शुक्रवार, ३ जुलै, २०२०

Lovely messages 2


व्हाॅटस्अप ग्रूप : जनसेवा ग्रंथालय , रत्नागिरी
मेसेज बाय : श्री. विनय परांजपे 

*कोकणची गझल*
भाग- 8
   
    विदर्भ,मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्र,खानदेश इथे गझल खूप आधीपासून बहरलेली आहे . कोकणात अलीकडील पिढीत गझल लिहिणारे खूप आहेत. श्रेष्ठ गझलकार  *खावर*  हे फार मोठे शायर होते.मराठी आणि उर्दूमध्ये त्यांनी सकस गझला लिहील्या आहेत.नऊ उर्दू संग्रह आणि चार मराठी गझल संग्रह त्यांच्या नावावर आहेत. 
  श्री.वा न सरदेसाई हे सुरेश भटांच्या कालखंडातील एक महत्त्वाचे गझलकार ..गझलच्या वृत्तावर हुकमत असणारे  हे उत्तुंग प्रतिभेचे शायर आहेत.
 *हे का कुणी फुलांना* *सांगायला हवे*
*कोणी कसे ऋतूंशी* *वागायला हवे* 

ही त्यांची प्रसिद्ध गझल आहे.

   *कैलास गांधी*
हे अलीकडे मराठी गझलमध्ये कौतुकाने घेतले जाणारे नाव आहे. गांधी दापोलीत राहतात. *देवीदास पाटील* रत्नागिरीचे ..सुरेश भटांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गझलची सुरुवात केली. त्याच दरम्यान राजापूरचे *अजीज मुकरी* गझल लिहायला लागले..
  *केदार पाटणकर* गेली वीस-पंचवीस वर्ष तन्मयतेने गझल लिहीत आहेत ..
  रत्नागिरीचे *विजयानंद जोशी* अगदी अलीकडे लिहू लागले आहेत. निष्ठेने गझल लेखन करणारे जोशी आता हळूहळू गझलच्या प्रांगणात सराईतपणे वावरू लागले आहेत.
    नामवंत पत्रकार *दिनेश केळुसकर* हे मालवणी कवी म्हणून प्रसिद्ध आहेत पण त्यांनी उत्तम गझल रचनाही केलेल्या आहेत.
 देवगडच्या *डॉ. माधुरी चव्हाण जोशी* यांचे नाव सध्या गझलच्या क्षेत्रात अग्रस्थानी आहे. गझलच्या अंगणात त्यांच्यासाठी एक मानाचा चौरंग आहे. त्यांनी मेहनतीने हे स्थान मिळवले आहे ..
 माधुरी जोशींच्या नंतर देवगडच्या *उत्तरा जोशी* याही निष्ठेने गझल लेखन करत आहेत.दोडामार्गचे *सचिन मणेरीकर* हे ही उत्तम गझला लिहितात.
  मालवणी मुलखातल्या *गोविंद नाईक* नावाच्या गझलकाराने  मराठी गझल रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. *अनिल विद्याधर आठलेकर* हे छंदशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत . आणि ते उच्च दर्जाचे गझलकार आहेत..
    *आनंद पेंढारकर* हे उत्तम गझल लिहितात.ते गझल गातातही उत्तम.
आता या गझलकारांच्या गझलांची झलक पाहू.....

*ठेवतो हा चोख बंदोबस्त मी* 
*घालतो साऱ्या जगावर गस्त मी*
*सूर्य आहे मावळावे लागते*
*पाहतो दररोज माझा अस्त मी*     
       - खावर

*हे का कुणी फुलांना सांगायला हवे*
*कोणी कसे ऋतूंशी वागायले हवे*
      -वा.न.सरदेसाई

*करते थोडी स्वप्ने गोळा,* 
*स्वप्नांचे वय कायम सोळा ....*

*सखे जरी तू सती पार्वती,*
*हरेक शंकर नसतो भोळा....*

*उरी वेदना मणामणाची,*
*वजन सुखाचे तोळा तोळा....*
- माधुरी चव्हाण जोशी 
    देवगड


*हे कसे आयुष्य आहे ज्यात जगता येत नाही* 
*श्वास नुसता येत जातो गंध टिपता येत नाही*

*व्यक्त ओठांनाच व्हावे लागते प्रत्येकवेळी* 
*काळजाच्या भरवश्यावर प्रेम करता येत नाही* 

*पान अळवाचे तशी तू थेंब पाण्याचा असा मी*
*भेट होते स्पर्श होतो पण बिलगता येत नाही*
      - गोविंद नाईक

*चढला बराच जेव्हा बाजारभाव माझा*
*माझ्याच माणसांनी केला लिलाव माझा ...*

*इतक्यात ताकदीची घेऊ नका परीक्षा*
*इथल्या रणांगणांना नाही सराव माझा ...*
   
-अनिल आठलेकर


*सैरभैर झालेला वारा सांगत सुटला आहे* 
*कुणीतरी या आभाळाला खडा मारला आहे*

*उडणारा पाचोळा त्याच्या मागे मागे फिरतो* 
*पण वारा हे सांगत नाही कुठे चालला आहे*

*कपारितुनी आवाज ऐकू येतो गुदमरल्याचा* 
*काय झऱ्याचा त्या खडकाने गळा दाबला आहे ?*

*झाडाचे मुळ शोधत आहे का जमिनीचा गाभा ?*
*का फांद्यांनी आभाळाला हात लावला आहे ?*

*पोट खपाटीला गेलेला आड विचारत आहे*
*पोहरा काढुन कुणि इथे हा पंप लावला आहे ?*

- कैलास गांधी

*कधी आवेश नव्हता तर कधी वेडावलो नाही*
*फुलांच्या सोबतीनेही कधी गंधाळलो नाही*

 *कितीदा भेटलो आपण कितीदा बोललो आपण* 
 *मला बोलायचे तेही कधीही मी बोललो नाही*

 *कितीदा नेमक्या वेळी असे मागेपुढे झालो*
*कधी आलो जवळ तेव्हा जवळचे वाटलो नाही*

- देविदास हरिश्‍चंद्र पाटील, रत्नागिरी


 *चालती येथे हजारो माणसे*
 *मात्र होते वेगळे माझे ठसे*

   *कासवांशी शर्यती लावू नका*
*लाजुनी सांगायचे गोरे ससे*

*सारखी झोळीत असणार याकडे*
*लक्ष कोणी देत नाही फारसे*
    -अजीज हसन मुक्री, राजापूर

*लाडिकसे घुंगुरवाळे रस्त्यातुन वाजत गेले*
 *अंगावर हलकी हलकी कोवळीक पसरत गेले*

 *कुठल्याही पंथामध्ये मी कधी मिसळले नाही* 
 *जे दिसले  सुंदर निर्मळ  तेवढेच वेचत गेले*
 
 *मोकळे बोलणेसुद्धा वाटली खूपदा शिक्षा*
 *अन बरे वाटले जेव्हा काळजात साठत गेले*

 *तू हसल्यानंतर कसली माझ्यावर जादू झाली*
 *रंगीत पाखरू कोणी हृदयात भिरभिरत गेले*

 *मेलेले होते म्हणुनी ते काही बोलत नव्हते*
 *जे जिवंत होते तेही मेल्यागत वागत गेले*

 *चिरडून मारण्यामध्ये संपली जिंदगी ज्यांची*
 *मुंगीचे मरणे त्यांचे काळीज पिळवटत गेले*

- उत्तरा जोशी

*तसा छोटाच पॅराग्राफ आहे मी*
*असू द्या.. एक छोटा विषय आहे मी*

*न सांडावे कुठेही रक्त किंचितसे*
*असा हळुवार रेशिमवार आहे मी*

*तुला वाटे कसा मी सांग, वारा की*
*न दिसणारा हवेचा दाब आहे मी?*

*कधी रोखून धरतो तो भितीने की*
*कठिणसा सोडलेला श्वास आहे मी?*

*तशी आलीच जर का वेळ माझ्यावर*
*तुझ्या पानांमधे लपणार आहे मी*

*कुठे रेंगाळतो कोलाहलामध्ये*
*मनीच्या घुंगुरांचा नाद आहे मी*

*कसा झुंजू खवळत्या या प्रवाहाशी*
*भरुन आल्या नदीचा काठ आहे मी*
  - विजयानंद जोशी, रत्नागिरी 



*गंध जर तुम्हास परिसरात पाहिजे*
*छानसा गुलाब अंगणात पाहिजे*

*ओळ पाहिजे तशी तुला सुचेलही*
*एक चंद्र आपल्या मनात पाहिजे*

*जा नि आण पाखरा झकास बातमी*
*ती मला दिल्या घरी सुखात पाहिजे*
    
    - केदार पाटणकर,चिपळूण


*वाटते की दूर जावे फार आता*
*राहिली ना कोणती तक्रार आता*

*कालपरवाचीच आहे बातमी कि*
*माणसे होतील सारी ठार आता*

- दिनेश केळुसकर, रत्नागिरी- कणकवली


*प्राजक्ताचा जन्म मिळावा समोर यावे दार तुझे*
*अगदी नकळत स्पर्श हजारो व्हावे वारंवार तुझे* 

*परत कधीही होणे नाही निवडणूक या मनामधे*
*तुझीच सत्ता जन्म सातही कायमचे सरकार तुझे*

*दारे, खिडक्या, तुळस, माजघर, गाभारा हि विहिरहि*
*तुझा न उरलो मी आता पण अजून हे घरदार तुझे* 

- कौस्तुभ अरुण आठल्ये ,रत्नागिरी 


*पुन्हा आठवण छळते आहे* 
*अश्रूंना बोलवते आहे*

 *मनात झाले गिधाड जागे*
*स्वप्न कोणते सडते आहे*

*स्वप्नामध्ये असावीस तू* 
*रात्र पटापट सरते आहे*
 - सचिन मणेरीकर,दोडामार्ग

   
आता काही मालवणी गझला पाहू...

*सांग तुझ्या काळजाक माझे स्पर्श घुटमाळतत कशे ते*
*बघ तुझ्या कलमार माझे श्वास म्होवार्तत कशे ते* 

*मी तसो आंगाक माझ्या लाव्न घेव्चय नाय काय्यक*
*जा इचार वा-याक माझ्या केस इस्काट्तत कशे ते*

*पाय तू ठेय्शीत थय्सर पसरलय काळीज माझा*
*गो नको सांगाक माका पैंजणी व्हाज्तत कशे ते* 

*नाय गो समजाचा तुका ह्या पापण्यांचा राजकारण*
*आवाज नाय येणा तरीपण गजाल बघ सांगतत कशे ते*

*घे जरसो रंग माझो लाव्न तू गालाक आप्ल्या*
*मग तुका सम्जात गुलाबी गाल हे आस्तत कशे ते*

*वाय्चसा काजाळ माझा लाव तुझ्या डोळ्यांत निळसर*
*आणि बघ फुलवित पिसारे मोर तुझे नाच्तत कशे ते*

गोविंद नाईक ,वेंगुर्ला


*पाव्ळेक पाशिटा तू सांगा नको गजाली*
*सगळे तुझे मिजाशी येतत वरून खाली*

*इतको तुझो कसो गो चेहरो खुलान येता?*
*वाट्ता जशी दवांतच निक्ती सकाळ न्हाली ...*

*आता नको दडव ता पोटात दु:ख सगळा*
*डोळे बघून कळता सगळी तुझी खुशाली* 

*कोणीच नाय काय्येक बोलनत घरात आता,*
*चिकटान भिंतियेकच ऱ्हवतत कित्याक पाली ?*

*खयच्या दिशेक नक्की चललव खरेच आपण*
*हातात जातियेचे दिसतत बरेच ढाली*

*देता निसर्ग जा जा, ता ता जपून ठेया*
*नायतर नसात कोणी नंतर जगाक वाली* 

*दररोज फक्त आता स्वप्नात गाव येता,*
*बहुतेक याद माझी गावाकडे निघाली ....*

-अनिल वि. आठलेकर, 
 कुडाळ

-मधुसूदन नानिवडेकर
............................. 

फाॅरवर्डेड बाय :  श्री. अनिल अ. शिवलकर
फाॅरवर्डेड मेसेज  :

🟣 *दिनविशेष* 

🔖  *गुरुवार दि. २५ जून २०२०*

▪️ १९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.

▪️ १९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.

▪️ १९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.

▪️ १९८३: भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.

▪️ १८६४: नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म.

▪️ १८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांचा जन्म.

▪️ १९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.

▪️ १९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म

▪️ १९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.

▪️ १९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.

▪️ १९७९: मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब यांचे निधन.

▪️ १९९७: फ्रेंच संशोधक जॅक-इवेसकुस्तू यांचे निधन.

▪️ २०००: मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.

▪️ २००९: अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: