रविवार, ३ मे, २०२०

Nothing to say more अधिक सांगण्यासारखे काही नाही


मागे - पुढे

02.05.2020

         आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणचाळीसावा दिवस.  सकाळपासून फारसे मागच्या वा पुढच्या दारावर विशेष असे काही घडलेच नाही.   चिपळूण व संगमेश्वर येथे मिळून दोन कोरोनाबाधित रूग्ण मिळाल्याची बातमी आली आहे. संपूर्ण दिवसांत लंबूवहिनी कुठे झळकली नाही , हेच आजच्या दिवसाचे विशेष ! तिकडे चीन अमेरिका जोरात सुरू आहे. भारतासारखे देश मध्येच लटकत राहणार हे उघड आहे. धड चीनचा बहिष्कारही करता येत नाही आणि अमेरिकेच्या पुरस्काराचा मोहही सोडवत नाही. अमेरिका जे करायचे ते करतेच आहे. ते पक्के व्यापारी लोक . आपल्याला सोयीनुसार वापरायलाच बघणार. आम्ही त्यांच्याकडून आमच्याबद्दल  साधारणसे का होईना पण दोन शब्द आमच्याच कानावर कधी पडतात त्यासाठी तोंड उघडे करून बघत बसलेलो असतो ! प्रजासत्ताक लोकशाही देशाची मान आपण किती ताठ ठेवतो आहोत ! इकडे महाराष्ट्रात उतावळा नवरा आणि नाच्या कंपनी व-हाड लिमिटेड आपल्याच गळयात माळ पडणार या कल्पनेने कोरोनात लोकांचे जीव जात असतांनाही सतत मोहरलेले असतात ! मुंबईचे आयएफसी गुजरातला हलवून मुंबईला अनेक वर्षे तरी फारसा फरक पडणार नाही. मुंबई ही काही एक दोन वर्षात उभे राहिलेले ठिकाण नव्हे ! त्यामागे अनेकांचे कष्ट , प्रामाणिकपणा , नीतीमत्ता , कल्पकता व हुशारी हे गूण आहेत. हा पाया भक्कम आहे. बालीश प्रयत्नांनी तडा जाण्याएवढा तो नक्कीच कमकुवत नाही !
बाकी कोरोनाचा प्रसार होतोच आहे. बरे होणा-यांचेही प्रमाण ब-यापैकी आहे. तिन्ही सेनादलांकडून कोरोना वॉरीयर्सवर पुष्पवृष्टी केली जात आहे. तिकडे नाशिकहून परप्रांतीयांना ट्रेनने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे. आता इतर ठिकाणांहूनही हेच होणार आहे. पुण्यात  तहसिलदार कार्यालयात प्रवासासाठी परवाने मिळणार असा संभ्रम पसरल्याने लोकांनी तोबा गर्दी केली आहे. वास्तविक पुढील सूचना मिळण्यासाठी लोकांकडून फक्त त्यांचे ईमेल अॅड्रेस तेही अाॅनलाईनच मागविण्यात आले होते.  एकूणच लॉक डाऊनबाबत लोक प्रचंड संभ्रमात पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा त्रासही प्रचंड वाढतो आहे. लोकांसाठी काही करायला जा , ते त्यांना करायचे तेच करतात ! थाळया वाजवायला सांगितले की ड्रम वाजवतात. फटाके वाजवतात. कोणत्या वेळी काय करावे हेच त्यांना कळत नाही असे झाले आहे. हे लोक भारताला जागतिक महासत्ता बनवण्यात महान योगदान देणार आहेत म्हणे ! तेही बुलेट ट्रेनच्या ( काल्पनिक ) वेगाने !
            बाकी सकाळ , दुपार क्रमाने पार पडली आहे. आता संध्याकाळ झाली आहे. ही खालच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करतेय. मी पाण्याचा साठा पाहून झाडे शिंपू की नको या विचारात पडलो आहे. अखेर मागच्या अंगणातली दोन झाडे शिंपली. खालच्या बाजूची झाडे शिंपण्याएवढे पाणी शिल्लकच नव्हते. आज लंबूवहिनी अजून खाली आलेली नाही. रस्त्याने दुकानात जाणा-या चिंग्याला सौ.ने बिस्कीट पुडे व दूध आणायला पैसे दिले . रात्र झाली. आज दूध बिस्कीटे खाऊन पोटाला आराम दिला . रात्री अकरा वाजता लादीवर पहूडलो.

( क्रमश: )
...........

शनिवार, २ मे, २०२०

The missing clue हरवलेला दुवा


मागे - पुढे

01.05.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अडतीसावा दिवस. 01 मे. महाराष्ट्र दिन + कामगार दिन. त्याच्या पूर्वरात्रीला अर्धी रात्र झोपच आली नाही. आधीच गरम्यामुळे झोप येत नव्हती.  त्यात रात्री 11.15 ला मेसेंजरवर झोप उडवणारा मेसेज आला. तो असा :

 🔴 *रत्नागिरी खबरदार ब्रेकिंग न्यूज : मुंबई ते आंध्रप्रदेश व्हाया रत्नागिरी गाडीतून जाणारा एकजण आढळला कोरोना पॉझिटिव्ह*

➡️ *रत्नागिरी :* पाईपच्या गाडीतून रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या तीन इसमांना मलकापूर चेक नाक्यावर पकडले असता त्यातील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर इसमाला शाहुवाडी पोलिसांनी मलकापूर चेक पोस्टवर २६ एप्रिल रोजी पकडले आहे. हा इसम मुंबईतून रत्नागिरीत आणि रत्नागिरीतून कोल्हापूरकडे जात होता अशी माहिती मिळत आहे. रत्नागिरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस या इसमाच्या प्रवासाची साखळी शोधत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रत्नागिरी खबरदारला दिली आहे. रत्नागिरीतील एका नामांकित कंपनीत हा ट्रक आला होता व या ट्रक मधून या इसमाने प्रवास केला आहे अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

*रत्नागिरी खबरदार*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
www.ratnagirikhabardar.com
10:30 PM 30/Apr/2020

              तिकडे कोरोना मुक्त म्हटला गेलेला सिंधुदूर्ग जिल्हा असाच पुन्हा कुणा बाहेरून आलेल्या कोरोनाग्रस्तामुळे धास्तावला आहे. आता मलकापूरात सापडलेला माणूस रत्नागिरीत कुणाकुणाला भेटून गेला आहे , काय माहीत ! पुन्हा एकदा पोलीसांना साखळी शोधायचे काम करीत बसावे लागणार. लोकांनाच शिस्त नसेल तर पोलीस तरी कुणाकुणाच्या मागून धावणार !  यानंतर तर परदेशातून माणसे आणली जाणार आणि पुण्यामुंबईतून चाकरमानी कोंकणात आणण्यात येणार , यावरही चर्चा सुरू आहेत. हा जर विचार असेल तर पुण्यामुंबईत ज्यांच्या मुलांना नोकरीधंदयामुळे एकटे राहणे आजही अपरिहार्य झाले आहे , त्यांच्या मदतीला  किमान त्यांच्या आईवडिलांना कोंकणातूनही पुण्यामुंबईला जायचे असल्यास जाता यावे , अशी त्यांची अपेक्षा असणारच आहे. याही विचाराचा विचार शासनाला करावा लागेल असे दिसते.  असो. तर शेवटी रात्री एक वाजता पलंगावरून खाली नुसत्या लादीवर जाऊन झोपलो. तेव्हा कुठे दोनच्या दरम्याने जरा झोप लागली . सकाळी नळाला पाणी येणार नसल्याने सहा वाजता जाग येऊनही पुन्हा झोपलो तो पावणेआठला उठलो. अकरा वाजता उदू येऊन गेला. बाकी कुणीही आलेले नाही. दुपारी दोन वाजता जेवलो . जेवताजेवता मला मिनाक्षीच्या माहेरच्या घराकडे जाणारा रस्ता दिसू लागला. विशेषत: तो पूल आणि त्यापलीकडील भाग दिसला आणि माझी लिंक तुटली. ब-याच दिवसांनी मला हा अनुभव आला. मी लगेच सौ. ला मिनाक्षी संदर्भात एक दोन प्रश्न विचारले. लिंकबाबत काहीच सांगितले नाही. जेवल्यानंतर शतपावली झाली. वामकुक्षी  करता करता झोपच लागली ! पाच वाजता मुलाचा फोन आला तो घेतांनाच पुढच्या दरवाजावर जोरातच थापा ऐकायला आल्या तसा मी धडपडत उठलो. एवढी कोणाला अर्जन्सी आहे म्हणून शर्ट न घालताच दरवाजा उघडला तर बाहेर मराठवाडीतल्या दोघीजणी !  त्यांना बसायला सांगून सौ. ला उठवलं. सौ.ला त्यांनी बीनाच्या आईला बोलवायला सांगितले. मला जेवतानाची माझी लिंक व मीनाक्षीची मी सौ.कडे केलेली चौकशी आठवली. आतापर्यंत पार हिमालयातल्यावगैरे दूरच्या गोष्टी डोळयावर दिसत होत्या, आता तर जवळच्याच गोष्टी दिसतायत आणि त्याची प्रचितीही अवघ्या तीन तासातच येत आहे ! हे गूढ काय आहे ? काही गोष्टी मला उघडया डोळयांनी का दिसतात ? त्या कोण दाखवतंय आणि का ? कळत नाही !  बीनाची आई आली आहे. त्यामुळे  त्यांची चर्चा सुरू झाली आहे. मी आतल्या खोलीत बसून ऐकतो आहे.  प्रकरण गळयाशी आलेले आहे असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. मीनाक्षीने उसने पैसे घेतले आणि त्यानंतर काही कारणांनी ती जी माहेरी जाऊन बसली ती वर्ष होत आले तरी सासरी येतच नाहीय. फोनही उचलत नाही.  बीनाच्या आईने त्या कर्ज प्रकरणात मीनाक्षीची जबाबदारी घेतल्याने ती अडचणीत आली आहे. मीनाक्षीचा नवरा पैसे देतो देतो एवढेच सांगतो आहे. थोडे थोडेही देत नाहीय. त्यामुळे त्याचा विश्वास हया बायकांना नाहीय. शेवटी तुम्ही दोन दिवसांत पैसे द्या नाही तर वाईटपणा येईल , असे बीनाच्या आईला निक्षून सांगून त्या दोघीही गेल्या.  आता सात वाजले आहेत. हिने बातम्या लावल्या होत्या पण फोन आल्याने ती बीनाकडे गेली आहे तोपर्यंत मी चँनेल बदलले. बीबीसीवर इंग्लंडमधल्या चीनच्या अँम्बँसीडरची मुलाखत चालू आहे. ते महाशय प्रत्येक आरोप नाकारत आहेत. सत्य अजूनही जगापासून दूर आहे. राहवत नाही अशावेळी हटकून कविता जन्म घेते. वाचा माझी ताजी कविता इथल्याइथे....

ज्याला त्याला आपापल्या देशात आपापली खुर्ची टिकवायची आहे  !
सत्ताचक्रात अडकलेल्यांची तडफड बघवत नाही !
कोरोनाचा कोणताच धागा कोणाशीच कोणी जुळवत नाही !
कोरोनापूर्व वर्षभर झालेल्या मान्यवरांच्या सगळयाच गळाभेटी पारदर्शक असतील काय ?
राजकीय व्यापारीकरणाची महत्वाकांक्षा जागतिक महासत्तेचे गाजर दाखवून काय साधत होती बरे ?
करोडो माणसांचे कोरोनामागचे असलेच जर खुनी तर ते मूठभर असतील काय ?
चीन अमेरिकेकडे आणि अमेरिका चीनकडे बोट दाखवीत राहीलही ,
कदाचित चीनला शिक्षा होईलही पण त्यानंतर घडलेल्या मानवी हत्याकांडात जगाचा इटली होऊन गेला आहे , हे सत्य राहीलच !
विमानातून आयात केलेल्या कोरोनामुळे मधल्यामध्ये आपलाच इटली होतांनाही आपण भांडत राहू आपल्यातच,
कुणाच्या तरी राजकीय महत्वाकांक्षांना खतपाणी घालीत ,
डोळयांवर भक्तीची आणि गुलामीची पट्टी लाऊन !

                   बघा कवितेतून काही दुवा मिळतो का ? नाही तरी  बातम्या सुरू आहेतच ...भारतात केंद्र सरकारने 03 मे रोजी संपत असलेला लॉक डाऊन 04 मे ते 17 मे 20  पर्यंत वाढवला आहे. झोननिहाय शहरांची विभागणी झाली आहे. बातम्या सुरू आहेत. बातम्याच सुरू राहणार आहेत. जगाचा अंत झालाच तर त्याची शेवटची ब्रेकींग न्यूज कोण सांगणार आहे आणि कोण ऐकणार आहे ?

( क्रमश: )
...........






   








शुक्रवार, १ मे, २०२०

न लिहिण्याचा दिवस

मागे - पुढे

30.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सदतीसावा दिवस.

          क्षमा करा , पण कोेरोना व्हायरस जगभरात घेत असलेले बळी आणि त्यासह भारतीय सिनेजगतातील

      निखळतो हा एकेक तारा 
     सोसते पृथ्वी रोज धक्के !

..... या विषण्ण अवस्थेतील पार्श्वभूमीवरही होत असलेले घाणेरडे राजकारण   ....
यामुळे आज काही लिहिवतच नाहीय.....


( क्रमश: )
...........







   








गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

Corona virus capturing minds

मागे - पुढे

29.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग छत्तीसावा दिवस.  पिंपळपानाचा काढा उकळत ठेवला आणि पावणेसातला नेहमीच्या वेळेवर पाणी बघायला मागच्या दारी आलो. पाणी आलेले नाही.  तिकडे बंदू वाट बघतोय आणि  इकडे मी. अखेर सात वाजता पाणी आले. मी सौ. ला उठवले आणि पाणी भरायला आलो. पाणी भरून झाले तसा पुढे हाँलमध्ये येवून आत येणारी सूर्यकिरणे अंगावर घेत बसलो. साडेसातपर्यंत सूर्यप्रकाश बरा होता. पण मग आकाशात ढग जमू लागले. चहा पिऊन होईपर्यंत बारीक बारीक पाऊस पडू लागला ! लहानपणी या पहिल्या पावसाचे किती अप्रूप असायचे ! तेव्हा ऋतूचक्र कसे नियमित असायचे.  पण आता  कोणताही ऋतू कधीही सुरू होतो. अवेळी पाऊस येतो तरी किती वेळा ? निसर्गा , तुझे आता फारसे अप्रूप राहिले नाही, कदाचित माझी पिढी आता साठीत आली म्हणूनही असेल कदाचित ! याच साठीतल्या आणि पन्नाशीतल्या काही बायका डोंगरावर सकाळच चिकनपार्टी करायला चालल्या आहेत ! तिकडे खाली मासेबाजारात गर्दी झाली आहे . आज बुधवार आहे. वार कोणताही असो, महामारी असो वा पाऊस असो , माणसे जिथे जायची तिथे जातातच आणि करायचे ते करतातच ! गंमत म्हणजे माझ्या या शब्दांशी सौ. चिकनपार्टीला निघता निघता सहमती दर्शवत होती ! स्नेहाचे फोन येत होते. पाऊस नुसताच जरासा  रिमझिमला आणि गेला . ही बाहेर पडली तेव्हा सूर्य आशेची किरणे पुन्हा दाखऊ लागला होता. पावणेनऊ वाजता पुन्हा सूर्यकिरणे गायब झालीत तेव्हा मी मागच्या दारी आलो. बंदूच्या घरात नुकताच सत्त्या स्थानापन्न होऊन घाम पुसत बसला आहे. आजकी बात सुरू झाली आहे. हळूहळू बंदूमंडळातील इतर सभासद येतील. पुढच्या दारी आलो तर गेट उघडून लंबूवहिनी अलगद गच्चीवर सुकवण घालायला जाते आहे. मीही अलगदपणे दरवाजा लावला . म्हणजे मांजर जर डोळे पिऊन दूध पीत असेल व तिला वाटत असेल की आपल्याला कोणी पहात नाही , तर राहू दे ना तिला तिच्या भ्रमात ! सुकवण घालून झाले तशी लंबूवहिनी गेट उघडून मांजराच्या आल्या पावलांनी जाते आहे. आज काही बातमी नसावी ! त्यात ही घरात नाही ती बातमी तिला आधीच लागलेली आहे ! माणसे चँप्टर का असतात ? ती साधीसरळ का वागत नाहीत ?

       आंघोळीनंतर श्रीपाद श्रीवल्लभांवरील पुस्तकातली आरती म्हणून बाहेर आलो तोच ज्येष्ट गझलकार मित्र वा. न. सरदेसाईंचा फोन आला. सद्या ते भांडूपमध्येच आहेत. त्यांचा मुलगा प्रमोद हाच त्यांची प्रसिध्दी करत असतो ! आजकाल हे फारच दुर्मिळ आहे ! मला प्रमोदचे खूप अप्रूप वाटले. माझ्याही मुलाचा मी काय लिहितो इकडे बारीक लक्ष असतो , पण प्रमोद त्याही पलीकडे आहे. वडिलांच्या कविता, गझलावगैरे तोच प्रसारीत करीत असतो ! हा फोन झाला आणि दुसरा फोन आला. अननोन नंबरवरून . पण ती मुलगी विचारत मात्र होती की , '' पाटील सर , संकूलची चावी तुमच्याकडे आहे ना ? '' बोलणारी माणसं कोण बोलतंय हे न सांगताच सरळ बोलत सुटतात. मी संभ्रमात ! मी नाही म्हणालो आणि कोण बोल...म्हणतोय तोपर्यंत फोनच कट केला गेला ! तिला हवा होता तो मीच पाटील सर होतो की आणखी कुणी पाटील सरांना तिने माझ्याच नंबरवर फोन केला होता ? बरं सौ.कडे कोणी चावी दिल्याचंही ती बोललेली नाही ! दिवस असा पुढे सरकतो आहे. सौ. तिकडे साळकायामाळकायांसोबत हड्डी  तोडत असणार. मी इकडे लिहीतोय ! वागवली परिसरातले काही फोटो पहा .
 
 
 

 जाधव  मॅडमच्या गझलची आठवण झाली आहे. त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या गझलला व्हॉट्सॲपवरच थोडे लाईनवर आणतो आहे. नवी पिढी हुशार आहे. फारसा हात फिरवावा लागत नाही. लवकर पीकअप करतात. जाधव  मॅडम महाविद्यालयीन शिक्षिका असल्याने खूप बिझी असतात.  त्यांना गझलसंर्भात फोनवर चर्चा करणे वेळेअभावी शक्य नव्हते. म्हटले चला, आपण त्यांच्या मनाने त्यांची गझल समजून घेऊ आणि आवश्यक असेल तरच बदल करू. तेही थेट व्हॉट्सॲपवरच !  आवश्यक तो बदल करून गझल व्हॉट्सॲपवरच पाठवून दिली आहे ! मलाही हा नवा प्रयोग आहे. कागदावर मांडून वेळ घालवण्यापेक्षा थेट मोबाईलवर काँपीपेस्ट करून बदल करणे बरे वाटले ! जाधव  मॅडमचा आलेला प्रतिसाद पाहता मला हे ब-यापैकी जमेल असे दिसते आहे.  नव्या पिढीकडून अशा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गझल संपल्यानंतर सव्वा वाजता एकटाच जेवलो.  नंतर शतपावली तर दोन तास झाली ! वामकुक्षी काही जमलीच नाही. मोबाईलवरच होतो. टीव्ही मात्र लावला नाही. तेवढीच शांतता ! फेसबुकवर अभिनेता इमरान खान  गेल्याच्या पोस्टस् आल्यायत. एक कसलेला उमदा अभिनेता चटका लावून गेला.  भावपूर्ण श्रध्दांजली.

        चार वाजता पुन्हा आकाश भरून आले. हयावेळी खूपच . दहापंधरा मिनिटातच वारा आणि पाऊसही सुरू झाला. तो पंधरावीस मिनिटं पडला. पावसामुळे सौ. पार्टी डोंगरावरच अडकली होती. सव्वा पाच वाजता ती घरी आली. सहा वाजता लाईट गेली ती पावणेआठ वाजता आली. सौ. ने टीव्ही लावला आहे. केंद्राने प्लाझ्मा थेरपी उपयुक्त नसल्याचे म्हटले असले तरी लीलावती रूग्णालयातील कोरोनाबाधितावर त्याव्दारेच यशस्वी उपचार झाले , अशी बातमी सुरू आहे. धारावीत 24 कोरोना फायटर्स स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाशी लढत आहेत . याला खरी छाती म्हणतात, खरी हिंमत म्हणतात !  सर्वत्र कोरोनाचा विषय आहे. सर्वात वाईट म्हणजे काही थिल्लर बिनडोक अर्धवटराव याही स्थितीत राजकारण करत आहेत ! याहून वाईट म्हणजे त्यांच्याकडे आपली अक्कल गहाण टाकलेली शेंबडी पोरे फेसबूकवर राजकारण करत आहेत ! शिकूनही अडाणी असलेली काही कच्ची मडकी एकमेकांना अंधभक्त आणि गुलाम म्हणू लागली आहेत , यावरून यांना देश आणि देशभक्ती किती कळते, यांची पोच किती , हे कळते. कोरोनाने अनेकांच्या डोक्यावर परिणाम केलेला दिसत आहे. आपण झोपायला गेलेले बरे, कारण आपली साठी सुरू आहे ! बुध्दी नाठी होऊन उपयोग नाही !  झोपायला जाता जाता व्हॉट्सॲप पाहिले तर अमेय धोपटकरांचा मेसेज आलेला. त्यांनी कविता क्वारंटाईन या पेजवर माझा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याची लिंक येथे देत आहे. कविता क्वारंटाईनमध्ये गझल
( क्रमश: )
...........







   








मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

असा एक दिवस...

मागे - पुढे

28.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग पस्तीसावा दिवस. काल संपूर्ण रात्र दोघांनाही झोप लागली नाही. गोळी न घेतल्याचा परिणाम. रात्री दीड वाजता मुलाला फोन केला तर त्याचे वर्क फ्राँम होम सुरू होते. मग ही यूट्यूबवर व्हिडीओ बघत बसली आणि मी कोरावर उत्तरे देत बसलो. मला माझाच एक शेर आठवून हसू आले. तो असा आहे : 

        माझ्यापाशी जगाला हवी ती उत्तरे नव्हती !
        मी असा प्रश्न होतो जो कुणाला पडलो नाही !
....आणि असा मी रात्री दोन तीन वाजता कोरावरच्या प्रश्नांना उत्तरे देत बसलो होतो ! .... काय बोलणार ! तर....कित्येक वर्षांनी ही पहाटे पावणेपाचला उठली व नित्यकर्माला लागली. तिथपर्यंत मीही टक्क जागा होतो. नंतर माझा डोळा लागला असावा. सहाला जाग आली तेव्हा मी नुकताच स्वप्नातून बाहेर पडलो होतो. स्वप्नं अगदी बेकार पडले . अगदी विचित्रच ! आम्ही कुठल्या तरी बिल्डींगमध्ये दोघेही एका भींतीला डोकी लाऊन उभे आहोत. डोक्यापासून पायापर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत. सगळया शरीरावर रक्तच रक्त पसरलेले आहे. मी सौ.ला सांगतो की आपल्या आधीचे जोडपे भींतीला लागलेली डोकी काढून बाजुला न झाल्याने गत:प्राण होऊन बाजुला पडलेले आहे. आपल्याला काहीही करून भींतीला लावलेली डोकी मागे घेऊन इथून पटकन गेले पाहिजे. त्या प्रयत्नात असतानांच मला जाग आली. मी हे स्वप्नं सौ. ला सांगितले नाहीय. आज काय घडेल सांगता येत नाही. काही वाईट घडू दे नको म्हणजे झाले. आता धक्के सहन होत नाहीत. आज तिने परिसर सफाई केली.  वरच्या टाकीत पाणीही चढवले . पिंपळपानांचा काढा पिऊन व मला प्यायला सांगून ही झोपली ती आठ वाजता उठली . दरम्याने मी नळाचे पाणी भरले . आज व्हिडीओ करून अमेय धोपटकरना पाठवायचा आहे , त्याची तयारी केली. दोन तीन सुटे शेर व एक संपूर्ण गझल निवडून ठेवली. कलाकाराला अशावेळी शांतता लागते. सलग शांतता लागते. आमच्याकडे कागदपेन घ्यायचा विचार करतो नाही तोच अर्जंट प्रापंचिक हाक येते , अहो, तो नारळ फोडा , कडीपत्त्याचे टाळे आणा नाही तर आधी आंघोळ करा, एकवीस दुर्वा काढा वगैरे वगैरे ! स्वयंपाकघरातून ही हाकही अशी नेमकी वेळेवर येते ना... म्हणजे कमालच म्हणायला हवी...लग्नाचा मुहुर्त एक वेळ चुकेल , पण हा मुहुर्त कधीच चुकला नाही ! एवढे परफेक्ट टायमिंग सचिन तेंडूलकरकडे पण नाही (त्याच्या पत्नीकडे असणारच !) . आज अठ्ठावीस वर्षे सतत हा एकच जिवंत अनुभव घेतो आहे ! प्रपंच नेटका करण्यात कोणतीही कसूर न ठेवणारा मीही कधीकधी ऐन वेळच्या हया हाकांनी त्रस्त होत असतो. बरे ही हाकही इतकी अधीर असते ना की आपणाला क्षणाची उसंत मिळू शकत नाही. अशावेळी माझ्यातला नवरा माझ्यातल्या कलाकारावर सवयीने मात करत राहतो . शेवटी सौ.चाही नाईलाज असतो. तिलाही कामे असतातच व हक्काचे असे स्वयंपाकघरातील कामे करणारे तिसरे कुणीच नाही !( कोरोनाच्या काळात धर्मयुध्द खेळत बसणारी लंबूवहिनी तर आपल्याला परवडणारच नाही ! ) अठ्ठावीस वर्षे तेच तर करत आलो आहे. सवय झाली आहे आता. यातूनच काही तरी निर्मिती करण्याचा , छंद जोपासण्याचा कसाबसा प्रयत्न करत जगतो आहे. मनाप्रमाणे जगायचा विचार केला तरीही क्षणाप्रमाणेच विचार करावा लागतो. दुपारी बारा वाजता ही मिलेशच्या गाडीवरून मसाल्याच्या गिरणीत गेली तेव्हा मी व्हिडीओकडे वळायचा विचार करत होतो. खुर्चीसमोर टेबल ओढले तोच वरच्या बाजूस अगदी घराशेजारीच आंबे काढायला गडी आले . मग त्यांचा आरडाओरडा सुरू झाला. आता कसला डोंबलाचा व्हिडीओ बनवणार ! सांगितलेना क्षणापूर्वी की मनापेक्षा क्षणाप्रमाणेच जगावे लागते ! क्षणापुढे शरणागती पत्करून गप्प बसलो. सौ. गिरणीतून आली. नंतर आम्ही जेवलो. आता जेवल्याजेवल्या ही रूपाचा फोन आल्याने उन्हातून धावत तिच्याकडे गेली आहे. मागचे दार उघडले तर शेजारीच वबीनाच्या अंगणात शिरकाव करून विरेश कुठून तरी धान्य मिळवून आणून वाटप करीत बसलाय. ही बहुतेक तिकडेच धावली . खरोखरच्या गरीबांना धान्य मिळायला हवे आहे. आम्हांला निदान आता तरी देणे चूक आहे. पण बायकोपुढे बोलणेही चूक आहे !  अशावेळी आपण काय बोलणार , नाही का ? क्षणाप्रमाणेच जगणार ! जाऊदे ! आता बघा किमान तासभर तरी मला रिकामा वेळ आहे , पण जेवल्याजेवल्या रेकाँर्डींगही योग्य नाही , म्हणून शतपावली सुरूवात केली. अर्ध्या तासाने रेकाँर्डींगची जुळवाजुळव केली आणि सुरूवातही केली. गझलच्या  पाचपैकी चौथ्या शेरावर आलो आणि खालचे गेट वाजले. व्यत्यय आलाच. मी रेकाँर्डींग बंद केले आणि बघतो तर लंबूवहिनी आलेली. मी खिडकीतूनच सौ. घरी नाहीय म्हणून सांगितले तशी ती गेली. पाच मिनिटांनी मी नव्याने सुरूवात केली तर पहिला शेर संपतासंपता पुन्हा गेट वाजले. सौ. आली ! दुसरा व्यत्यय आला ! मग मी माझा गाशा माझ्या घरातून गुंडाळलाच आणि खालच्या घरात जाऊन रेकाँर्डींग करून परत आलो तर ही झोपलेली ! रेकाँर्डींग फारसे चांगले झाले नाही. एक तर कालच्या रात्रीचे जागरण , वयानुसार आवाजावर आलेली बंधने आणि सकाळपासून येत गेलेले व्यत्यय बघता मात्र ते ठीक झाले असे म्हणता येईल.  खालच्या घरात असतांना गेट वाजवत कोणी आले नाही , हे नशिब ! तरी सुरूवातीची दोन तीन मिनिटं कावळ्यांनी व्यत्यय आणलाच ! त्यांच्या कर्कश पार्श्वसंगीत सुरूवातीला तरी लाभलंय बुवा !  काय करणार, क्षणाप्रमाणे जगतो आहे. मनाप्रमाणे थोडाच जगतो आहे !अमेय धोपटकरांना सर्व साहित्य पाठवलं तोपर्यंत चहाची वेळ झाली. मग काय लवंडताही आलं नाही. पुन्हा क्षणाप्रमाणेच ! 

          चहा झाल्यानंतर उद्याच्या लेडीज मटन पार्टीच्या वाटपासाठी लसूण सोलून दिली. ही कांदालसूण शेगडीवर ढवळत असतांना लंबूवहिनी कांदेवाला आलाय म्हणून किंचाळत धावत आली ! ती धावली म्हणून ही धावली. जवळपासच्या सगळया धावल्या ! ही बायकांची सवयच असते. मी कांदालसूण ढवळत राहिलो. ही कांदे घेऊन आली तेव्हा मी सुटलो. पुढच्या पायरीवर लेखन करीत बसलोय. पावणेसहा वाजलेयत. मुलाला फोन केला. तेवढयात स्नेहा आली. पांडवीनकाकी आली. ही मैफील जमली. तेवढयात बंदूही वरती आला. तोही सामील झाला. अखेर मी झाडांना पाणी द्यायला उठलो तशी मैफीलही उठली. आज खालच्या बागेतल्या झाडांना पाणी दिले. सायंकाळ नेहमीसारखीच ढळली. कातरवेळ सरली. रात्र आली. आता नऊ वाजून गेलेत. सौ. ने सात वाजताच गोळी घेतली आहे. मी आता घेतोय. बघूया किती वाजेपर्यंत झोप येते ती. तसा आजचा दिवस चांगला नव्हताच. अर्धा दिवस तर मूड गेलाच होता. सकाळी एखादं माणूस आपला मूड बिघडवतं , मग दुपारपर्यंत याचीच पुनरावृत्ती करणारी माणसे भेटत राहतात. हे चक्रच असते. दुपारनंतर जरा बरी परिस्थिती आली. मूडही जरा बरा होता. संध्याकाळी झाडांना पाणी मिळाल्यावर तर खूपच फ्रेश वाटले. अरे हो, आज दिवस असा काही गेला की जाधव मॅडमच्या गझलकडे लक्ष द्यायलाच विसरलो. (आज स्वत:च्याच गझलचा विचार करण्यात बराचसा वेळ गेला ! ) जाधव मॅडमची क्षमा मागितली पाहिजे. कालच्या त्यांच्या *भारत शिक्षण मंडळाचे,  देव-घैसास-कीर कला,वाणिज्य ,विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय,रत्नागिरी* यांच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष (IQAC) सहाय्याने *कोरोना कोविड १९* विषाणूमूळे महाराष्ट्र व भारत सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांची दैनंदिन जीवनशैली बदलून गेली आहे. हा बदल एक भारतीय सुजाण नागरीक म्हणून *लॉकडाऊन काळातील बदललेली जीवनशैली* हा बदल कसा स्वीकारत आहात, याबद्दलचे सर्वेक्षण महाविद्यालयामार्फत करीत आहोत.यासाठी 
https://forms.gle/v3JKyffkmkD6AGYW7
दिलेल्या लिंकवरती क्लिक करा व त्यानंतर येणारी प्रश्नावली  सोडवा.  या संदेशानुसार,  लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनशैली बदलून गेल्याबाबतची प्रश्नावली आताच सोडवली. 


( क्रमश: )
...........







     








सोमवार, २७ एप्रिल, २०२०

लाॅकडाऊन पुढे चालू....

मागे - पुढे

27.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चौतीसावा दिवस. आज सोमवार आहे म्हणजे पाणी येणार नाही. त्यामुळे संध्याकाळी पाण्याचा शिल्लक साठा बघूनच झाडे शिंपायचा विचार करू. मागे जाऊन वरच्या टाकीत पंपाने पाणी चढवून घेतले व इतर कामांकडे वळलो. साडेनऊच्या सुमारास पांडवीन काकी माड साफ करणा-याला घेऊन आली. मग त्याच्याकडून माड साफ करून घेतले . तो म्हणाला लॉक डाऊन आहे म्हणून मी सापडलो. नाही तर राजापूरवगैरे लांबच्या भागात माडाची कामे नाही तर आंबे काढायला गेलो असतो. त्याचं नांव घाणेकर. त्याच्याकडून आमच्या भागातील  तीन चार जणांनी माड साफ करून घेतले व नारळही पाडून घेतले. लॉक डाऊन काळात बिचा-याला थोडी कमाई झाली. माड साफ करीत असतांना लंबूवहिनीची मुलगी येऊन गेली. लंबूवहिनी चिंगूळ फँक्टरीत गेल्याचे कळले. ही फँक्टरी गावातच आमच्यापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. दुपारी बीना येऊन सौ.शी बराच वेळ बोलत बसली होती. तिच्या मनातून मुख्य बोच जात नाही तोपर्यंत ती अशीच अवांतर विषयांवर बोलत राहणार. आपण आनंदी आहोत असे भासवत राहणार.  लग्नाचे वय होऊन चालले की काय वाटते ते तिच्याकडे बघितल्यावर कळते. खूप वाईट वाटते , पण काही करता येत नाही. बीना गेली तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. आज सोमवार असल्याने सकाळी दहा वाजताच लाईट गेलेली आहे. ती दुपारी अडीचतीनच्या दरम्याने येईल. लाईट नसल्याने सौ. ला जेवतांना टीव्ही लावता आला नाही. एक बरे झाले म्हणजे कोरोनाच्या त्या भीतीदायक व सततच्या बातम्या निदान आज तरी जेवतांना बघाव्या , ऐकाव्या लागल्या नाहीत ! किती तरी दिवसांत जरा शांतपणे जेवता तरी आले. त्याचा परिणाम असा झाला की नंतर वामकुक्षी घेताघेता चांगलीच झोप लागली. म्हणजे तीन ते पाच वाजेपर्यंत ! जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने गावात माणसे जरा रस्त्यावर दिसू लागली आहेत. अर्थात मास्क लावूनच फिरतायत. 

       संध्याकाळ झाली आहे. लंबूवहिनीने गावातून दूध आणून दिले आहे. आज ती कामाला गेली होती , तिचे चलन सुरू झाल्याने ती फ्रेश दिसते आहे. आज पाणी कमी शिल्लक असल्याने खालच्या बागेतल्या झाडांना शिंपता आले नाही. मात्र आमच्या मागच्या दारच्या कलमाला व माडाला थोडेसे पाणी लावले. उन्हाळा असल्याने माती टणक झाली आहे. त्यामुळे झाडांच्या भोवतीची माती थोडी थोडी सैल करतो आहे.  त्यामुळे झाडांभोवती पाणी खेळू लागले आहे व भवतालच्या जमिनीतही मुरू लागले आहे. झाडांभोवती पाणी गोलगोल खेळू लागले की खूप छान वाटते.
 
खालच्या बागेत हे काम ब-यापैकी आधीच केले आहे.  तिकडे वेंगुर्ल्यातून भाचीने पाठवलेले पेरूचे छोटेसे कलमही आता ब-यापैकी वर आले आहे.
बागकामातून वेगळाच आनंद मिळतो. मला व्यवहारी गणित जमत नाही म्हणून नाही तर फळबाग करून समाधान व उत्पन्नही मिळवता आले असते. नोकरीत तेहतीस वर्षे गेली. आता काही गणितेही बदलली आहेत. मुलाला नोकरी आहे व त्यालाही तीच करावी लागेल असे दिसते आहे. फळबागेचे गणित जमले असते व दरमहा किमान त्याच्या पगाराइतका पैसा मिळाला असता तरी नोकरीतून त्याची सुटका करून त्याला फळबागायतदार बनवला असता. पण शेवटी कोणताही धंदा बेभरवशी असतो , हे पूर्वी मीच दोनतीनदा फटके आणि चटके खाल्ल्यामुळे चांगलेच कळलेले आहे. मी नोकरी सोडली नाही हेच नशिब ! पण कसला तरी व्यावसायिक व्हायचे हे माझे नोकरीला लागायच्या आधीपासूनचे मनसुबे. ते मनसुबेच राहिले आहेत. कुठे तरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते , हे सुरेश भटांनी जणू माझ्याचबाबतीत लिहिले असावे , इतके दैवाने मला हेलकावे दिले आहेत , अजूनही देत आहे ! पण मीही ' माझ्यात बांधल्या मी पक्क्या अजिंक्य भींती, माझी मला दिली मी सारी इथे उभारी ! ' या माझ्याच शब्दांनी मला धीर देत लढत आहे. आता रात्र झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. सौ.ने बातम्या लावल्या आहेत. मी पुढे बाहेर पायरीवर बसून लेखन करतो आहे. छान गझला लिहिणारे  विजयानंद जोशी यांच्याशी गझलबाबत चर्चा होतेच. काल अभ्यासू  शुभम कदमबरोबर गझलबाबत चर्चा सुरू होती . तर आज वसुंधरा जाधवांशी गझलसंदर्भातच बातचीत सुरू आहे. त्यांचीही गझल आता वेगळया टप्प्यावर आली आहे. गझलची ओढ आणि लय याच्यातच गझलीयत लपली आहे. परवा अमोल पालयेचा कविता क्वारंटाईनच्या अमेय धोपटकर यांचा फोन येईल असा मेसेज आला होता. तो फोन थोडया वेळापूर्वीच आला. त्यांना उद्या व्हिडीओ पाठवतो म्हणून सांगितले आहे. अमेय धोपटकरांचा हा उपक्रम रत्नागिरीतील काव्यविश्वाला नवसंजीवनी देणारा तसेच काव्य निर्मितीला प्रोत्साहनही ठरेल , यात शंकाच नाही. हया सर्व ताज्या दमाच्या निर्मितीकारांना शुभेच्छा देऊन आज इथेच थांबू .


( क्रमश: )
...........







     








जे काय असेल ते....

मागे - पुढे

26.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग तेहत्तीसावा दिवस. आज पाणी कमी आले आहे. उद्या सोमवार आहे म्हणजे उद्या पाणी येणार नाही. त्यामुळे किमान आज झाडे शिंपता येणार नाहीत. आज रविवार असल्याने सौ. मासे घेऊन आली आहे. मागच्या दारी ती ते नीट करीत आहे . मी मागच्या पायरीवर बसलो आहे त्यामुळे कावळे आणि मांजरे लांबूनच मी इथून जाण्याची वाट बघत थांबली आहेत. मला त्यांची दया येते पण भलत्याच बाबतीत दया परवडत नाही ! मागे बंदूकडे बंदूमंडळ जमा झाले आहे. सत्त्या , संत्या , विसू, विकू सारे चर्चेत सहभागी आहेत. जशी काही कोरोनाच्या लसीसंदर्भात गंभीर चर्चा सुरू असावी. कदाचित केंद्रीय पथकं आणि काही राज्य यांच्यात कोरोनासंदर्भातल्या चर्चेचासंदर्भ हयांना मिळाला की काय असे त्यांचे चेहरे दिसतायत. पुढे आलो तर टेबलावरच्या बचत गटाच्या बैठक अहवाल नोंदवहीकडे लक्ष गेले. ती अपडेट करायला सौ. ला हातभार लावला पाहिजे. कारकुनी करीत सेवानिवृत्त झालो . आता सेवानिवृत्तीनंतरही कारकुनीच करावी लागतेय ! एखादयाच्या नशिबात काही गोष्टी कायम असतात. त्या टाळताच येत नाहीत. आज अक्षय तृतीया. खूप जण वेगवेगळे संदेश देत आहेत . मी माझा वेगळा संदेश दिला आहे...........

           आज अक्षय तृतीयावगैरे असली तरी रविवार पण आहे. संस्कृती, पाप पुण्य , उपासतपास वगैरे बोलायलाच ठीक असते हे कित्येक वर्षे उघडउघड दिसतेच आहे. उच्च व स्वच्छ संस्कृतीचा टेंभा मिरवणारेच संस्कृतीला तोंडघशी पाडतात व साडेतीन मुहुर्तालाही मासळीबाजारात धावतात ! हक्काचा रविवार सोडतो कोण ! सोय महत्वाची ! आणि भांडणाची खाज भागवण्यासाठी संस्कृतीचा उपयोग करण्याचीही सोय महत्वाची ! शेवटी सारे कसे सोयीनुसार असते. हयालाच जीवन म्हणायचे असते. जगणे महत्वाचे असते. बाकी सारे झूठ असते. पण ढोंगी लोक आडूनआडून सारे करूनही आपण तेवढे निर्मळ , सदाचारी असे दाखवण्यात वाकबगार असतात. मुँहमें राम , बगल में छुरी आणि मी नाही त्यातली नि कडी लावा आतली , असा हा सगळा प्रकार आहे ! वेश्या तोंड वर करून बोलते आणि पतिव्रता मान खाली घालूनच चालते , असा हा प्रकार आहे. ओळखणारे ओळखतातच ! मांजर कितीही डोळे झाकून दूध पिऊदेत. आमच्या आसपासही हेच प्रकार आहेत. तंगडयात तंगडे असल्याने म्हणजेच व्यवहारात गुरफटल्याने एकामेकांचे उणेदुणे काढत नाहीत इतकेच ! काढले तरी मर्यादेतच आणि भांडले तरी लगेच एकमेकांना चिकटतातच ! शेवटी एकमेकांची बिळे एकमेकांना माहीत असतातच ना ! कोणालाही आपल्या भानगडींची वाच्यता परवडण्यातली नसते ! असो ! 

         आज दुपारी जेवल्यानंतर मात्र वामकुक्षी छानच झाली. वामकुक्षीपेक्षा चांगली झोपच झाली. मी पावणेतीन वाजता लवंडलो तो साडेचार वाजता उठलो.  छान वाटले. बरेच दिवसांनी हा सुखद अनुभव आला. पुन्हा एकदा हळूहळू संध्याकाळ झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. खालच्या अंगणात आजही स्नेहा सौ.ला भेटायला आली आहे. बुधवारच्या डोंगरी मटणपार्टीचा बेत अधिकच पक्का केला जातो आहे.  चंगळवाद पुन्हा बोकाळणारच आहे. कोरोनाचीही भीती काही शिकवू शकत नाही , ही वस्तू:स्थिती आहे. मूळ स्वभाव काही केल्या जात नाही. मी अंगणात फिरतो आहे. हे चक्र असेच फिरत राहणार आहे. अनादिअनंत काळ. 


( क्रमश: )
...........







     








रविवार, २६ एप्रिल, २०२०

Marathi kavita pravah Don asale tari

प्रवाह दोन असले तरी....


प्रवाह दोन असले तरी 
सागर एकच असायला हवा ना  !
सागरातून प्रवाह वेगळा काढता येईल ?
एक प्रवाह वेगळा काढायचा की
दुसरा प्रवाह वेगळा काढायचा 
आपल्याच शरीराच्या सागरातून ?
हया प्रवाहाच्या लाटा
त्या प्रवाहाहून वेगळया रंगाच्या आहेत
पण त्या आधी लाटा आहेत की
एकीकडे किना-याकडे येऊन परततात 
आणि दुसरीकडे परततच नाहीत
असं काही अगम्य त्यांच्याबाबतीत आहे का ?
कोण आहे लाटा उठवणारा ?



... देवीदास हरिश्चंद्र पाटील

Marathi Gazal visar mala

विसर मला....


मनात धर 
मलाच वर !

हवा गांव
नको शहर !

करून बघ 
बघून कर !

कोरोना
खरे जहर !

विसर मला
स्मरून तर !



....देवीदास हरिश्चंद्र पाटील

Koronapasun aapan ky shiku shakto ka ? ?

मागे - पुढे

25.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग बत्त्तीसावा दिवस. आज सकाळी सौ.चा फोन चार्जिंगला लावतांना मुलाच्या मेसेजचे नोटीफिकेशन वरती दिसले. कधी नव्हे तो सकाळच त्याचा मेसेज का,  म्हणून मेसेज वाचला. माझ्या त्याला उद्देशून लिहिलेल्या सबुरीच्या सल्लावजा एका कवितेला त्याने कवितेतूनच दिलेले उत्तर होते ते ! आधीच मनावर ताण होता. मला दोन चार ओळींच्या पुढे वाचवेचना. मी सरळ मोबाईल चार्जींगला लावला आणि सहा वाजून गेल्याने नित्य कर्मांकडे वळलो. आता मुलाला उद्देशून कधीही कविता करायची नाही हा कानाला खडा लावला ! चहानंतर मी सौ.ला चिरंजीवही कवी झाल्याचे सांगितले. तिने ती कविता वाचली. म्हणाली त्याला फोन करते. मी तिला थांबवले. तो तिथे चक्रव्युहात एकटाच आहे. त्याची मन:स्थिती चांगली राहिली पाहिजे. कडू घोट हे मोठयांनीच मोठया मनाने गिळायचे असतात.  आता परत भांडण करू नका. व्यक्तींमधली भांडणे कुटुंबात पसरली , कुटुंबातली गावभर झाली , गावाची गावागावांशी व शहरांशी भांडणे झाली, शहरांची शहरांशी , राज्याशी , राज्याराज्यांची राज्याराज्यांशी अशी भांडणे देशभर पसरली आणि मग देशादेशांची देशादेशांशी भांडणे सुरू झाली. याच भांडणांनी कोरोनाला देशादेशात निमंत्रण दिलं आहे ! निदान या महामारीत तरी सावध व्हा. प्लीज , आता कोणीच भांडू नका. माझे हे कळकळीचे सांगणे सौ.लाही पटले असावे . ती म्हणाली तोच फोन करू देत किंवा मी केला तर हा विषय काढत नाही. मी म्हटले चला विषयच संपला ! आज शनिवार. मासे नाहीत. रिता , सुना बाजार. भाजीही मिळत नाही. शहरात चालत जाणे शक्य नाही. कधी तरी एवढे चालले तर या वयात त्रासच होणार. शिवाय , शहरातही भाजी कितपत मिळेल हे सांगता येत नाही. मासे लॉक डाऊन . भाजी लॉक डाऊन . कडधान्य झिंदाबाद ! दुपारी तेच केलं. आज संध्याकाळपर्यंत लंबूवहिनी आली नाही. आता कमीच येते. आली तरी फारशी उत्साहात नसते. बहुतेक खात्यात अपेक्षित पैसे पडले नसावेत. पैसा बोलतो. राजकीय वक्तव्यांना किती महत्व द्यायचे हे काही शिकलेल्यांना कळत नाही तिथे हया अशिक्षित बाईला कुठून कळणार ! त्यात गरीबी माणसाला हतबल करते. काय काय करायला लावते. एक मात्र जाणवले की तिला चिथवणारे मास्टरमाईंडसच थंडावलेले आहेत ! मा. मुख्यमंत्र्यांनी भरलेला दमच त्यांना पुरेसा पडला ! काहीही घडले की त्याला एकच रंग द्यायचा , एवढेच हया व्देषप्रसारकांना माहीत असते. हयांनी आपली अक्कल गहाण टाकलेली असते . रिकामा वेळही भरपूर असतो , त्याचा सदुपयोग करायचीही बुध्दी त्यांना नसते. मग पडदयाआडून समाजात लंबूवहिनीसारख्यांना चिथवून द्यायचेे , एवढाच खेळ उरतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका खेडयात कसले विचारमंथन होते ते बघा ! चांगले समाजकार्य करणे तर दूरच , दारूमटणाच्या पार्ट्यात पैसे उडवायला सांगायलाही लागत नाही ! ही माणसे खरी तर वाईट नसतात , पण ती दुष्टांच्या कटकारस्थांनाना चटकन बळी पडतात. त्यांच्या हातात सापडलेले आयते कोलीत म्हणजे हे दारूमटणाला हपापलेले छुपे रुस्तम ! हयांच्यामार्फत विषारी विचार पसरवणे काहींना किती सोपे झाले असेल ते बघा ! आपण परदेशांच्या नावाने बोंबा मारतो , पण आपणच दूषित केलेली आपलीच गंगा स्वच्छ करायचा आपल्यात दम नाही , हे मान्य करीत नाही. त्यासाठी कोरोना यावा लागतो ! कोरोना हे विषाचे फळ आहे. 

            हळूहळू संध्याकाळ झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. आज स्नेहा सौ.ला भेटायला आली आहे. बायकाही आता पार्ट्या करू लागल्या आहेत. तेही दूर डोंगरात जाऊन ! तोच बेत शिजतो आहे ! कोरोनाने हाच चंगळवाद संपेल व लोक घरचे अन्न घरातच शिजवून घरातच खातील , आपल्या माणसांना खरे आपलेसे करतील व असेल ते घरातच सुखाने मिळूनमिसळून , हसूनखेळून खातील, पर्यटनाचा अतिरेक थांबेल , ही आशा कोरोना जगभर थैमान घालीत असतांना हया खेडयातच फोल ठरते आहे ! एका खेडयातल्या बायकांची ही एवढी प्रगती आहे , तिथे शहरातल्या हुशार लोकांचे काय सांगावे ब्बा ! हे विचार अनेकांना झोंबतील , पण अजून वेळ गेलेली नाही . पाचसहा महिन्यांपूर्वी ओठांवर आलेल्या दोन ओळी मला इथे आठवतात :

             तुला आता जरी सुखाची मजा येत आहे 
             सुखामागून बघ सुखाची सजा येत आहे

       खरेच सांगतो , तेव्हा मला ती सजा कोरोनाच्या रूपात असेल हे स्वप्नातही आले नव्हते. पण सुखाच्या अतिरेकी पर्यटकीय चंगळवादाची आणि माणसानेच माणसाला हीन मानण्याची ही शिक्षा आहे हे नक्की ! मगर हम नहीं सुधरेंगे !
      

( क्रमश: )
.......