सोमवार, २७ जुलै, २०२०

बापाचं मन

 
मागे - पुढे

12.07.2020

गेल्या भागात आपण सुरूवातीलाच आमचा मुलगा आणि आम्ही लॉक डाऊनमुळे दोन ठिकाणी अडकल्याचे वाचले आहेच. कुठे लॉक डाऊन तर कुठे अनलॉक , कुठे लॉक डाऊन 7,8,9... तर कुठे अनलॉक 1,2,3.... खरे तर हे सगळे प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचेच प्रयत्न ! आतापर्यंत मुलगा ब-याच अंशी सुरक्षित राहून वर्क फ्राँम होम करीत होता. पण तो राहतो तिथून अवघ्या पाचशे मीटरवर पंधरावीस कोरोनाबाधित सापडल्याने तो एरिया सील करण्यात आला आहे . तिथे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. आता त्याला इथे आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही. गेले दोन तीन दिवस हयाच कामात मग्न आहे. तिथला लॉक डाऊन उठल्याशिवाय काहीच करता येणार नाही. मग मात्र विकीला गाडी घेऊन मुलाला आणलं पाहिजे. मी कालच विकीशी बोललोय. 

         काल रात्री मी मुलाशी हे बोललो . तोही समजुतीने बोलला. तो यायला तयार आहे म्हटल्यावर आम्ही अनेक महिन्यांनी आनंदीत झालो . पण हा आनंदही क्षणिकच ठरला. रात्री साडेबारा वाजता बेबीचा हिला फोन आला. ती रडूच लागली. मला काही समजेचना ! शेवटी हिने समजूत घालून काय झाले ते विचारले तर तिचा जावई दवाखान्यात असल्याचे समजले. तिच्या मुलीचं लग्नात आम्ही प्रमुख भूमिका निभावली होती. लग्नं झाल्यानंतर उद्भवलेल्या काही अडचणींवर मात करण्यात मी स्वत: यशस्वी झालो होतो. त्यानंतर मात्र त्यांचा संसार सुखाने सुरू झाला होता... आणि आता हे अचानक .... आम्हांला धक्काच बसला ! हिच्याबरोबर बेबी अर्धा तास बोलली तेव्हा कुठे जरा तिचं मन मोकळं झालं .  पण आमचं मन ? आमच्या आयुष्यात आनंद उपभेगायचं सुख नाहीच का ? असा विचार करीत करीतच आम्ही रात्री दीड वाजता अंथरूणावर पडलो. 

        13.07.2020 च्या रात्री पुन्हा बेबीला फोन केला तर  तिचा जावयाची तब्ब्येत खूपच खालावली होतीे. 48 तासाचा अवधी फार महत्वाचा आहे. हे ऐकून आम्हांला काही सुचेनासेच झाले . त्याही परिस्थितीत आम्ही बेबीला धीर दिला. कोरोनामुळे पुण्याला जाताही येत नाही. काय काळ आला आहे माणसांच्या ताटातुटीचा ! माणसाला माणसाकडे सीधे जाता येत नाही, भेटता येत नाही !

13.07.2020 ला सकाळी 11.15 वा. बेबीचाच फोन आला
. लो झालेला बी.पी. नाँर्मल झालाय. हात पाय हलवतोय. तेवढेच समाधान वाटले. 
14.07.2020 .... अखेर घडायचे ते घडलेच ! बेबीचा जावई गेलाच ! आज रत्नागिरीतील संजीव साळवीही गेल्याची बातमी आली... दोन्हीही चटका लावून गेले...
.......
15.07.2020 आत्महत्या केलेल्या तरूण वकिलीच्या घरी बंदूसोबत सकाळी साडेनऊला हाक मारून आलो. 

बेबी , तिचा मुलगा व उर्मि उद्या पुण्याला जाणार आहेत. ड्रायव्हर बंटी.
..............
21.07.2020
गेले काही दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये श्रावणातील नामसप्ताह , एक्के इ. कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी मिळणार का , याबाबत बैठका होत होत्या. यामध्ये आमच्या शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरातील नामसप्ताहाचाही अंतर्भाव होता. अखेर , कोरोनासंदर्भातील सर्व प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करून फक्त मंदिरातील धार्मिक विधीं करायच्या हे ठरले . त्यानुसार , सालाबादप्रमाणे आज श्रावणातील पहिल्या दिवशी आमच्या गावात विविध मंदिरात नामसप्ताह सुरू झाले. 
..........
24.05.2020
गेला आठवडाभर काही ना काही घडतंच आहे ! मागे उर्मीच्या घराचा स्लँब होऊन गेला आहे. बंदू त्याच्या बायकोच्या काहीलआर्थिक उचापतींमुळे त्रस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या अगदी शेजारीच असलेल्या नवलाई पावणाई मंदिरात खबरदारी घेत घेत नामसप्ताह सुरू आहे आणि तिकडे रत्नागिरीतली कोरोनाची संख्या वाढते आहे.
दुकानदार , डाँक्टर्स यांना लागण झाली आहे. 
.......
25.07.2020
मुलगा यायला तयार आहे , पण कंपनीच्या कामाकरिता आवश्यक ती इंटरनेटची स्पीड आमच्याकडे मिळत नाहीय. कालपर्यंत विविध पर्याय शोधत होतो. काल रात्री राऊटर वापरून जरा जवळपासची स्पीड मिळालीय. आता मुलगा कंपनीला बोलून फायनल करतो म्हणाला. 

26.07.2020
तिकडे दूरवर फेसबूकवर मराठी गझलकारांमध्ये कुलकर्णी - पाटील वाद सुरू झालाय. प्रश्न दस्तूरखुद्द मराठी गझलच्या बापाचा म्हणजे सुरेश भटांचा आहे . पोर बापालाच आव्हान देत असल्याने व बाप मला सदैव वंदनीय असल्याने मीही दोन शेर फेसबूकवर टाकलेच. 



27.07.2020
शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात कोरोनाचे नियम पाळून  नामसप्ताहातील धार्मिक कार्ये सुरू आहेत. उद्या नामसप्ताह समाप्ती आहे. 

बाकी मागे पुढे सगळे ठीक आहे. घरातच समस्या आहे. सौ. मुलाच्या विषयामुळे त्रस्त आहे. एकच विषय डोक्यात सतत ठेवल्याने काय होणार ! समजावूनही तिची समजूत पटत नाहीय. शेवटी ती आई आहे. पण आईपणाचा अतिरेक झाला की बबडेच तयार होतात. बापालाही मन असते, भावना असतात , व्यथा असतात, वेदना असतात , त्याने आपले दु:खं  कुणाला सांगायचे ? त्याला कोण समजावणार ? आयुष्य फार विचित्र होऊन बसले आहे, हेच खरे !
........

( क्रमश: )
...........











     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: