सोमवार, २७ एप्रिल, २०२०

लाॅकडाऊन पुढे चालू....

मागे - पुढे

27.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चौतीसावा दिवस. आज सोमवार आहे म्हणजे पाणी येणार नाही. त्यामुळे संध्याकाळी पाण्याचा शिल्लक साठा बघूनच झाडे शिंपायचा विचार करू. मागे जाऊन वरच्या टाकीत पंपाने पाणी चढवून घेतले व इतर कामांकडे वळलो. साडेनऊच्या सुमारास पांडवीन काकी माड साफ करणा-याला घेऊन आली. मग त्याच्याकडून माड साफ करून घेतले . तो म्हणाला लॉक डाऊन आहे म्हणून मी सापडलो. नाही तर राजापूरवगैरे लांबच्या भागात माडाची कामे नाही तर आंबे काढायला गेलो असतो. त्याचं नांव घाणेकर. त्याच्याकडून आमच्या भागातील  तीन चार जणांनी माड साफ करून घेतले व नारळही पाडून घेतले. लॉक डाऊन काळात बिचा-याला थोडी कमाई झाली. माड साफ करीत असतांना लंबूवहिनीची मुलगी येऊन गेली. लंबूवहिनी चिंगूळ फँक्टरीत गेल्याचे कळले. ही फँक्टरी गावातच आमच्यापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. दुपारी बीना येऊन सौ.शी बराच वेळ बोलत बसली होती. तिच्या मनातून मुख्य बोच जात नाही तोपर्यंत ती अशीच अवांतर विषयांवर बोलत राहणार. आपण आनंदी आहोत असे भासवत राहणार.  लग्नाचे वय होऊन चालले की काय वाटते ते तिच्याकडे बघितल्यावर कळते. खूप वाईट वाटते , पण काही करता येत नाही. बीना गेली तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. आज सोमवार असल्याने सकाळी दहा वाजताच लाईट गेलेली आहे. ती दुपारी अडीचतीनच्या दरम्याने येईल. लाईट नसल्याने सौ. ला जेवतांना टीव्ही लावता आला नाही. एक बरे झाले म्हणजे कोरोनाच्या त्या भीतीदायक व सततच्या बातम्या निदान आज तरी जेवतांना बघाव्या , ऐकाव्या लागल्या नाहीत ! किती तरी दिवसांत जरा शांतपणे जेवता तरी आले. त्याचा परिणाम असा झाला की नंतर वामकुक्षी घेताघेता चांगलीच झोप लागली. म्हणजे तीन ते पाच वाजेपर्यंत ! जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने गावात माणसे जरा रस्त्यावर दिसू लागली आहेत. अर्थात मास्क लावूनच फिरतायत. 

       संध्याकाळ झाली आहे. लंबूवहिनीने गावातून दूध आणून दिले आहे. आज ती कामाला गेली होती , तिचे चलन सुरू झाल्याने ती फ्रेश दिसते आहे. आज पाणी कमी शिल्लक असल्याने खालच्या बागेतल्या झाडांना शिंपता आले नाही. मात्र आमच्या मागच्या दारच्या कलमाला व माडाला थोडेसे पाणी लावले. उन्हाळा असल्याने माती टणक झाली आहे. त्यामुळे झाडांच्या भोवतीची माती थोडी थोडी सैल करतो आहे.  त्यामुळे झाडांभोवती पाणी खेळू लागले आहे व भवतालच्या जमिनीतही मुरू लागले आहे. झाडांभोवती पाणी गोलगोल खेळू लागले की खूप छान वाटते.
 
खालच्या बागेत हे काम ब-यापैकी आधीच केले आहे.  तिकडे वेंगुर्ल्यातून भाचीने पाठवलेले पेरूचे छोटेसे कलमही आता ब-यापैकी वर आले आहे.
बागकामातून वेगळाच आनंद मिळतो. मला व्यवहारी गणित जमत नाही म्हणून नाही तर फळबाग करून समाधान व उत्पन्नही मिळवता आले असते. नोकरीत तेहतीस वर्षे गेली. आता काही गणितेही बदलली आहेत. मुलाला नोकरी आहे व त्यालाही तीच करावी लागेल असे दिसते आहे. फळबागेचे गणित जमले असते व दरमहा किमान त्याच्या पगाराइतका पैसा मिळाला असता तरी नोकरीतून त्याची सुटका करून त्याला फळबागायतदार बनवला असता. पण शेवटी कोणताही धंदा बेभरवशी असतो , हे पूर्वी मीच दोनतीनदा फटके आणि चटके खाल्ल्यामुळे चांगलेच कळलेले आहे. मी नोकरी सोडली नाही हेच नशिब ! पण कसला तरी व्यावसायिक व्हायचे हे माझे नोकरीला लागायच्या आधीपासूनचे मनसुबे. ते मनसुबेच राहिले आहेत. कुठे तरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते , हे सुरेश भटांनी जणू माझ्याचबाबतीत लिहिले असावे , इतके दैवाने मला हेलकावे दिले आहेत , अजूनही देत आहे ! पण मीही ' माझ्यात बांधल्या मी पक्क्या अजिंक्य भींती, माझी मला दिली मी सारी इथे उभारी ! ' या माझ्याच शब्दांनी मला धीर देत लढत आहे. आता रात्र झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. सौ.ने बातम्या लावल्या आहेत. मी पुढे बाहेर पायरीवर बसून लेखन करतो आहे. छान गझला लिहिणारे  विजयानंद जोशी यांच्याशी गझलबाबत चर्चा होतेच. काल अभ्यासू  शुभम कदमबरोबर गझलबाबत चर्चा सुरू होती . तर आज वसुंधरा जाधवांशी गझलसंदर्भातच बातचीत सुरू आहे. त्यांचीही गझल आता वेगळया टप्प्यावर आली आहे. गझलची ओढ आणि लय याच्यातच गझलीयत लपली आहे. परवा अमोल पालयेचा कविता क्वारंटाईनच्या अमेय धोपटकर यांचा फोन येईल असा मेसेज आला होता. तो फोन थोडया वेळापूर्वीच आला. त्यांना उद्या व्हिडीओ पाठवतो म्हणून सांगितले आहे. अमेय धोपटकरांचा हा उपक्रम रत्नागिरीतील काव्यविश्वाला नवसंजीवनी देणारा तसेच काव्य निर्मितीला प्रोत्साहनही ठरेल , यात शंकाच नाही. हया सर्व ताज्या दमाच्या निर्मितीकारांना शुभेच्छा देऊन आज इथेच थांबू .


( क्रमश: )
...........







     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: