मंगळवार, ७ जुलै, २०२०

A question about life



07.07.2020 

     दि. 24.06.2020  नंतर इथे लिहीलंच नाही. याचा अर्थ इतके दिवस मागे-पुढे काही घडलंच नाही असं नाही. तसं ते घडतच राहतं . सृष्टीच्या प्रारंभापासूनच घटनाचक्र फिरते आहे. खरे तर त्यापूर्वीपासूनच ते फिरत असावे.  सृष्टीचा जन्म हीसुध्दा त्या घटनाचक्रातली घटना आहे. अधिक माहितीसाठी  घटनाक्रमाबाबत मी लिहिलेल्या इंग्रजी लेखाच्या हया लिंकला टच करा. अशीच एक घटना होती 28 वर्षापूर्वी घडलेली. तारीख 07-07 च होती. वार वेगळा होता. पण ती घटना माझ्या वैवाहिक जीवनात पुढे घडणा-या सर्व घटनांची जन्मदात्री होती. तर 07-07 रोजी मी माझ्या तत्कालीन भावी पत्नीला बघायला गेलो होतो , जी हे लिहीत असतांना आताही माझ्या शेजारी तिच्या मोबाईलमध्ये तिचे अस्वस्थ मन रमवण्याची कसरत करते आहे. याचे कारण मार्च 2020 पासून आम्ही दोघेही आमच्या मुलाच्या काळजीने हैराण आहोत. आमचा मुलगा पुण्यात नोकरीला आहे. तो तिथे फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. होळी पौर्णिमेला आम्ही गावी आलो होतो व गुढी पाडव्यानंतर लगेच पुण्याला जाणार होतो. तितक्यात कोरोनाचा प्रकोप झाला . तोे तिकडे अडकला आणि आम्ही इकडे ! त्याच्या काळजीने आम्हांला काही सुचेनासे झाले आहे.  तर आज 07-07. त्यामुळे सकाळीच हिच्या वहिनीचा मला मेसेज आला. 
    [7/7, 10:34] Vibha 1: Chaha, nashta zala?
[7/7, 10:35] Vibha 1: Aaj kay special breakfast?
        काय सांगणार होतो ? सांगितलं जे घडतंय....
कालपासून हिची मन:स्थिती ठीक नाही. त्यातच काल रात्री सव्वा बाराच्या दरम्याने हिला भयंकर स्वप्नं पडलं. काही तरी भयंकर घडतंय हे बघून ही स्वप्नातच मुलाला हाका मारून उठवत होती . हाका मारतामारता तिची बोबडीच वळते आणि जीभ दाताखाली मिळते . ती झोपेतच उ उ करायला लागली म्हणून मी तिला उठवलं. तर ही घाबरलेली. मी पाणी दिलं ते पिऊन ती थोडी भानावर आली.  म्हणाली मला कोणाच्या तरी मानेवर दोरीचा निळा वळ दिसला स्वप्नात. त्यानंतर  आज सकाळी सात वा. मेघाचा फोन आला. आम्ही ज्यांच्या विहीरीवरून पाणी आणतो त्या समोरच्या घरातल्या मुलाने मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली ! म्हणजे तिकडे ते घडत असतांनाच बहुधा हिला हेे स्वप्नं पडत असावं. तो वकील होता. रत्नागिरीत बायको व मुलीसह रहात होता.  केवळ 34 वर्षांचा ! आम्हांला मुलासारखाच ! फार धक्का बसला. आता आमची दोघांचीही मन:स्थिती बिघडली आहे. पाऊसही सकाळपासूच धुव्वाधार कोसळतोय. अशा पावसात तिकडे जाताही येत नाहीय. आम्ही दोघंच घरात आहोत. एकमेकांना खचलो आहोत हे दाखवण्याचे टाळून धीर देत आहोत. 

              परवाच आमच्या मागच्या बाजुच्या दोन घरे सोडून तिस-या घरातली वनिता पायरीवरून तिच्या दारात पडली. तिचा डावा हात प्लँस्टरमध्ये आहे. गेल्या वर्षी ती बसला लटकत फरफटत गेली होती. नशिबाने वाचली.   तिच्या अलिकडच्या व आमच्या अगदी मागच्या घरातील संत्याचा भाऊ संज्याची तब्ब्येतही तितकीशी चांगली दिसत नाहीय. परवा कलू आते आमच्याकडे राहून गेली. संध्याकाळी आली आणि दुस-या दिवशी सकाळी चहा नाश्ता खाऊन ती आपल्या घरी गेली. संध्याकाळ झाली की एवढं मोठं घर आम्हां दोन म्हाता-या माणसांना कसं खायला येत असेल , ते कलू आतेला जाणवलं . कलू आतेने निग्रहाने लग्नं केलेलं नाहीय. ही स्टोरी कधी तरी नंतर सांगेन. तिची हकीगत आता सांगण्याच्या मन:स्थितीतही मी नाहीय. एवढं खरं की कधी कधी वाटतं की आयुष्य ही आपणच आपली घातलेली एक समजूत तर नसावी ना ? 


( क्रमश: )
...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: