बुधवार, २० मे, २०२०

Amphan coming


मागे - पुढे

18.05.2020

        चार पाच दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि आज दि  18.05.2020 पासूनचा चौथाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात आजपासून म्हणजेच 18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात सुमारे पंधरा हजार चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. इथेही राजकारण आहेच. राजकीय पक्ष हीच गेल्या काही वर्षात अनेकांची जात झालेली आहे. हया पक्षाची माणसे त्या पक्षाविरूध्द ओरडणार आणि त्या पक्षाची माणसे हया पक्षाविरूध्द ओरडणार, सगळेच काही ना काही राजकारण करणार , हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. आयटी सेलचे महात्म्य बघून सगळयांचेच आयटी सेल आता जागे होऊ लागले आहेत . काही शिकूनही अडाणी आणि काही अडाणी असून उपद्व्यापी ! तर सांगायचं म्हणजे सकाळपासून नेहमीचे कार्यक्रम यथासांग पार पडले. सकाळी बीनाने पुन्हा डाॅक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला. तिला काही गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्याश्या वाटतात. काय करायचे ? मिलेश तिला डाॅक्टरकडे घेऊन गेला. आम्ही दुपारी जेवत असतांना बीना डाॅक्टर काय म्हणाले ते सांगायलाही आली. ती लगेच गेलीही. नंतर आली नाही. तर चहा घेऊन बीनाच्या आईबरोबर ही आनंदनगरला कुणाचे तरी घर बघायला गेली. मी अंगणात फिरत होतो. फिरता फिरता एक पोलीस व्हँन खालच्या बाजुच्या शाळेजवळ येऊन थांबली. बघता बघता तिच्या भोवती माणसे गोळा होऊ लागली. नंतर कळले की घरेलू कामगारतर्फे घरेलू महिला कामगारना मदत म्हणून अन्नधान्य देत होते. काहींना याची आगावू कल्पना दिली गेल्याने काहींनी आधीच नंबर लावले आणि त्या गेल्याही धान्य घेऊन घरी. लंबूवहिनीला कशी कोणजाणे पण ही खबर उशिरा मिळाली. ती धावत गेली , तिथे जाऊन तिचे नावच त्या यादीत नसल्याचे सांगण्यात आले. तिने बोंबलायला सुरूवात केली पण कोणीच तिच्या बाजुने बोलायला तयार नव्हते.  ती एकचीच बोंबलतेय हे तिच्या लक्षात आले असावे. ती एकदम नरमलेली दिसली . ती तशीच आमच्याकडे येवून मला म्हणाली हया राजकारण्यांबरोबर काय लागणार ! आता बोला ! काही लबाड राजकीय नेतेच सोयीनुसार यू टर्न घेतात असे नाही, तर लंबूवहिनीसारखी दारिद्र्य रेषेखालची सामान्य माणसेही यू टर्न घेऊ शकतात ! साठा संपल्याने गाडी निघून गेली. काही महिला कुरकुरत थोडा वेळ तिथेच घोटाळल्या आणि उद्या गाडी येईल या आशेवर घरी परतल्या. मी हे सारं अंगणातून बघत होतो. अजून आपल्या देशात समतोल वाटप व्यवस्थेचे नीट नियोजन होत नाही, अंमलबजावणी तर फारच दूरची गोष्ट आहे ! आणि इकडे आपण बुलेट ट्रेनच्या वेगाने जागतिक महासत्ता बनण्याच्या वल्गनेचे ढोल बडवत असतो ! जागतिक सोडा , ही आगतिक महासत्ता झाली आहे.


       मी हा आगतिकपणा सोडून मागे गेलो. म्हणजे घराच्या मागच्या बाजुला गेलो. आज पाण्याचा शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळे आज आमची दोनच झाडे शिंपून घेतली.  तेवढयानेही मन प्रसन्न झाले. निसर्ग आजही आपल्याला प्रामाणिकपणाने देत असतो. पण आपण आजही लांडीलबाडीने राजकारण करून आपलीच वाट लाऊन घेत आहोत. मग कोरोना येईल नाही तर काय ? मग अम्फान सुपर चक्रीवादळ येईल नाही तर काय ?


( क्रमश: )
...........











   








सोमवार, १८ मे, २०२०

From Quora

क्वोरावर अधूनमधून उत्तरे लिहायचा छंद मला लागला आहे. तसे मला क्वोरावर लिहून दोन तीन महिने झाले आहेत. क्वोराने माझ्या एका उत्तराचा  विशेष उल्लेख केला आहे. क्वोराला धन्यवाद आणि त्याचा फोटो खास आपल्यासाठी ...



 क्वोरावर माझी ऊत्तरे एका आठवडयात किती वेळा पाहिली गेली ते पहा :





आणि आता.....






गुरुवार, १४ मे, २०२०

Chakarmani


मागे - पुढे

13.05.2020

        गेले काही दिवस काही लिहिलंच नाही. काळाचा अंदाज घेतो आहे. आताही अंदाज घेतघेतच लिहितो आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे.   दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  ( आणि आता आगामी चौथाही मनात ) धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे.  कालच मापंप्रनी नेहमीप्रमाणे रात्री 08 वाजता भाषण केले आहे. आत्मनिर्भरतेचा महान मंत्र त्यांनी दिला आहे. अर्थात , तुमचे तुम्ही बघा. निवडणूक आली की मी तुमच्याकडे बघतो. केवळ पंप्रच नाही तर कोणत्याच पक्षाचे लोक दिसायला पाहिजे तितके कुठे दिसत नाहीत. निवडणूक आली की प्रचार करायला बाहेर पडा, मतदान करायला बाहेर पडा , शंभर टक्के मतदान करा, असा प्रेमळ दम भरणारे ते लोकशाहीचे कार्यकर्ते आता जीवनमरणाच्या वेळी घरात बसा म्हणून सांगायलाही कुठे फिरकत नाहीत, असं आता लोकच म्हणू लागलेयत  ! म्हणजे, लोक फक्त निवडणुकीपुरतेच महत्वाचे असतात का ? असा प्रश्न खुद्द लोकांनाच पडू लागला आहे ! लॉक डाऊन वाढणार हे तर आता अपरिहार्यच झाले आहे. याबाबत 18 तारीखला तपशील जाहीर होणार आहे ! पुन्हा एकदा दोन्ही गटातल्या गैरशिस्त लोकांना आयत्या वेळचा गोंधळ घालायची संधी तर कोणी देत नाहीय ना ? काही गोष्टी वाटतात तितक्या सहज घडत नसतात.  देशात केवळ गोंधळ सुरू आहे. माणसे हैराण झाली आहेत . माणसांच्या या हवालदिल होण्याने देशात कोण कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत राहणार नाही व देश अराजकतेकडे वाटचाल करू लागेल ! अनेक ठिकाणी प्रशासन हताश होत आहे. काही ठिकाणी तर प्रशासनावर कुठून दबाव तर येत नाही ना, अशी शंका येण्याइतपत प्रशासन हतबलता व्यक्त करू लागले आहे. एकीकडे कोरोनाची होणारी लागण आणि न ऐकणारे लोक या कात्रीत प्रशासन सापडले आहे. न ऐकणा-या लोकांमागे काही बोलावते धनी ( मास्टरमाईंडस् ) असावेत की काय अशी शंका येण्याइतपत परिस्थितीचे केले जाणारे राजकारण बोट दाखवते आहे ! हजारो लोक उपाशी पोटी शहरे सोडून गावांकडे पायी चालत निघाले आहेत आणि आपण अजूनही त्यांच्याबद्दल चकार शब्द न काढता, आपलीच पाठ थोपटून स्वदेशीचे नारे भलत्याच वेळी देत आहोत की काय ? असे वाटत आहे. एकूण कशाचे काही तारतम्य उरलेले दिसत नाही. अवतारही ढेपाळत आहेत ! सतत परदेश वा-या करणा-यांकडून स्वदेशी हा शब्द ऐकतांना जरा कसेसेच वाटते, नाही का ? थोडक्यात , विमाने आणि रस्ते यातले अंतर उघड होत चालले आहे. हया लॉक डाऊनला नेमका काय अर्थ आहे ? माणसे इकडून तिकडे येत जात आहेतच , आणली आणि पोचवलीही जात आहेत. त्याच्याही बातम्याच केल्या जात आहेत ! काही जण योगींचे गुणगान गाता गाता योगींनी आपल्याच माणसांना घ्यायला नकार दिला या व्हिडीयोने विव्हळ झाले आहेत ! या पार्श्वभूमीवर काही लोक महाराष्ट्राला अधिक पसंती देत आहेत. कोरोनाने आधीच्याच दोन गटातली दरी वाढवली आहे. हे लोक देशभक्तीचे केवढे नारे देतात ! सोयीनुसार आम्ही सारे भारतीय (!) म्हणतात ! विसंगती तुला सलाम !

                 इकडे आमच्या मागील दारी सकाळी पाणी वेळेवर आले, ही कडक उन्हाळ्याच्या दिवसातली समाधानाची बाब ! बाकी तसे सगळे चालूच असते. घटना आणि लोकसुध्दा ! नाना येऊन मुलाची चौकशी करून गेला. गंमत म्हणजे त्याने तासाभरात मोदींबद्दल चकार शब्दही काढला नाही ! योगींचा उल्लेखही केवळ एकदाच केला ! मला हे खरोखरच आश्चर्यकारक वाटले. पण मी त्याला काहीच विचारले नाही. हे नेतेवगैरे खूप दूरचे आहेत. नेत्यांपेक्षा आमची नाती अधिक जवळची व पिढीजात आहेत. हे नेते येतील आणि जातील. त्यांच्यामुळे आपल्यात दुरावा निर्माण होण्याएवढे आपणच त्यांना मोठे करणे चूक आहे ! राजकारण हे राजकारणापुरतेच ! त्याची योग्यता तेवढीच आणि आपणही ती तेवढीच ठेवली पाहिजे. हे आता कोरोनाने पुन्हा एकदा शिकवले आहे. उद्या पाणी येणार नाही, असे संज्याने सांगितले. खरे तर पाणी न येण्याचे वार सोमवार आणि शुक्रवार आहेत. पण दुरूस्तीसाठी बदल करण्यात आला आहे. त्याला आपण सहकार्य केले पाहिजे. उद्या पाणी नाही म्हणजे आज झाडांना पाणी देता येणार नाही. संध्याकाळचे सहा वाजून गेले आहेत. मी अंगणात फिरतो आहे. वरच्या बाजुला कठडयाजवळ एक पांढरी लुकडी गाय येऊन उभी राहिली आहे. अशा गायी दररोज इथे येऊन उभ्या राहतात. मग आम्ही त्यांना चपाती, भात , भाकरी खायला देतो. यापैकी काहीच शिल्लक नसेल तर बिस्कीटेही खायला देतो. काही गायी हलता हलत नाहीत. काही मात्र जे मिळेल ते खातात आणखी निघून जातात. काही गायी तर थोडी वाट बघून आज काही मिळणार नाही हे समजतात व निघूनही जातात . हया गायीची परिक्षा घ्यायची म्हणून मी काहीच हालचाल केली नाही. गंमत म्हणजे ही गाय हुशार असावी. हा काही देणार नाही असे ओळखून ती लगेच निघालीही. मला कसेसेच झाले. कोरोनाचे दिवस आहेत. तिला काही मिळालेही नसेल. ती उपाशी असेल. मी विचार करीपर्यंत ती दहापंधरा फुटांवर गेली पण ! मी तिला हाका मारताच मात्र  ती माझ्याकडे यायला लागली. मी धावतच घरातून बिस्कीटे आणली . तोपर्यंत ती कठडयावर मान पुढे करून उभी राहिलीही. मी तिला बिस्कीटे दिली . ती तिने पटकन खाल्ली. मी तिला आता जा म्हटले तशी थोडया वेळाने ती गेलीही. आता वयाच्या साठीत पूर्वीसारखे धाऊन जमत नाही. पायरी चुकली तर अंगणात कपाळमोक्ष तर ठरलेलाच ! आता अंगण कोरी लादी असते ; प्रेमळ सारवलेली जमीन नसते !  म्हणून जपूनच धावलो होतो . दिवाबत्ती, प्रार्थनेची वेळ आहे. ते झाल्यावर बातम्या लावल्या तर आमच्या जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 74 झालेली . टीव्ही बंद केला. येणा-या चाकरमान्यांचा प्रश्न सारी रात्रभर आवासून बघत होता !


( क्रमश: )
...........











   








सोमवार, ११ मे, २०२०

Baan Marathi Gazal

बाण


किती बाण त्यांनी सोडले होते
फुलांसारखे मी झेलले होते  !


सुखी मी असे दु:खासवे हेही
सुखाच्या जिव्हारी लागले होते


करू सांग मी तक्रार कोणाशी ?
धरेला नभाने झोडले होते !


कसा सांग बोलू आपल्यांशीही ?
कुठे आपलेही आपले होते ?


कसे मी तुलाही ओळखायाचे ?
कुठे तू मलाही जाणले होते !


कितीदा ख-याचे पूर आलेले
कितीदा खरे ना वाटले होते !


गुणाकार होता शून्य आयुष्या !
जमेला वजाने भागले होते !


किती उंच गेला आपला झोका !
किती श्वास आपण रोखले होते !


तरी राहिले ते केवढे मागे ...
जरी लोक शिकले सवरले होते !




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शनिवार, ९ मे, २०२०

Lord Krishna enters


मागे - पुढे

08.05.2020

         पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे.   दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे. तर काल रात्री झोप नीट लागलीच नाही. साडेअकरा वाजता सौ.ला तहान लागली म्हणून उठलो. तिला पाणी आणून दिले आणि मोबाईल घेऊन कोरावर गेलो. कोरावर एक अधिसूचना आहे. माझी माहिती कोरावर दहा हजार लोकांनी पाहिली आणि माझे एक उत्तर एक हजार लोकांच्या ज्ञानभांडारात कोराने सामाविष्ट केल्याचीही दुसरी अधिसूचना होती. हे काही तरी ब-यापैकी होत आहे. लेखनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. कोरावर एका सुप्रसिध्द ब्लाॅगरचे एक उत्तर वाचता वाचता मला माझ्या ब्लाॅगसाठी एक वेगळीच कल्पना बारा वाजून दोन मिनिटांनी सुचली. ती आता इथे सांगत नाही. कारण त्यावर अजून खूप विचार व्हायचा आहे. शिवाय ती कल्पना dehdays या माझ्या इंग्रजी ब्लाॅगसाठी अधिक उपयुक्त आहे. पहिला लेख तयार झाला की तुम्हांला या ब्लाॅगवरही कळवतोच. ती लेखांची मालिका असेल , त्याचे एक स्वतंत्र पानही dehdays या माझ्या इंग्रजी ब्लाॅगवर असेल व ही लेखमालिका आपल्यापैकी अनेकांना स्वत:च्या आयुष्याशी पडताळून बघण्याच्या मोहात पाडणारी असेल, एवढे नक्की. अर्थात , लवकरच ही मालिका आणि पान इथेही (मराठीत) सुरू करीन . तुम्हांला कळवीनच.  दरम्याने कोरोनाचा हैदोस सुरू आहेच. मुलाकडे पुण्याला जायचे अजून तरी शक्य होत नाहीय. 17 मे ला लॉक डाऊन उठेल न उठेल. काय करायचे हेच कळेनासे झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता जाग आली पण आज नळाला पाणी येणार नसल्याने व रात्री झोप नीट न लागल्याने झोपलो तो पावणेआठ वाजता उठलो. सूर्य त्याची किरणे खिडकीतून पाठवून मला कधीपासून जागा करण्याचा प्रयत्न करीत होता कोण जाणे ! हल्ली कोरोना लॉक डाऊनपासून व उकाडयामुळे बरेचदा झोप नीट लागतच नाही. त्यामुळे दिवसाचे शेडयूल बरेचदा बदलत चालले आहे. काही गोष्टी वेळेवर करणे तब्बेतीसाठी अत्यावश्यक असते, पण तेच होत नाहीय. असे किती दिवस चालणार आहे कोण जाणे ! नाश्ता झाल्यानंतर सौ. बीनाकडे जाऊन आली. तिचे चित्त ठीक नाही. गोळयांच्या अर्धवट ग्लानीत ती काही तरी बडबडत होती. ती हयातून कधी बाहेर येणार तेच कळत नाही. वाईट वाटते. तिकडे मागच्या दारी उर्मिच्या घराचे लॉक डाऊनमुळे बंद पडलेले बांधकाम गेल्या चार दिवसापासून सुरू झाले आहे. सत्त्या त्यावर लक्ष ठेवून आहे. त्यातच आमचा जिल्हा रेड झोनमध्ये जातोय. आज एकूण रूग्णसंख्या 18 झाली आहे.

          दुपारी वामकुक्षीच्यावेळी डोळयांवर एक हॉस्पिटल दिसले. रूम खूप मोठी आहे. मी मध्यावर उभा आहे.  हॉस्पिटलमध्ये पेशंटस् , स्टाफ आहेत. स्टाफची कामे सुरू आहेत. माझ्या समोरच्या भिंतीला टेकून उजवीकडील काॅटवर झोपलेला एक उभटगोल चेह-याचा चाळीसपंचेचाळीशीतील मध्यमगौरवर्णीय पुरूष माझ्याकडे बघून हसतोय. त्याला बहुतेक डिस्चार्ज मिळणार असल्याचा भाव त्याच्या चेह-यावर आहे. अचानक त्याच्या शेजारी स्वामी समर्थ येवून काॅटवर बसतात. तेही माझ्याकडे बघून हसतात. त्यांच्या हातात जपमाळ असते. त्या हातानेच ते पुढे निर्देश करतात. मी तिकडे बघतो तर चक्क श्रीकृष्ण डाॅक्टरचा अॅप्रन घालून , स्टेथोस्कोप  लावून, सलाईन स्टँड नीट लावत असतो ! त्याने काही तरी निश्चय केलेला त्याच्या ठाम चेह-यावर दिसत होता.  अगदी तरूण वयातला हा श्रीकृष्ण आहे व तो आता कोरोनाच्या लढाईत डाॅक्टर बनून स्वत:च उतरतो आहे, असे मी मनात म्हणत असतानाच माझी लिंक तुटली. आता परमेश्वरच लढायला उतरला तर कोरोनावरचा विजय फार दूर नाही. संध्याकाळी पाच वाजता उर्मिला धावती भेट देवून गेली. थोडा काळ लंबूवहिनीही येऊन तिचे सुकवण घेऊन गेली. आज दिवसभरात ती दोनदा येऊन गेली. बीनाही संध्याकाळी दोनदा येऊन गेली. उद्या ती डाॅक्टरकडे जाणार आहे. त्यांना सांगायचे मुद्दे तिला लिहून द्यायचे आहेत. ते डाॅक्टर माझेही मित्र आहेत. मी व्यक्तिश: त्यांना व्हॉट्सॲपवर बीनाकडे अधिक लक्ष देण्याबाबत विनंती करावी का हा प्रश्न आहे. बीनाची आई आली तर विचारून बघू. सद्या सात वाजले आहेत. दिवाबत्ती करूया. दोन्ही घरातील दिवाबत्ती झाली. जगतकल्याणाची प्रार्थना झाली. सिरियल बघून झाली. बीनाच्या आजारपणाचे मुद्दे लिहून झाले.  तोवर जेवणाची वेळ झाली. आज उकडया तांदळाची पेज प्यायची. मग पेज प्यायला बसलो तेवढ्यात बीनाची आई आली. पेज लवकर संपवून तिला मुद्दे वाचून दाखवले. बीनाला लवकरात लवकर यातून बाहेर काढले पाहिजे म्हणून सांगितले. डाॅक्टरांना विषयही काढला तर तीच म्हणाली की तुम्ही त्यांच्याशी फोनवर तिच्या आजाराच्या मूळ कारणाबद्दल बोला. मी म्हटलं मी त्यांना थोडया वेळाने व्हॉट्सॲपवर मेसेज करतो. तो तयार केला व सौ. कडून नीट वाचून घेतला. तिने दोन बदल सुचवले ते केले आणि सव्वा दहा वाजता डाॅक्टरांना मेसेज केलाही. आता रात्री 11.23 ला धन्यवाद देणारा त्यांचा संदेश आला आहे. चला निदान अंथरूणावर तरी पडूया....


( क्रमश: )
...........











   








गुरुवार, ७ मे, २०२०

Think twice


मागे - पुढे

07.05.2020

          दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच  कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3  धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला आहे, एवढेच खूप झाले ! गेले तीन दिवस वैतागून इथे तरी काहीच लिहिले नाही. काय लिहायचे ? सगळे तेच तर सुरू आहे. जागतिक महासत्तेचा विनोद करणारी माणसे स्वयंशिस्त पाळतील ही अपेक्षा तरी कशी करायची ! संचारबंदीतच माणसे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मुक्तपणे रस्त्यावर विनाकारण वावरत असतील तर ती हे जाणूनबुजून करतात असेच म्हणावे लागते. अतिशय उच्चवगैरे संस्कृतीचा टेंभा मिरवून फायदा नसतो, तर ती आचरणात दिसावी लागते. ईतिहासाची पुण्याई ही खरे तर पूर्वीच्या खरोखरच्या महान माणसांची कमाई असते. आपले दिवे लावणारे कर्तृत्व पाहता , त्या कमाईवर आपला वर्तमान फार काळ तग धरू शकत नाही. अर्थात आपल्याला आपल्या वर्तनानाची पर्वा नाही तिथे भविष्याबद्दल न बोललेलेच बरे ! बेशिस्त मेंढरांचे कळप सांभाळत तरी किती बसणार ! ही मेंढरे बेशिस्त असली तरी एका बाबतीत हुशार आहेत. ती गनिमी काव्याने कळप सोडून अवैधरित्या स्वत:चीच वाहतूक करीत आहेत वा करून घेत आहेत. सुरूवातीला कसे आहात तिथेच थांबा, सर्व व्यवस्था करण्यात येत आहे , असे आवाहन हया मेंढरांना करण्यात येत होते. पण तरीही ही मेंढरे कधी पायी तर कधी अधिकचे पैसे देऊन वाहनाने गावाकडे पळत सुटली. आता त्यांना गांव आठवला. गावात जाऊन काय पराक्रम गाजवणार , तर गावाला कोरोना महामारीची अभूतपूर्व भेट देणार ! हे थांबायला हवे होते , पण बुलेट ट्रेनच्या तयार करण्यात आलेल्या हवेच्या गतीने चालूच राहिले. कधी मालगाडी तर कधी आंबा वा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीच्या ट्रकने ! शेवटी अधिकृतपणे रेल्वेगाडया सोडून रवानगी करावी लागली. काय झाले त्या आवाहनांचे ? सारा देश माझ्यासोबत हे दाखवण्याची संधी काळाने कोणालाच मिळू दिली नाही ! जेव्हा गोष्ट दाखवण्यावर जाते तेव्हा काळ असेच करतो. लोक खरोखरच तुमच्यासोबत तेव्हाच असतात जेव्हा तुम्ही लोकांसोबत खरोखरच असता ! नीतीमत्तेने असता ! वंदनीय महात्म्यांना बाजूला सारून त्यांची जागा घेणे एवढे सोपे नाही. लोकांनीच त्यांना महात्मा बनवलेले असते. शब्दांतली खरी कळकळ आणि मतांची आकडेेमोड करण्यामागची तळमळ यातला फरक बेशिस्त लोकही चांगलाच ओळखतात. थोडक्यात , आवाहनांचा फारसा उपयोग न होण्यामागची ही पोटतिडकीने केलेली कारणमीमांसा. ती चुकूही शकते. म्हणूनच म्हणतो , की काय लिहिणार सद्यस्थितीत ! आता कोरोनामुक्त म्हटले गेलेले व अभिमानाने अभिनंदन करून मोकळे झालेले कोंकणचे सिंधूदुर्ग व रत्नागिरी हे जिल्हे पुन्हा कोरोनायुक्त झाले आहेत. म्हणून मुक्त मुक्त असे हजारदा बोंबलू नका , तुम्हीच युक्त होता ! हा ताजा ईतिहास आहे ! लोकांचे जीव जात असतांना जो उतावीळ राजकीय कोरोना सुरू आहे तो निंदनीयच आहे व त्याबद्दल बोललेच पाहिजे. ती लोकांचीच जबाबदारी आहे. शेवटी लोकांच्याच भावनांशी आणि जीवनाशी खेळले जाते. काही मूठभरांचे नुकसान टाळण्यापायी लाखोंचे नुकसान करणे चूक आहे. हे कोरोना महामारीच्या काळात तर पाळले गेलेच पाहिजे. अर्थव्यवस्था रस्त्यात कशी  कोलमडते ते दारू दुकाने उघडल्यानंतर केवळ काही तासातच दिसले ! माझ्या दोन फेसबूक पोस्ट पहा 


  प्यायला अधीर झालेले लोक सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजवणार हे आपल्याला आधीच कळत नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल ! इतकेच नव्हे तर लोक दारूसाठी किंवा दारू पिऊन धुमाकूळ करीत आहेत. कांदीवलीत दारूडयाने चक्क महिवेवर व दुकानदारावरच हल्ला केल्याची बातमी जय महाराष्ट्र चँनेलवर दाखवत आहेत. टाळया ते थाळया ते दिवे हया प्रवासाला फार काळ लोटलेला नाही. आपले निर्णय आणि आपल्या आवाहनांचे असे का होते याचा ( जर विचार केला जाणार असेल तर ) विचार करावा लागेल ! आवाहनांचे परिणाम माहीत असल्याने कोणती आवाहने करायची याचे तारतम्य बाळगावेच लागेल. आता चाकरमांनी लपूनछपून येऊन कोंकण कोरोनाबाधित करीत आहेत. ते अधिकृतपणे आणले गेले तर इथली अवस्था काय होईल हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची गरज नाही. प्रशासनातही आता कोरोना शिरू लागला आहे. अधिका-याचा कोरोनामुळे जीव गेल्याची बातमी सुरू आहे.  आपण पोलीसांवरचा भार वाढवून त्यांना अधिकच कमकुवत करीत चाललो आहोत. लोकांपुढे पोलीस हताश झाले तर अराजक होईल. पोलीसही माणसेच आहेत. त्यांनाही कुटुंब आहे , जे डोळ्यांत प्राण आणून त्यांची वाट बघत असते . त्यांनाही गांव आहे. पोलीसांचे अधिक हाल होणे म्हणजे आपलेच संकटमोचक आपण हरवून बसणे होय. पोलीस हतबल झाले तर प्रशासनावरही त्याचा परिणाम होईल. प्रशासन हैराण झाले तर लोक सैराट होतील. अपप्रवृत्ती डोके क्षणात वर काढतील आणि मग मारामा-या , खून , लुटालूट , दंगली, दरोडे, बलात्कार हे ओघाने येईलच.

         कोरोनाबाबत अनेक भाकिते वर्तवली जात आहेत. लसीबाबत संभ्रम आहेच. एक मात्र खरे आहे की, कोरोना चीनने जगाला दिला असे ट्रंफतात्यांनी म्हटले तरी अमेरिकेनेच तो चीनमघ्ये नेला असावा असा खुद्द अमेरिकन लोकांत संभ्रम आहे म्हणा वा निर्माण केला गेला आहे !  म्हणूनच अजूनही जग याबाबतीत ठोस बोलतांनाही दिसत नाही. जग बोलणार नाही तिथे बोलणारे आणि आपल्याकडचे चीनच्या बहिष्काराच्या बाता मारणारे ( चीनचेच ! ) मूग गिळून गप आहेत. अधूनमधून ते सोयीनुसार आणि सवयीनुसार फेसबूकवर उसळी मारतीलच. 😀😀😀😀 आपण वाचून करमणूक करून घेऊया !

             आज सकाळी मित्रवर्य जादूगार मनोहर  भाटकर यांनी दत्ता डावजेकरांच्या संग्राह्य आठवणींचा सुंदर संदेश  पाठविला आहे. त्याची फेसबूक पोस्ट टाकली आहे. तिची लिंक इथे पहा दत्ता डावजेकरांच्या आठवणी. काल  रात्री दोन पंखे लावून झोपलो. त्यामुळे जराशी झोप तरी मिळाली. सकाळी सहा वाजता उठलो , थोडया हालचाली केल्या आणि पावणेसातला उठूया म्हणून झोपलो तो सात वाजता धडपडत उठलो. मागच्या दारी जाऊन पाहिले तर नळाला पाणी चालू होते. लगेच भांडी नेली. पुरेसे पाणी मिळाले आणि पाणी गेले ! सुटलो. नाही तर विहिरीवरून पाणी आणावे लागले असते. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून विहिरीवर गेलोच नाहीय ! या गडबडीत बंदू कुठे दिसला नाही. मला उशीर झाला असल्याने मीही लक्ष दिले नाही. काही वेळाने आंघोेळ करून सहजच मागचा दरवाजा उघडला तर बंदूकडे पाण्याचा टँकर आलेला. तसा तो अधूनमधून येतोच पण गडबड झाली होती. बंदू आणि कंपनी काल रात्रभर गरम्यामुळे झोपलेली नसल्याने सकाळी पाणी आले तेव्हा उठलीच नव्हती ! हे बंदूनेच सांगितले.  तरीच सकाळी बंदू कुठे पाणी भरतांना दिसला नव्हता.  मी समजलो होतो की तो पाणी भरून झोपला असावा. उद्या शुक्रवार म्हणजे पाणी येणार नाही. पाणी प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे.
   


( क्रमश: )
...........

........................ ........ 











   








सोमवार, ४ मे, २०२०

Radha krishna राधा कृष्ण


मागे - पुढे

03.05.2020

          आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चाळीसावा दिवस. आजपर्यंतचा लॉक डाऊन उद्यापासून 17 मे पर्यंत वाढवलेला आहे.       काल रात्री उकाडयामुळे बेडवरून बरोबर 12 वा. 12 मि. नी लादीवर झोपायला आलो. डोळे मिटून पडलो होतो. पुढच्या दोन तीन मिनिटातच डोळे मिटलेले असतांना मला देवळाच्या पुढच्या दारातील भाग दिसू लागला.  ( फोटो पहा )
Pimple tree
Navalai Pavnai Temple Area
पिंपळाच्या उजवीकडेपर्यंत नजर गेली आणि अचानक मी नजर डावीकडे वळवली. पिंपळाच्या डाव्या बाजुला असलेल्या कठडयापर्यंत पोचलेल्या लालमातकट रेघा असलेल्या घाग-यातल्या दोन गवळणी चक्क कठडयाची चि-याची भिंत भेदून सहजगत्या शेजारच्या  प-यात उतरल्या . ती चि-याची भिंत सांधतांना मी पाहिली ! वरच्या थरातले अखेरचे टोकाचे सिमेंट जागेवर बसतांना मला दिसले ! एवढीच हालचाल  चि-याच्या वरच्या भागात झाली. बाकी एक चिराही पडला नव्हता ! लगेच दुसरे आश्चर्य नजरेस पडले ते म्हणजे क्षणापूर्वी कठडयापेक्षाही उंच दिसलेल्या त्या दोन्ही गवळणी प-यात उतरताच बुटक्या दिसत होत्या. त्यातली एक अधिक उंच होती.  हातात माठ घेऊन त्या प-यात काही तरी करीत होत्या. त्या पुढे काय करणार हे बघण्याच्या आतच माझी लिंक तुटली . मी सौ. ला हे सांगितलं आणि जाऊन बघुया का विचारलं तर घरातच तिची भीतीने गाळण उडाली.  ती म्हणाली, आता साडेबारा होत आलेयत. आता कुठे बाहेर जाता ? झोपा गुपचूप ! मी एकटा जातो म्हटलं तर मलाही जाऊ देईना. तसा मी रात्रीअपरात्री कितीही वाजता बाहेर येऊन आसपास बघत असतो. एकदा सिंधुदूर्गात मी एका दहा बारा वर्षाच्या भगत मुलाबरोबर रात्रभर स्मशानात रहायला तयार झालो होतो , पण त्याचे आईवडीलच काही तरी कारणे सांगून टाळू लागले आणि माझे नातेवाईकही जास्त हुशारी दाखऊ नका म्हणू लागले ! त्या मुलाच्या डोळयात चरकल्याचा भाव मला स्पष्ट दिसत होता. गरीबी माणसांना कोणत्या पंथाला आणते या विचाराने मीही मग माझा विचार सोडून दिला. मला खरंच त्या कुटुंबाची दया आली. खूप वाईट वाटले. पोटाच्या खळगीसाठी लहान मुलांचाही वापर करणारी अशी किती कुटुंब आसपास असतील या विचाराने मी अस्वस्थ झालो. मी निघतांना शंभर रूपये त्या मुलाच्या हातावर ठेवले आणि अभ्यास करून खूप मोठा हो म्हणून सांगून बाहेर पडलो. त्या मुलाच्या डोळयात सुटका आणि आश्चर्य यांचा विचित्र संगम झाला होता. तर मी काल रात्री बाहेर जाऊन बघितले नाही. देवळाच्या दारातल्या त्या पिंपळामध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व आहे हे मला काही वर्षापूर्वी सिंधूदुर्गातच पडलेल्या एका स्वप्नात दिसले होते.  त्या दोन गवळणींचा वावर त्यामुळे स्वाभाविकच ठरत होता. ते स्वप्नं मी काही वर्षापूर्वी सावंतवाडीत एका रात्री झोपलेलो असतांना पडले होते.  माझ्या घरासमोरच्या तुळशीचा पुढील भागात श्रीमहाविष्णूची ( माझ्यासाठी श्रीकृष्णाची ) मूर्ती आहे. त्यात त्याच्या उजव्या हाताचा पंजा थोडा पुढे येऊन आशीर्वाद देतो आहे. ( फोटो पहा) .
तर मला स्वप्नात ती मूर्ती जिवंत झालेली दिसू लागली व श्रीकृष्णाची ताकत कमी पडत असल्याचे जाणवले. श्रीकृष्णाचा आशीर्वाद देणारा तो हात वाढून खालच्या बाजुच्या देवळाच्या दारातील पिंपळात उभ्या असलेल्या सुकुमार तरूण श्रीकृष्णाच्याच दिशेने सरकत होता. तेवढयात पिंपळातल्या घननीळ श्रीकृष्णानेही त्याचा एक हात पुढे करून काही वेळ तुळशीतल्या श्रीकृष्णाला हस्तांदोलनाव्दारे शक्ती पुरवली . दोघेही हसले आणि ते दोन्ही हात लहान लहान होत पूर्ववत झाले ! तुळशीतली मूर्ती पूर्ववत होऊन अधिक ठळक दिसू लागली. तिकडे पिंपळातला श्रीकृष्ण पिंपळात लुप्त झाला आणि माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या घराच्या अंगणात  नसून सासरवाडीला अंथरूणात झोपलो आहे , हे समजायला मला काही वेळ लागला होता ! तुळशीतला हाच श्रीकृष्ण मला नोकरीत आलेल्या संकटाच्या वेळी उपयोगी पडला होता. मीच कृतघ्न निघालो. त्याची मनासारखी पूजा करू शकलो नाही . समोर असूनही त्याला ओळखू शकलो नाही. आता त्याच्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

           आज लंबूवहिनी उगवली. बीना आणि तिची आई येऊन गेली. राजूची बायको व मुलगीही येऊन गेली. माणसे येतात म्हणून बरे वाटते. संध्याकाळ होऊन गेली आहे. मुलाने त्याचे भाडे घरमालकाच्या खात्यात आजच अाॅनलाईन भरले आहे. जेवणाची वेळ आली की कसे तरीच होऊन जाते. तो आणि त्याच्यासारखी परक्या शहरात एकटे राहणारी व जेवण बनवता न येणारी मुलं काय करून खात असतील, या विचाराने जेवणही जात नाहीय. झोप तर कधीच उडाली आहे !


( क्रमश: )
...........

रविवार, ३ मे, २०२०

Nothing to say more अधिक सांगण्यासारखे काही नाही


मागे - पुढे

02.05.2020

         आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग एकोणचाळीसावा दिवस.  सकाळपासून फारसे मागच्या वा पुढच्या दारावर विशेष असे काही घडलेच नाही.   चिपळूण व संगमेश्वर येथे मिळून दोन कोरोनाबाधित रूग्ण मिळाल्याची बातमी आली आहे. संपूर्ण दिवसांत लंबूवहिनी कुठे झळकली नाही , हेच आजच्या दिवसाचे विशेष ! तिकडे चीन अमेरिका जोरात सुरू आहे. भारतासारखे देश मध्येच लटकत राहणार हे उघड आहे. धड चीनचा बहिष्कारही करता येत नाही आणि अमेरिकेच्या पुरस्काराचा मोहही सोडवत नाही. अमेरिका जे करायचे ते करतेच आहे. ते पक्के व्यापारी लोक . आपल्याला सोयीनुसार वापरायलाच बघणार. आम्ही त्यांच्याकडून आमच्याबद्दल  साधारणसे का होईना पण दोन शब्द आमच्याच कानावर कधी पडतात त्यासाठी तोंड उघडे करून बघत बसलेलो असतो ! प्रजासत्ताक लोकशाही देशाची मान आपण किती ताठ ठेवतो आहोत ! इकडे महाराष्ट्रात उतावळा नवरा आणि नाच्या कंपनी व-हाड लिमिटेड आपल्याच गळयात माळ पडणार या कल्पनेने कोरोनात लोकांचे जीव जात असतांनाही सतत मोहरलेले असतात ! मुंबईचे आयएफसी गुजरातला हलवून मुंबईला अनेक वर्षे तरी फारसा फरक पडणार नाही. मुंबई ही काही एक दोन वर्षात उभे राहिलेले ठिकाण नव्हे ! त्यामागे अनेकांचे कष्ट , प्रामाणिकपणा , नीतीमत्ता , कल्पकता व हुशारी हे गूण आहेत. हा पाया भक्कम आहे. बालीश प्रयत्नांनी तडा जाण्याएवढा तो नक्कीच कमकुवत नाही !
बाकी कोरोनाचा प्रसार होतोच आहे. बरे होणा-यांचेही प्रमाण ब-यापैकी आहे. तिन्ही सेनादलांकडून कोरोना वॉरीयर्सवर पुष्पवृष्टी केली जात आहे. तिकडे नाशिकहून परप्रांतीयांना ट्रेनने त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे. आता इतर ठिकाणांहूनही हेच होणार आहे. पुण्यात  तहसिलदार कार्यालयात प्रवासासाठी परवाने मिळणार असा संभ्रम पसरल्याने लोकांनी तोबा गर्दी केली आहे. वास्तविक पुढील सूचना मिळण्यासाठी लोकांकडून फक्त त्यांचे ईमेल अॅड्रेस तेही अाॅनलाईनच मागविण्यात आले होते.  एकूणच लॉक डाऊनबाबत लोक प्रचंड संभ्रमात पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा त्रासही प्रचंड वाढतो आहे. लोकांसाठी काही करायला जा , ते त्यांना करायचे तेच करतात ! थाळया वाजवायला सांगितले की ड्रम वाजवतात. फटाके वाजवतात. कोणत्या वेळी काय करावे हेच त्यांना कळत नाही असे झाले आहे. हे लोक भारताला जागतिक महासत्ता बनवण्यात महान योगदान देणार आहेत म्हणे ! तेही बुलेट ट्रेनच्या ( काल्पनिक ) वेगाने !
            बाकी सकाळ , दुपार क्रमाने पार पडली आहे. आता संध्याकाळ झाली आहे. ही खालच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करतेय. मी पाण्याचा साठा पाहून झाडे शिंपू की नको या विचारात पडलो आहे. अखेर मागच्या अंगणातली दोन झाडे शिंपली. खालच्या बाजूची झाडे शिंपण्याएवढे पाणी शिल्लकच नव्हते. आज लंबूवहिनी अजून खाली आलेली नाही. रस्त्याने दुकानात जाणा-या चिंग्याला सौ.ने बिस्कीट पुडे व दूध आणायला पैसे दिले . रात्र झाली. आज दूध बिस्कीटे खाऊन पोटाला आराम दिला . रात्री अकरा वाजता लादीवर पहूडलो.

( क्रमश: )
...........

शनिवार, २ मे, २०२०

The missing clue हरवलेला दुवा


मागे - पुढे

01.05.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग अडतीसावा दिवस. 01 मे. महाराष्ट्र दिन + कामगार दिन. त्याच्या पूर्वरात्रीला अर्धी रात्र झोपच आली नाही. आधीच गरम्यामुळे झोप येत नव्हती.  त्यात रात्री 11.15 ला मेसेंजरवर झोप उडवणारा मेसेज आला. तो असा :

 🔴 *रत्नागिरी खबरदार ब्रेकिंग न्यूज : मुंबई ते आंध्रप्रदेश व्हाया रत्नागिरी गाडीतून जाणारा एकजण आढळला कोरोना पॉझिटिव्ह*

➡️ *रत्नागिरी :* पाईपच्या गाडीतून रत्नागिरी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या तीन इसमांना मलकापूर चेक नाक्यावर पकडले असता त्यातील एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर इसमाला शाहुवाडी पोलिसांनी मलकापूर चेक पोस्टवर २६ एप्रिल रोजी पकडले आहे. हा इसम मुंबईतून रत्नागिरीत आणि रत्नागिरीतून कोल्हापूरकडे जात होता अशी माहिती मिळत आहे. रत्नागिरी पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस या इसमाच्या प्रवासाची साखळी शोधत आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी रत्नागिरी खबरदारला दिली आहे. रत्नागिरीतील एका नामांकित कंपनीत हा ट्रक आला होता व या ट्रक मधून या इसमाने प्रवास केला आहे अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

*रत्नागिरी खबरदार*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
www.ratnagirikhabardar.com
10:30 PM 30/Apr/2020

              तिकडे कोरोना मुक्त म्हटला गेलेला सिंधुदूर्ग जिल्हा असाच पुन्हा कुणा बाहेरून आलेल्या कोरोनाग्रस्तामुळे धास्तावला आहे. आता मलकापूरात सापडलेला माणूस रत्नागिरीत कुणाकुणाला भेटून गेला आहे , काय माहीत ! पुन्हा एकदा पोलीसांना साखळी शोधायचे काम करीत बसावे लागणार. लोकांनाच शिस्त नसेल तर पोलीस तरी कुणाकुणाच्या मागून धावणार !  यानंतर तर परदेशातून माणसे आणली जाणार आणि पुण्यामुंबईतून चाकरमानी कोंकणात आणण्यात येणार , यावरही चर्चा सुरू आहेत. हा जर विचार असेल तर पुण्यामुंबईत ज्यांच्या मुलांना नोकरीधंदयामुळे एकटे राहणे आजही अपरिहार्य झाले आहे , त्यांच्या मदतीला  किमान त्यांच्या आईवडिलांना कोंकणातूनही पुण्यामुंबईला जायचे असल्यास जाता यावे , अशी त्यांची अपेक्षा असणारच आहे. याही विचाराचा विचार शासनाला करावा लागेल असे दिसते.  असो. तर शेवटी रात्री एक वाजता पलंगावरून खाली नुसत्या लादीवर जाऊन झोपलो. तेव्हा कुठे दोनच्या दरम्याने जरा झोप लागली . सकाळी नळाला पाणी येणार नसल्याने सहा वाजता जाग येऊनही पुन्हा झोपलो तो पावणेआठला उठलो. अकरा वाजता उदू येऊन गेला. बाकी कुणीही आलेले नाही. दुपारी दोन वाजता जेवलो . जेवताजेवता मला मिनाक्षीच्या माहेरच्या घराकडे जाणारा रस्ता दिसू लागला. विशेषत: तो पूल आणि त्यापलीकडील भाग दिसला आणि माझी लिंक तुटली. ब-याच दिवसांनी मला हा अनुभव आला. मी लगेच सौ. ला मिनाक्षी संदर्भात एक दोन प्रश्न विचारले. लिंकबाबत काहीच सांगितले नाही. जेवल्यानंतर शतपावली झाली. वामकुक्षी  करता करता झोपच लागली ! पाच वाजता मुलाचा फोन आला तो घेतांनाच पुढच्या दरवाजावर जोरातच थापा ऐकायला आल्या तसा मी धडपडत उठलो. एवढी कोणाला अर्जन्सी आहे म्हणून शर्ट न घालताच दरवाजा उघडला तर बाहेर मराठवाडीतल्या दोघीजणी !  त्यांना बसायला सांगून सौ. ला उठवलं. सौ.ला त्यांनी बीनाच्या आईला बोलवायला सांगितले. मला जेवतानाची माझी लिंक व मीनाक्षीची मी सौ.कडे केलेली चौकशी आठवली. आतापर्यंत पार हिमालयातल्यावगैरे दूरच्या गोष्टी डोळयावर दिसत होत्या, आता तर जवळच्याच गोष्टी दिसतायत आणि त्याची प्रचितीही अवघ्या तीन तासातच येत आहे ! हे गूढ काय आहे ? काही गोष्टी मला उघडया डोळयांनी का दिसतात ? त्या कोण दाखवतंय आणि का ? कळत नाही !  बीनाची आई आली आहे. त्यामुळे  त्यांची चर्चा सुरू झाली आहे. मी आतल्या खोलीत बसून ऐकतो आहे.  प्रकरण गळयाशी आलेले आहे असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. मीनाक्षीने उसने पैसे घेतले आणि त्यानंतर काही कारणांनी ती जी माहेरी जाऊन बसली ती वर्ष होत आले तरी सासरी येतच नाहीय. फोनही उचलत नाही.  बीनाच्या आईने त्या कर्ज प्रकरणात मीनाक्षीची जबाबदारी घेतल्याने ती अडचणीत आली आहे. मीनाक्षीचा नवरा पैसे देतो देतो एवढेच सांगतो आहे. थोडे थोडेही देत नाहीय. त्यामुळे त्याचा विश्वास हया बायकांना नाहीय. शेवटी तुम्ही दोन दिवसांत पैसे द्या नाही तर वाईटपणा येईल , असे बीनाच्या आईला निक्षून सांगून त्या दोघीही गेल्या.  आता सात वाजले आहेत. हिने बातम्या लावल्या होत्या पण फोन आल्याने ती बीनाकडे गेली आहे तोपर्यंत मी चँनेल बदलले. बीबीसीवर इंग्लंडमधल्या चीनच्या अँम्बँसीडरची मुलाखत चालू आहे. ते महाशय प्रत्येक आरोप नाकारत आहेत. सत्य अजूनही जगापासून दूर आहे. राहवत नाही अशावेळी हटकून कविता जन्म घेते. वाचा माझी ताजी कविता इथल्याइथे....

ज्याला त्याला आपापल्या देशात आपापली खुर्ची टिकवायची आहे  !
सत्ताचक्रात अडकलेल्यांची तडफड बघवत नाही !
कोरोनाचा कोणताच धागा कोणाशीच कोणी जुळवत नाही !
कोरोनापूर्व वर्षभर झालेल्या मान्यवरांच्या सगळयाच गळाभेटी पारदर्शक असतील काय ?
राजकीय व्यापारीकरणाची महत्वाकांक्षा जागतिक महासत्तेचे गाजर दाखवून काय साधत होती बरे ?
करोडो माणसांचे कोरोनामागचे असलेच जर खुनी तर ते मूठभर असतील काय ?
चीन अमेरिकेकडे आणि अमेरिका चीनकडे बोट दाखवीत राहीलही ,
कदाचित चीनला शिक्षा होईलही पण त्यानंतर घडलेल्या मानवी हत्याकांडात जगाचा इटली होऊन गेला आहे , हे सत्य राहीलच !
विमानातून आयात केलेल्या कोरोनामुळे मधल्यामध्ये आपलाच इटली होतांनाही आपण भांडत राहू आपल्यातच,
कुणाच्या तरी राजकीय महत्वाकांक्षांना खतपाणी घालीत ,
डोळयांवर भक्तीची आणि गुलामीची पट्टी लाऊन !

                   बघा कवितेतून काही दुवा मिळतो का ? नाही तरी  बातम्या सुरू आहेतच ...भारतात केंद्र सरकारने 03 मे रोजी संपत असलेला लॉक डाऊन 04 मे ते 17 मे 20  पर्यंत वाढवला आहे. झोननिहाय शहरांची विभागणी झाली आहे. बातम्या सुरू आहेत. बातम्याच सुरू राहणार आहेत. जगाचा अंत झालाच तर त्याची शेवटची ब्रेकींग न्यूज कोण सांगणार आहे आणि कोण ऐकणार आहे ?

( क्रमश: )
...........






   








शुक्रवार, १ मे, २०२०

न लिहिण्याचा दिवस

मागे - पुढे

30.04.2020

                  आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सदतीसावा दिवस.

          क्षमा करा , पण कोेरोना व्हायरस जगभरात घेत असलेले बळी आणि त्यासह भारतीय सिनेजगतातील

      निखळतो हा एकेक तारा 
     सोसते पृथ्वी रोज धक्के !

..... या विषण्ण अवस्थेतील पार्श्वभूमीवरही होत असलेले घाणेरडे राजकारण   ....
यामुळे आज काही लिहिवतच नाहीय.....


( क्रमश: )
...........