१२.२०२०

........................


आता ते येतील पुन्हा पाच वर्षांनी हसत हसत

आणि आम्हीही तोंडदेखले तोंडभर हसतहसत

त्यांच्या आश्वासनांना आणि एकमेव मागणीला 

त्यांच्यासारख्याच मुखवटयाने प्रतिसाद देऊ😃

मास्कआडून😷😷😷😃😃😃😄😄😄


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०१.०१.२०२१

...................

गझल कळून घेतांना...


पटकन मला त्या शेराचा अर्थच कळला नाही .

असे का व्हावे ? माझ्यातील स्वयंघोषित गझलगुरूला

शेराचा अर्थ चटकन लागत नाही म्हणून कित्ती राग आला ! 


पण मग इथे माझ्यातील तथाकथित आकलनकर्त्याला राग का आला नाही ?


गझल काही वेळा कळूनही घ्यावी लागते

हे मला कळले गझल कळून घेतांना

तर किती बरे होईल 😃 😃😃


किमान माझ्यातला स्वयंघोषित गझलगुरू तरी हद्दपार होईल 😃😃😃😃😃

गझल कळून घेतांना.....


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील


०१.०१.२०२१

...................

काही क्षण अस्वस्थ करतात

काही क्षण ती अस्वस्थता अधिकच वाढवतात

आणखी काही क्षणांनी हे शांत होईलही कदाचित

पण हे क्षण तरी असे अस्वस्थ करणारे आहेत हे नक्की 

पुढे तरी काय लिहू अस्वस्थ क्षणांच्या सोबतीत .....



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०१.२०२१


Suresh Bhatanchi Marathi Gazal

 फेसबुक वरून साभार....

सुरेश भटांची मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत


 मराठी कवितेच्या इतिहासाला कविवर्य सुरेश भटांचं नाव विसरता येणार नाही. गझलचा शक्तिशाली आकृतीबंध त्यांनी मराठी कवितेला दिला. स्वत:च्या मराठी गझलांनी त्यांनी मराठी कवितेचं दालन समृद्ध केलं.मराठी कविता अधिक श्रीमंत केली.

एखादं मिशन चालवावं इतक्या निष्ठेने त्यांनी मराठी गझलचा प्रसार-प्रचार केला. उर्दू गझलकारांच्या परंपरेप्रमाणे उस्तादाच्या भूमिकेतून नव्याने गझल लिहिणा-या कवींच्या गझलात दुरूस्त्या सुचविल्या. त्यांना ‘इस्लाह’ दिला. मराठी कवितेच्या परंपरेत एखाद्या जेष्ठ कवीने अशा प्रकारे नव्या कवींच्या रचनात दुरूस्त्या करणे बसणारे नव्हते. म्हणून त्यांच्यावर टीकाही खूप झाली. ‘नव्या कवींची एक पिढी त्यांनी वाया घालवली’ असा इल्जाम त्यांच्यावर लावण्यात आला. पण त्यांनी अशा प्रकारच्या टीकेला भीक न घालता, समीक्षकांच्या तथाकथित विरोधाला न जुमानता आपले मिशन अधिक नेटाने, अधिक जोमाने पुढे नेले.

 केवळ गझल ह्या एखाद्या काव्यप्रकाराला वाहिलेली संमेलनं आज भरवली जातात. आणि ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाइतकीच साहित्येतर कारणांसाठी गाजतातही. मराठीतल्या ह्या गझल प्रेमाचे मूळ कविवर्य सुरेश भटांच्या ‘गझल मिशन’ मध्ये आहे, हे विसरून चालणार नाही.

 मराठी गझलचा हा सिलसिला आजपासून जवळपास पन्नास वर्षांआधी सुरू झाला आहे. १९५५ पासून सुरेश भटांनी मराठी गझल लेखनास प्रारंभ केला. एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातली पन्नास वर्षे सुरेश भटांनी मराठी गझलला दिली आहेत. तेव्हा कुठे आत्ता आत्ता अलीकडे तिला प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. गझल प्रेमाच्या वेडाने झपाटलेला हा अर्धशतकाचा कालखंड पाहिला की सहजपणे उर्दूतील श्रेष्ठ गझलकार गालिबचा शेर आठवावा -


‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक

कौन जिता है तेरी जुल्फ के सर होने तक’


 आपल्या आयुष्यातली पन्नास वर्षे मराठी गझलला अदा केल्याची पावती म्हणून मराठी रसिकांनी सुरेश भटांना ‘गझल सम्राट’ हा किताब बहाल केला. हे जग कोणालाच काही फूकट देत नाही. त्याची पुरेपूर किंमत वसूल करून घेते.इतरांच्या यशावर असूयेने जळत आणि आत्मवंचनेने कुंथत राहणा-यांना म्हणूनच तर ते कबीराच्या तो-यात सांगतात -


‘फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे

घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही’


इथे आपल्याला चटकन कबीराची आठवण होते-


‘कबीर खडा बजार मे लिए लू काठी हाथ

जो घर जारे आपना चले हमारे साथ’


 असे खडे बोल सुनावणा-या कबीराचा ‘एल्गार‘ आणि दंभावर प्रहार करणा-या तुकारामाचा ‘झंझावात’ त्यांच्या गझलेत बेमालूम एकरूप झालेला दिसतो.


‘इथे मागून ही माझी समाधी बांधली गेली

जिथे मी गाडला गेलो अरे ही तीच आळंदी’


ज्ञानेश्वरांच्या समाधीला एक प्रतिमारूप देताना चमत्कारिक इतिहासाविषयी त्यांनी व्यक्त केलेली काव्यात्मक प्रतिक्रिया आपल्याला ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’याचा पुन:प्रत्यय देणारी आहे.

 सुरेश भटांच्या नावावर आजच्या घडीला सहा कविता संग्रह जमा आहेत. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ ‘सप्तरंग’ आणि ‘रसवंतीचा मुजरा’अशी त्यांची शीर्षकं आहेत.

 यापैकी निव्वळ गझलांचे म्हणता येतील असे संग्रह म्हणजे ‘एल्गार’आणि ‘झंझावात’. भटांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि आक्रमकता त्यांच्या गझलांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होते तशीच त्यांच्या संग्रहांच्या ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ शीर्षकांतूनही अभिव्यक्त होते.

 मराठी कवितेवरील आक्रमण आणि मराठी कवितेतील वादळ म्हणजे गझल असा आशय सूचविणारी ती शीर्षके आहेत.

 सुरेश भटांच्या मराठी गझलांचा प्रवास आजही कालानुक्रमे न्याहाळायचा झाल्यास आपल्याला त्यांच्या ‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहापासून सुरूवात करावी लागेल. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात एकूण ७२ कविता आहेत. त्यापैकी फक्त सात रचनाच गझल प्रकारात आहेत.


‘मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे

मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे


रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी

मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे!’


 १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रूपगंधा’ या शीर्षकाच्या अशा मल्मली श्रृंगारांच्या रेशमी गझलने संग्रहाची सुरूवात होते.उर्दूत एकच विषय उलगडत नेणा-या गझलला ‘मुसलसल गझल‘ म्हणतात. भटांच्या सुरूवातीच्या अनेक गझला या प्रकारात मोडणा-या आहेत.याच संग्रहातल्या विविध विषयाच्या इतर गझला पाहिल्या तरी त्यांच्यात आशयाचे एकत्र सूत्र पाण्यातल्या तरंगासारखे विस्तारताना आपल्याला दिसते.


‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी

जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी’


 ‘वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही’ असं जगणं चाललेलं असताना मृत्यूचं असलेलं स्वाभाविक आकर्षण नंतरच्या संग्रहातूनही त्यांच्या गझलात निनादत राहिलं.


‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’


किंवा


‘मेल्यावरी जगाचे आभार मानले मी

जाऊ दिले मला हे उपकार मानले मी’


 सुरूवातीच्या मृत्यूचं आकर्षण परिपक्व होत होत उदात्ततेकडे झुकताना आपल्याला दिसतं.‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहातील आणखी एक प्रसिद्ध गझल अशी आहे-


‘माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे!

माझिया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे!


हेलकावे मी पुढे येता मिठी सा-या फुलांची,

हे बरे झाले... इथे माझ्या उरी अंगार आहे!’


 नंतरच्या गझल लेखनाची नांदीच एकप्रकारे या गझलच्या ओळीतून आपल्याला जाणवते.

 फुलांच्या मिठीचा नाजुक साजुक श्रृंगार आणि उरात विश्वाच्या व्यथेचा धगधगता अंगार अशा दोन धृवात सुरेश भटांच्या सर्व गझला हेलकावत राहिल्या.

 गझल लेखनाला प्रारंभ केल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा गझल संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहात एकूण ८२ कविता आहेत. त्यापैकी ३४ कविता ह्या गझल प्रकारातील आहेत.

 ह्या संग्रहातील बहुतांश गझला देखील एकच आशय उलगडून दाखविणा-या आहेत. प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र असलाच पाहिजे अशी गझलची आग्रही व्याख्या ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध होईपर्यंत तरी भटांनी स्वीकारल्याचे त्यांच्या गझल लेखनातून जाणवत नाही.


‘समजावुनी व्यथेला समजावता न आले

मज दोन आसवांना हुलकावता न आले’


किंवा


‘जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही’


किंवा


‘दिवस हे जाती कसे अन् ऋतू असे छळतात का

विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का?’


किंवा


‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले!

एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!’


 -अशी कितीतरी उदाहरणे घेता येतील. माधव जूलियनांनी दिलेल्या संज्ञेत बोलावयाचे तर अशा सर्व गझला ‘एक पिण्डी भावगीतासारख्या’ उलगडत जाणा-या आहेत.


 ‘रंग माझा वेगळा’ हे भटांच्या काव्यप्रवासाचे एक महत्त्वाचे वळण आहे. ज्या वळणावर त्यांचे गीत लेखन मागे सुटले आहे. आणि ‘मुसलसल गझल’ देखील मागे पडली आहे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट ‘रंग माझा वेगळा‘ नंतर घडलेली आपल्याला आढळते. एखाद्या गझलेत जास्तीत जास्त नऊ शेर लिहिणारे भट मात्र ‘एल्गार’ मध्ये सुचतील तेवढे तेरा शेर एकाच गझलमध्ये घालताना दिसतात.आशयदृष्ट्या शेरांची विविधता लक्षात घेतली तरी एकसंध काव्यकलाकृतीला उणेपणा आणत एखादा शेर गझलची विण सैलसर करतो.

 निव्वळ गझलांचे असलेले भटांचे दोन संग्रह म्हणजे ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’.

 ‘एल्गार‘मधे ११९ कविता आहेत. त्यापैकी ९४ गझल प्रकारातल्या आहेत. तर झंझावातामध्ये एकूण ९६ कविता आहेत आणि त्यापैकी ७३ गझला आहेत.

 संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ हे त्यांच्या गझल प्रकारातले महत्त्वाचे पडाव आहेत. पण गुणात्मक वाढीच्या दृष्टीने मात्र ते ‘रंग माझा वेगळा’ इतके गोळीबंद गझल देणारे वाटत नाहीत. आकाराच्या बाह्य अंगाने त्याचे महत्त्वाचे कारण सूचतील तेवढे शेर एका गझलेत घालणे हे जसे असावे, तसेच अंतरंगाच्या अंगाने तपासून पाहिले तर त्याच त्या लाडक्या आणि आवडत्या प्रतिमांची पुनरावर्तने हे दुसरे कारण असावे..

 ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत भटांनी लिहीलेले एक वाक्य आहे ‘मानवी प्रेम जगाला सुंदर बनवते, पण ज्या जगात प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य आणि अजून कितीतरी सुंदर गोष्टी आहेत. ते जग हृदय असलेल्या जिवंत माणसांनी जगण्याच्या लायकीचे बनवले पाहिजे’.

 या त्यांच्या वाक्यातील प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य ही जी यादी आहे. त्यात अश्रु आणि स्वप्ने मिळवली की तेच त्यांच्या गझलातील प्रतिमा विश्वाचे वर्तुळ पूर्ण होते.

 आणि दुसरीकडे सामान्य माणसांच्या दु:ख दारिद्र्याचा कैवार घेण्यासाठी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक दंभावर घनाघाती प्रहार करताना त्यांच्या गझला जेव्हा चीड, संताप व्यक्त करतात तेंव्हा त्यांच्यातली सूचकता नष्ट होऊन त्यांच्या शब्दांचा स्वर अधिक चढा झाल्यासारखा जाणवतो. त्यांना अपेक्षित काव्यातील प्रासादिकतेलाही तो कधी कधी ढोबळपणाची बाधा आणत तर नाहीना,असे वाटते.

 ‘सप्तरंग’ या त्यांच्या शेवटच्या संग्रहात एकूण ८० कविता आहेत. त्यापैकी ४६ गझला आहेत. एकूण समाविष्ट कवितांच्या तुलनेत हे प्रमाण बरेचसे ओसरल्या सारखे वाटते. ब-याचशा जुन्या कविता ज्या इतर संग्रहात समाविष्ट होऊ शकल्या नाहीत त्या या संग्रहात समाविष्ट करून संग्रह सिद्ध केल्यामुळे ते घडले असावे.

 ४ फेब्रु. २००७ ला नागपूर येथे संपन्न झालेल्या ८० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील स्व. सुरेश भट गझलवाचन सत्रात माझ्या हस्ते प्रकाशित झालेल्या सुरेश भटांच्या ‘रसवंतीचा मुजरा’ ह्या अखेरच्या संग्रहात एकूण ८३ कविता आहेत.त्यापैकी केवळ ६ गझला आहेत. सुरेश भटांच्या नावावर असलेल्या ह्या सहा संग्रहात समाविष्ट एकूण  कवितांपैकी संग्रहनिहाय गझला -

संग्रहानुसार कविता/ गझला

रूपगंधा ७२ / ०७

रंग माझा वेगळा ८२ /३४

एल्गार ११९ /९४

झंझावात ९६/७३

सप्तरंग  ८०/ ४६

रसवंतीचा मुजरा ८३ /०६

...........................

एकुण५३२ /२६०

अशा एकूण ५३२ कवितांपैकी निम्म्याहून अधिक २६० गझला आहेत.

 ‘सप्तरंग’ ह्या संग्रहात समाविष्ट ‘ह्म्द’(पृ.३९) ‘न आत शरीफ’(पृ.४०) आणि ‘पाच वर्षांनी!’(पृ.६६)आणि ‘खुलासा’(पृ.७६)दोन हझला अशा चार रचनांचा आकृतिबंध गझलांचाच आहे.त्यांना धरून गझलांची संख्या २६४ होईल.‘न आत शरीफ’ ही रचना ‘झंझावात’ ह्या संग्रहातही पृ.५० वर समाविष्ट आहे.

 वरील आकडेवारीत मुसलसल गझलांचाही समावेश आहे.ज्यांना ‘रंग माझा वेगळा’नंतरच्या कालखंडात सुरेश भट गझलांच्या फॉर्म मधल्या कविता म्हणत असत.

 ‘सप्तरंग’ वाचताना आपण ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ मधल्या गझलाच पुन्हा पुन्हा वाचतो आहोत की काय असा भास व्हावा एवढा प्रतिमांचा सारखेपणा जाणवतो.

 एकंदर गझलात हे जिथे जिथे नाही तिथे प्रतिमांचे नावीन्य आणि आशयाची उत्कटता आपल्याला थेटपणे भिडते. त्या ओळी आपल्या स्मरणात राहतात आणि भाषिक उपयोजन करण्याएवढे सुभाषितत्वही त्यांना लाभते उदाहरणार्थ -


‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री

मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’


किंवा


‘संपली ती रात्र होती मानतो आम्ही, परंतू

जो निघाला सूर्य त्याचा चेहरा काळा कशाला?’


किंवा


‘चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती

ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?’


किंवा


‘राग नाही तुझ्या नकाराचा

चीड आली तुझ्या बहाण्याची!’


किंवा


‘अता आजन्म कोणाला कुणी सांगायचे नाही-

कुणापाशी कुणी वेडा प्रवासी थांबला होता.’


 भटांच्या सहा संग्रहातल्या मुसलसल आणि गैर मुलससल अशा दोन्ही प्रकारच्या गझलांची एकूण संख्या २५४ इतकी आहे. त्यासाठी त्यांनी पन्नास वर्षे सातत्याने गझला लिहिल्या आहेत.

 १९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत तीन दशकं त्यांच्या गझलांनी मराठी कवितेवर चेटूक केले आहे.

 भटांच्या गझलांचा हा ताळेबंद मांडताना त्यांनीच केलेल्या कवितेच्या यशाची एक व्याख्या सहजपणे आठवली. ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत ते लिहितात - ‘जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीच्या जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!’   

 आपल्या गझलांचे समर्थन करण्यासाठी भट आज हयात नाहीत पण काळाच्या कठोर समीक्षेला पुरून रसिकांच्या स्मरणात पिढ्यानुपिढ्या उरेल एवढे गुण त्यांच्या गझलात नक्कीच आहेत म्हणूनच तर त्यांच्या ह्या ओळी अधिक अर्थपूर्ण वाटतात-


‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’


श्रीकृष्ण राऊत 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  


बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

सहवास गझलांचा




मी न केला अती अभ्यास गझलांचा

अंतरी ठेवला मी ध्यास गझलांचा


मी न सांभाळली वृत्ते पुस्तकी ती

फक्त ' वृत्ती ' त होता श्वास गझलांचा


हात सोडून गेली माणसे होती

लाभला हात पण हमखास गझलांचा


ओळ सुचली तशी लिहिली गझल होती

गुणगुणत राहिलो मधुमास गझलांचा


मज दिली गझल बापाने गझलच्या अन् 

आवडू लागला सहवास गझलांचा


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील. 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .