लोकमान्य गद्दारी !
मला वाटते जे आरोप करत राहतात त्यांनी आत्मपरिक्षण करावे. त्यांच्या आरोपात उचित आरोप किती आणि बिनबुडाचे आरोप किती हे तपासावे. ज्यांच्यावर ते आरोप करतात त्यांचे वागणे तपासावे. तुम्ही कितीही आरोप केलात तरी ते यशस्वी कसे होतात ? हे अभ्यासावे. ते काय डोके लढवतात, कोणत्या युक्त्या करतात, कसे झुलवतात ते तपासावे. कोणती स्वप्ने दाखवतात आणि काय करण्याचे वा दाखवण्याचे कटाक्षाने टाळतात ते पहावे. नुसतीच नांवे ठेवून, आरोप प्रत्यारोप करून , वार पलटवार करून उपयोग शून्यच होतो आहे तर आपली पध्दत नको का बदलायला ?
एकाच चालीने चालत राहून तुमच्या मागून कोण चालत राहणार ? लोक एकसुरीपणाला , तोचतोचपणाला कंटाळतात. काही तरी नवीन तुमच्याजवळ हवे लोकांसाठी. नुसतीच शब्दबंबाळ वाचाळता उपयोगाची नाही. ते रेटून खोटे बोलत असतील आणि लोकांची लायकीही तेच खरे समजण्याची असेल, तर तुम्हीही रेटून खोटे बोला की ! कोण रोखणार तुम्हांला ? ते खोटे बोलत असतील तर त्यांना कोणी रोखले ? लोकांमध्ये एवढी हिंमत कधीच नसते. लोक कुठे प्रामाणिक असतात ? भावकीत कंदाल सुरूच असते ! तेव्हा तुम्हीही प्रामाणिक असणे अजिबात उपयोगाचे नाही. तुमच्या निष्ठावंतपणाचा काहीच उपयोग नाही. दुनिया गद्दारीवर चालते. हजारो वर्षांचा इतिहास साक्षी आहे ! म्हणूनच गद्दारही प्रतिष्ठा मिळवून जातात. भाव खाऊन जातात. स्वच्छ चेहरा आता अडसर होतो ! मि. क्लीन गेले आता ! ती प्रतिमा वेगळी . ही प्रतिमा वेगळी . आता उपयुक्ततेची प्रतिमा उपयोगाची असते. काळ बदलला भाऊ. भाऊसुध्दा आपला राहिला नाही. मूळात तो आपला नव्हताच ! परक्यांच्या इशाऱ्यांवर नाचणारा तो आपला होताच कुठे ! खुद्द बाप आपल्या मुलाला ओळखू शकत नाही. तिथे भावाचे काय घेऊन बसलात राव ! भाव कोणाचा ? त्याचा भाव किती ? तो तुम्हांला भाव देतो का ? तर नाहीच ! उगाच वावडयांना खरे मानण्यात अर्थ नाही. भावडयांचे प्रेम खरे नाही ! ते तळ्यात मळ्यात ! नाद सोडून द्यावा.
भगदाड पडलेले किल्ले जवळ बाळगण्याचा अट्टाहास उपयोगाचा नसतो. जाणार ते जाणार. भुलवणार ते नाणार. हल्ली तेही कुठे दिसत नाही. जाणार की राहणार हा विषयच नाही ! एके काळी केवढी रस्सीखेच होती ! ते आरोप प्रत्यारोप कुठे गेले ? तो खटाटोप कुठे गेला ? कशासाठी होता तो ड्रामा ? आता वेगळा ड्रामा करा. एकमेकांविरूध्द आरोप करण्यापेक्षा लोकांना फुकटचे देतो , आयते देतो , असे दाखवून लोकांचाच पैसा लोकांच्याच तोंडावर मारा की ! त्यांना मिंधे बनवा. नुसते म्हणत बसू नका की हे असे करतात, ते तसे करतात. लोकांना भुलवतात. भुलवाना लोकांना तुम्ही पण ! लोक भुलतातच. संतांनाही भुलतात. असंतानाही भुलतात. लोकांनी स्वतःला पर्यायच ठेवलेला नाही. तुम्ही मारल्यासारखे केलात आणि दुसऱ्यांनी लागल्यासारखे केले तरी लोक ते खरेच समजून रडू लागतात !
तेव्हा बिनधास्त. लोक काय म्हणतील यापेक्षा लोकांना उल्लू कसे बनवता येईल हा आजचा आदर्शवादी विचार तुम्हीही कृतीत आणा. उगाच आरोप प्रत्यारोप, उखाळयापाखाळया करू नका. ऐकून ऐकून लोक कंटाळले आणि दुसऱ्यांकडे गेले ! त्या दुसऱ्यांचे गूण घ्या. त्यांनी गद्दारी केली तर तुम्हीही करा. तीच हल्ली सर्वमान्य आहे ! लोकमान्य आहे !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०९.१२.२०२४ सकाळी ०६.४५