गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

Corona virus locked down in fifteenth day in India

मागे - पुढे

08.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा पंधरावा दिवस . बुधवार. आज काही स्वप्नंवगैरे पडले नाही. हवे तेच काय नको ते पण कोणी स्वप्नात आले नाही. शेजारच्या हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी होत होती. कोरोनामुळे माणसे जास्त जमू शकत नव्हती. नेहमीप्रमाणे मागच्या दारी जाऊन पाण्याची व्यवस्था केली. आजही मी व्यायाम सुरूच ठेवला. आता अंग थोडे सैल झाले आहे. पाय दुखायचे कमी आले आहेत.  पुढच्या दारी सूर्याची कोवळी किरणे स्वीकारत अंगणात आलो तर खालच्या दिशेने मासळी बाजार तुडूंब भरलेला. आज  हनुमान जयंती असूनही मासे खरेदी सुरू होती. कदाचित , लोक सकाळीच मंदिरात जाऊन शुचिर्भूत झाल्याने दुपारी मासे खायला हरकत नसावी.  पण खरेदी मात्र सकाळच होत होती. म्हणजे मंदिरात जायचं , हात जोडून पाया पडून घराकडे परततांना वाटेत मासे घ्यायचे आणि घरी जायचे असा क्रम आहे. तसंही देव तर सर्वत्र असतो. सर्वात असतो.  

      हल्ली सकाळची लंबूवहिनी काजूबियांसाठी डोंगरावर जाते. त्यामुळे इकडची तिची प्रभातफेरी चुकते. एका अर्थाने ते बरेच असते. सकाळी तरी पूर्वग्रहदूषित वातावरणापासून सुटका मिळते. उगाच नको ते वाद नको त्या वेळी तरी नकोत ! तीच काय , दुसरेही कोणी बराच काळ न आल्याने आमचा नाश्ता व्यवस्थित झाला . आज साफसफाई लांबल्याने माझी आंघोळही लांबली होती. सौ.ला बचत गटाच्या कामासाठी बँकेत जायचे होते. बस , रिक्शा लाॅक्ड डाऊनपासून बंदच असल्याने शहरात जायला काहीही साधन नाही. आमची गाडीही मुलाने त्याच्या मित्राकडे आणि त्याच्या मित्राने त्याच्या बहिणीकडे पूर्वीच ठेवली असल्याने तीही आणणे शक्य नाही आणि आणूनही फिरता येणार नाही. एखाद्या वेळीसाठी मग मिलेश आहेच. ही मिलेशच्या बाईकवरून बँकेत गेली. घरात मी तासदोन तास एकटाच असणार , काय काय करायचे याचा विचार करीत मी बाथरूमकडे वळण्यासाठी पुढचे दार बंद करणार तोच गेट उघडून उदू येतांना दिसला. हे असे अनेकदा घडते. आपण एक विचार करतो आणि घडते दुसरेच. आपणही दुस-याशी महत्वाचे बोलायला म्हणून त्याच्याकडे जावे तर तिथे नेमके कोणी तरी आपल्या आधीच येवून बसलेले असते , नाही तर नंतर तरी मध्येच कडमडायला येते. बिचारा उदू कोरोना लाॅक्ड डाऊनपासून आलेलाच नव्हता.  ब-याच दिवसांनी तो आला. साहजिकच तासभर गप्पा रंगल्या. उदू गेला तसा मात्र मी दरवाजा बंद करून आंघोळ करायला गेलो. मग देवपूजा , अध्याय वाचन झाले. थोडया वेळाने ही आली. दुपारचे जेवण झाले. मी काही वामकुक्षी केली नाही. ही झोपली होती. मी हॉलमध्ये फिरत होतो. साडेतीन वाजता लंबूवहिनी दारात उगवली . मी तिला ही झोपली आहे एवढेच खिडकीतून सांगितले. दरवाजा उघडलाच नाही. मला जगभर माणसे मरत असतांना , मरणाच्या दारातही माणसांमाणसांमध्ये भेदभाव करणा-या हया मानवी भूतांना दरवाजा बंदच करायचा आहे. नशीब ती निघून गेली. एक तर हया पार्श्वभूमीवर आणि मुलाच्या व भावाच्या काळजीने रात्र रात्र आम्हांला झोप नसते. दुपारी झोपायला जावे , तर ही पिशाच्चं उठवायला येतात. येतात तीही सतरा ठिकाणी फिरून . जगभरच्या बातम्या गोळा करून कुणाच्या तरी मनातले ऐकीव गरळ ओकण्यासाठी ! व्देषाचा विषाणू पसरवण्यासाठी. आज सौ. पावणेपाचला उठली . चहा घेतला. मग आम्ही टीव्ही लावून बसलो. थोडया वेळात लंबूवहिनी आलीच. सौ. ने शहरात तिसरा रूग्ण झाल्याचे बोलताच लंबूवहिनीने '' कोणाचा ? '' असा विशिष्ट अंगुलीनिर्देश होईल अशा स्वरात अधीरतेने विचारलं.  मी तिला झापलीच. कोरोना कोणाचाच नाही . तुझ्यावर ही वेळ येत नाही किंवा तुझे जवळचे कोणी कोरोनाबाधित होत नाही किंवा मरत नाही तोपर्यंतरच तू हे बोलू शकतेस हे लक्षात घे , असे तिला सांगताच तिचे थोबाड बंद झाले. हया नशिबाच्या गोष्टी आहेत. काळ कोणाला पकडील हे सांगता येणार नाही. आता तरी सगळे एकच आहेत हे लक्षात घ्यायला हवे. कोरोना ही निवडणूक नाही , हे युध्द आहे . मानवाच्या अस्तित्वाच्या संघर्षाचे. अजूनही अफवा पसरवणा-या हया अर्धवटांना हे कळत नाही. यांना माणसे तरी कसे म्हणायचे ? उद्या हे लोक अन्नधान्याचे पीक कोणी पिकवले आहे , पाणी कोणी पुरवले आहे, हेही तपासून बघतील. याच दिशेने हया वेडयांची वाटचाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. एवढयाश्या गावात ही केवढी वैचारिक पातळी गाठली जाते आहे ! या विचारांनी मी रात्रीही व्यथितच होतो...


         ( क्रमश: )

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

Fourteenth Day of Corona locked down in India

मागे - पुढे

07.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा चौदावा दिवस सुरू झाला . आज मंगळवार. आज पहाटे विचित्र स्वप्नं पडले. मागच्या दारी असलेला परिसर दिसला. पण तो माझ्या बालपणीचा. त्यावेळी घरात आणि अंगणातही सिमेंटकाँक्रीट नव्हते. सर्वत्र मातीच होती. मागच्या अंगणात पश्चिमेच्या गडग्यापासून तीन चार फुटाचा मातीचा भराव टाकलेला होता. प्राथमिक शाळेत आम्हांला पैशाचे झाड नावाचा धडा होता. माझ्या काही बालमित्रांनी मातीत काही पैशांची नाणी त्यांचे झाड होईल या भाबडया कल्पनेने ठेवली होती. मीही माझ्या मागील दारच्या त्या मातीच्या भरावात दहा पैशाचे एक नाणे रूजत घातले होते ! खरेच, त्यावेळी किती निरागस होतो आम्ही ! तर स्वप्नात तो मातीचा भराव , तो मागील दारचा जुुना परिसर , ते जुने घर आले.  मी भरावाच्या दक्षिणेला असलेल्या केळीच्या झाडाजवळ उत्तरेकडे तोंड करून उकीडवा बसलेला असतो. तिथे मी कसा गेलो, खाली बसून मी काय करीत होतो , हे मला त्या स्वप्नातही समजलेले नाही. तर मी उत्तर दिशेला तोंड करून समोरच्या मातीकडे बघत असतानाच मातीमध्ये चर खणलेला किंवा खड्डा पडलेला दिसला व त्यावर मध्येमध्ये अंतर ठेवून तीन चिरे ठेवलेले असतात. त्यापुढे मात्र तो चर दोन भागात विभागलेला असतो. एक फाटा वायव्येकडे तर दुसरा फाटा ईशान्येकडे गेलेला दिसतो. हे दोन्ही फाटे गडग्यापर्यंत गेलेले असतात. म्हणजे माझ्यापासून साधारण पाच सहा फूट लांब. त्या चरात पाणी भरतांना दिसते. त्यात छोटया लाटा उठतात. नदीच्या पात्रातल्या लाटांसारख्या . पाण्याला अचानक वेग येतो आणि ते एकदा वायव्येला , एकदा दक्षिणेकडे तर एकदा ईशान्येकडे या क्रमाने मागे पुढे फिरत राहते. तीन ठिकाणी फिरणारे ते पाणी अन्यत्र कुठेही जात नसते. आश्चर्य म्हणजे लाटा असूनही व पाण्याला वेग असूनही पाणी त्या चराच्या वर येत नव्हते. ही मर्यादा त्याला कोणी घातली होती ? पाण्याचे ते कसले हेलकावे होते ? पाण्याची ती कसली आंदोलने होती ? त्याला कोण दिशा देत होते ? कोण त्याची दिशा नियंत्रित करत होते ? हे मला त्या  स्वप्नातही कळले नाही आणि स्वप्नं संपल्यानंतर जागा झाल्यावरही कळले नाही. कसली विचित्र स्वप्नं पडतात मला ! एक तर माझे पोट खराब असावे किंवा त्या स्वप्नाने काही तरी सूचवले असावे. दक्षिण , वायव्य , उत्तर , ईशान्य आणि पूर्व असाही स्वप्नातील घटनांचा दिशाक्रम होता. ते पाणी ठराविक पध्दतीनेच दिशा न बदलता कसे फिरत होेते ? या दिशांना काय घडणार आहे ? की तो कोणत्या प्रांताचा नकाशा तर नसेल ना ? कोरोना हाॅटस्पाॅटसशी याचा काय संबंध असेल का ? मी टीव्ही लावला तेव्हा एका चँनेलवर मुंबईतले कोरोनाबाधितांचे हाॅटस्पाॅटस् दाखवत होते तेव्हा मुंबईचा नकाशा काहीसा स्वप्नातल्यासारखाच वाटला. कदाचित तो भासही असेल. उलटे झाले असेल. स्वप्नी वसे ते समोर भासे, असेही असेल. कोणाला असे काही स्वप्नं पडले असेल तर त्यांनी हया पोस्टखाली अवश्य कमेंट करावी. तुमच्यापैकी कुणाला माझ्या स्वप्नाचा अर्थ लागला तरी कळवावे , ही विनंती.

             अलिकडे माझ्या एक गोष्ट लक्षात येऊ लागली आहे. माझे पाय पुन्हा दुखू लागले आहेत. खाली बसतांना आणि वर उठतांनाही मला त्रास होतोय .  मध्यंतरी असे होत नव्हते. नाश्ता करता करता मी त्याचाच विचार करत होतो. अचानक माझ्या लक्षात आले की माझी लवचिकता कमी झाली आहे कारण हल्ली माझ्या कसरती थांबल्या आहेत. नेहमीच्या कामांतून हालचाली होत होत्या , पण त्या ठराविकच साचेबध्द होत्या. हल्ली बराच काळ मी विहीरीवरून पाणीही आणले नव्हते. कोरोनामुळे घरातच बंदिस्त झाल्याने हिंडणे कमी झाले . लवचिकतेसाठी मी पूर्वी कसरती करीत होतो त्याच आज संध्याकाळपासून सुरू करायच्या हे मी चहा पीता पीता ठरवले.

             स्वप्नाचाच विचार करत करत मी आठ वाजता आलेले पाणी भरले. टीव्ही लावला. पुणे , मुंबईत कोरोना वाढतोय. बातम्या बघणे कठीण झाले तसा मी टीव्ही बंद केला. स्नान करून देवबत्ती केली. श्रीपाद श्रीवल्लभांवरील दोन अध्याय वाचले. गेले दोन तीन दिवस या दरम्याने कोणीच येत नसल्याने दोन्ही अध्याय विनाव्यत्यय वाचले जात आहेत. वाचनानंतर मात्र लंबूवहिनी आली. ती बाजारात गर्दी करणा-या मुंबईकरांबाबत बातमी घेऊनच आली . तसं मी तिचं जरा बौध्दिक घेतलं. गळयापर्यंत आलं तरी , निवडणुकीच्या काळात मतं मागायला येणारे सर्व पक्षीय प्रचारक लोकांना गर्दी करण्यापासून रोखण्यासाठी , पोलीसांना मदत करण्यासाठी अजून बाहेर का येत नाहीत ? मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लोकांना गर्दी करू नका असे आवाहन करण्यासाठी , पोलीसांना मदत करण्यासाठी हया प्रचारकांनी व कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे.  प्रचार करायला बाहेर पडायचे त्यांचे आवाहन जसे लोक ऐकतात व उन्हातान्हातून बाहेर पडतात , तसेच प्रचारक व कार्यकर्त्यांचे घरातच राहण्याचे आणि गर्दी न करण्याचे आवाहनही लोक ऐकतील . माझे हे बोलणे तिला चांगलेच झोंबलेले दिसले.  लंबूवहिनीने विषयच बदलून टाकला. ही तीच लंबूवहिनी आहे जी कुणाच्या तरी सांगण्यावरून निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाचा प्रचार न करणा-या लोकांबद्दल तिच्या पक्षाच्या लोकांकडे तक्रारी करीत असायची. जिला बूथवर कोणी वडापावसुध्दा देतांना मारामार होती ती अडाणी बाई आज आम्हांला चिथवायला आणि शिकवायला बघत होती. तिचे ऊत आलेले धर्मांध बोलणेही मी असेच खोडून काढले होते. वेळ काय , आपण करतोय काय ! शिकूनही अडाणी असलेले तिचे बोलाविते धनी मला माहीत होते. ती एवढी मूर्ख की त्यांना स्वत:चा असा वापर करू देत होती. मी तिचे ब्रेन वाँशिंग करून तिला वास्तवतेची जाणीव दरवेळी करून देतो आहे. दुर्दैवाने आमच्या शहरात तिसरा कोरोनाग्रस्त सापडला. ही एक महिला आहे. याची चिंता न करता दुस-यांनी हेतूपुरस्सर पेरलेले विचार उचलणारे काही गावठी सुशिक्षित अडाणी त्यावर नको ती चर्चा करतील आणि लंबूवहिनीसारख्या द्वेषफैलावकर्तीला आमच्याकडे बातमी सांगायला पाठवतील. मला पुन्हा तिचा ब्रेनवाँश करावा लागेल.

               हळूहळू दुपार झाली. जेवणं झालीत. वामकुक्षीही पार पडली. चहा घेऊन सौ. बीनाच्या आईबरोबर काही अत्यावश्यक कामासाठी गावातील दुकानात जाऊन आली . तिकडून येऊन मीतला बघायला निघाली. मला तुम्ही नका येऊ म्हणून सांगितलं. पण मी का नको म्हटल्यावर येता तर चला नाही तर मग तुम्ही उद्या जा , असं म्हणाली. मी दोन्ही बाबीना नकोच , तू जा , हे एकच उत्तर दिल्याने ती एकटीच निघून गेली. मी सकाळी ठरवल्याप्रमाणे कसरती सुरू केल्या. पाच दहा मिनिटातच मला खूप बरे वाटले. आनंद मिळाला तशा मी अधिक कसरती सुरू केल्या. वेगात चाललो. जागच्या जागेवर धावलोसुध्दा ! खूप बरं वाटलं. ही आली तेव्हा मी देवाजवळ बत्ती लावत होतो. मग टीव्ही लावला तर लाँकड डाऊनचा नवा आराखडा केंद्र सरकार तयार करीत असल्याची बातमी होती. तिकडे एबीसी आँस्ट्रेलियावर चीनमध्ये काही तासात एकही नवा कोरोना बाधीत रूग्ण नसल्याची बातमी होती. लुहान शहर हळहळू मोकळा श्वास घेणार असे दिसत होते. बीबीसीवर पण कोरोनाबाबतच सुरू होते. मग मी  मालिका बघण्यासाठी सौ.कडे रिमोट सोपवला. काही काळाने आम्ही जेवलो. पौर्णिमेचे दिवस असल्याने बाहेर मस्त चांदणे होते. मग अंगणात शतपावली करून अकरा वाजता झोपी गेलो.

    ( क्रमश: )

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

Thirteenth day of corona locked down

मागे - पुढे

06.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा तेरावा दिवस सुरू झाला . आज सोमवार . वीज जाण्याचा वार. सद्या संपर्काचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल. तो रिचार्ज हवाच. मी दोघांचे मोबाईल चार्जिंगला लावले. लाईट आहे तोपर्यंत मागच्या दारी जाऊन पंपाने पाण्याची व्यवस्था केली. पुढे आलो तर पुढे खालच्या बाजूला अजिबात मासळीबाजार नव्हता. काल रविवार असल्याने दोन तीन तास चालला होता. सोमवार असल्याने ब-याचजणांचा उपवास . रस्त्यावर कोणीच नव्हते. मी परिसर स्वच्छता केली . तेवढयात मेसेंजरवर केरकळ सरांचा संदेश आला. मग तर त्यांनी फोनच केला. बराच वेळ बोलत होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सरांची निर्णय क्षमता, मोठमोठी कामे शांतपणे हातावेगळी करण्याची हातोटी आठवली.  कोणाच्याही सांगण्यात न येता परिस्थिती हाताळण्याचे कसब हे त्यांचे सर्वात मोठे कसब होय. त्यामुळे त्यांचे कान भरणे कुणालाही कधीच शक्य झाले नाही.  माझ्यासाठी ते वरदान ठरले. मी अधिक मन लाऊन व मोकळया वातावरणात काम करू शकलो , ते केवळ सरांमुळे ! ते इकडे असतांनाचे सुखी दिवस आठवले. जुने सहकारी आठवले. सरांना आणि मलाही एकमेकांशी बोलून खूप हलके वाटले. खरे तर , केरकळ सरांची बदली झाल्यानंतर आलेले ए.एम. जाधव सर आणि खुरसाडे सर यांच्या हाताखाली काम करतांनाही मला असेच चांगले वातावरण मिळाले. हे बोलत बोलत सौ.सोबत नाश्ता केला. टीव्ही लावून बसलो. दुपार झाली. बंदू बंदिनी वहिनीला डिस्चार्ज मिळाल्याने दवाखान्यातून घरी घेऊन आला, हे त्यांने लगेच मला फोन करून सांगितले. मीही त्याला पहिली सर्वांनी डेटाँलने आंघोळ करा , वहिनीला जेवायला द्या , विश्रांती घ्यायला लावा व नंतर बाकीच्यांनी जेवून विश्रांती घ्या, संघ्याकाळी बघायला येतो, म्हणून सांगितले.

            मग आमचेही जेवण झाले. वाचन, लेखन पार पडले. काही मिनिटांच्या वामकुक्षीसाठी जरा पहुडलो. मध्येच जागेपणीच मिटल्या डोळयांसमोर दृष्य तरळले. मी कुठल्या तरी घनदाट जंगलात आहे. बहुधा हिमालयाकडील भाग असावा. मी उभा असतो तिथून दहाबारा फुटावर एका प्रचंड वृक्षाभोवती चौकोनी पार बांधलेला आहे . वृक्ष पाराच्या मध्यभागी आहे व त्यालगतच त्याच्याभोवती वर्तुळाकार माती दिसते आहे.  त्या पाराला पातळ  फिकट हिरवा पोपटी रंग दिलेला आहे व तो आता जुना झालेला आहे.  त्या पारावर एक खूप उंच , धिप्पाड माणसासारखा दिसणारा प्राणी पूर्ण नग्नावस्थेत बसलेला असून त्याला मोठया साखळदंडांनी बांधलेले आहे. तो हातांची हालचाल करायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या डोक्यावर आणि सर्वांगावरच मोठे केस आहेत. त्याच्या नजरेत काहीतरी दिसते आहे. तो मला काही तरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. कदाचित सुटका करण्यासाठी असेल. पण मला ते समजत नाहीय. आजूबाजुच्या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर त्याचा मातेरी रंग आणि अंगावरचे केस उठून दिसत आहेत.  मला त्याच्या मागच्या हिरवळीचा एक कोपरा खूप कोवळा व ताजा टवटवीत असलेला दिसला आणि त्याचक्षणी माझी लिंक तुटली. मी पुन्हा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करूनही कनेक्ट होऊ शकलो नाही. अखेर तो प्रयत्न सोडून देऊन मी उठलोच. सौ.ला मी हे नंतर चहा पीता पीता सांगितले. माझ्या नजरेसमोर अगदी जागेपणीही अशी दृष्ये कधी कधी तरळतात आणि त्यांचा सहसा अर्थ लागत नाही पण कालांतराने प्रत्यंतर येते, हे तिला माहीत असूनही या वेळचे दृष्य तिला विचित्र वाटले. आपला पती यतीशी थेट कनेक्ट झाला होता की काय अशी शंका तिला आली आणि कोरोनाच्या उगमाशी त्या प्राण्याचा काही संबंध असावा काय अशी शंका मला आली.

          थोडया वेळाने बीनाची आई आली. मग लंबूवहिनीही आली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. लंबूवहिनी म्हणजे पेटते वार्तापत्र.  तिकडे शहरातही काही तणाव होता म्हणे. जमाव जमला होता म्हणे. पण पोलीसांनी नियंत्रणात आणला. हे खूप चांगले झाले. सर्वांनाच सद्बुध्दी येवो.  पावणेसहा वाजता सौ. ने मुलाला फोन केला. नंतर आम्ही बंदिनी वहिनी व बीनालाही बघायला गेलो. तिकडून येऊन मी झाडांना पाणी शेंदले . मग गच्चीवर फिरलो. तोवर संध्याकाळ झाली. शेजारच्या मंदिरात घंटानाद सुरू झाला . मग खाली येऊन दिवाबत्ती केली. लंबूवहिनी पुन्हा आली व  तिच्यासाठी ठेवलेला डाळभात घेऊन गेली. ती आता आमच्याकडे कामाला नसली तरी काही असेल तर तिला आम्ही फोन करून बोलावून ते देतोच. टाकून देण्यापेक्षा कुणाच्या तरी मुखी लागलेलं बरं असतं. कष्टकरी माणसाच्या मनात नको तो व्देष भरवण्यापेक्षा अन्न भरवणे हाच खरा धर्म आहे. तिकडे पुण्यात मुलगा वेळेवर आणि व्यवस्थित जेवत नाही ही आमची व्यथा आहे. सौ. ने त्याला फोन करून याबाबत पुन्हा विनंत्या केल्या. सूचना केल्या . सततच्या सूचना ऐकून तो टाळया वाजवू लागताच माझे प्रेशर वाढले. मी फोन घेतला आणि त्याला झापला. प्रसंग काय , तुला ती काळजीपोटी सांगतेय तर तू टाळया कसल्या वाजवतोस ? वेळ काय , तू करतोस काय ! स्वत:ची काळजी घेतलीस तर आम्हीही इथे व्यवस्थित राहू. जरा विचार कर व मेहेरबानी करून स्वत:ला फीट राख. माझा पारा चढल्याने सौ. ने फोन काढून घेतला व ती मुलाशी बोलू लागली. मी माझा राग स्वत:च शांत करू लागलो. अंगणात फिरू लागलो. सद्य परिस्थितीमुळे मी हल्ली काहीसा पटकन भडकतो व माझा नेहमीचा हसरा स्वभाव हरवून बसतो, हे विचार करता करता माझ्या लक्षात आले. मग मी शांत झालो आणि आपण पुन्हा मिश्कील झाले पाहिजे हेही कळले. मला जरा बरे वाटले. सौ. बहुधा थकली होती. साडेदहा वाजले तशी ती बेडरूमकडे वळली. सर्व दारेखिडक्यांचा बंदोबस्त करून मीही तिकडे गेलो. सौ. लवकर झोपली , पण मला झोप येईना. मुंबईची परिस्थिती बिघडत चालली आहे. एक तर जागा अपुरी व सगळेच घरात . माणसांना जागा नाही तिथे वस्तू साठवून तरी कुठे ठेवणार ? मग खरेदीला बाहेर पडावेच लागत असेल.  शिवाय हे उन्हाळ्याचे दिवस.  अंगाची लाही लाही होत असेल. बाहेर वा-यावर फिरणेही जिवाशी  गाठ ! आता बरेचसे चाकरमानी गावी यायला बघतील. काय होईल गावांचे ? गावात वैद्यकीय सेवा सक्षम नसतात. या परिस्थितीत तर कठीणच ! बारा वाजेपर्यंत नेटवर होतो. मग मीही झोपलो.

    ( क्रमश: )

सोमवार, ६ एप्रिल, २०२०

कोरोनाचा महत्त्वाचा दिवस

मागे - पुढे

05.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा बारावा दिवस सुरू झाला . मागच्या दारी जाऊन पाण्याची व्यवस्था केली. पुढे आलो तर पुढे खालच्या बाजूला मासळीबाजार जोरात भरला होता. काल एक नेता सावधपणे म्हणाला  , '' लोकांचे अनेक प्रश्न आहेत .'' पण खरा प्रश्न असा आहे हे सारं लोकांचाच जीव वाचवण्यासाठी तर चालंलय . मग गर्दी करणा-या बेजबाबदार लोकांनाच त्याची पर्वा नसेल तर उद्या हे लोक मतं द्यायलाही शिल्लक राहणार नाहीत ! एकूण काय तर , गावातले मासळीमार्केट संचारबंदी आणि सोशल डिस्टंन्सचे तीन तेरा वाजवीत चालूच ! यात शहरातला कोणी कोरोनाग्रस्त आला तर ... ? निदान सुरक्षित अंतर तर ठेवावे ! मी परिसर स्वच्छता केली . आम्ही नाश्ता केला. टीव्ही लावून बसलो. मध्येच बंदिनी वहिनींची आठवण आली . मागे गेलो. चेतन घरीच होता. त्याला हाक मारली. चौकशी केली. तर वहिनी बरी असल्याचे कळले.  तिकडून हाँलमध्ये आलो एवढयात लंबूवहिनी सकाळी  साडेनऊ वाजता कालवी घेवून आली. कालवीचं टोपलं बाहेर ठेवून आली ती थेट घरातच....गप्पा मारायला बसली....ही मधली माणसे ...घरात बसलेल्यांना बाजार आणि बाजारवार्ताही आणून देणारी . हातावर पोट असलेली , भोळीभाबडी माणसे. पण हयांना काही बदमाश प्रवृत्तींनी कोरोनाच्या हया जीवनमरणाच्या प्रसंगीही आपले हत्यार बनवले आहे. हयांच्यामार्फत छुपा प्रचार सुरू केला आहे. तिथे करोडोनी माणसे मरत असतांना इथे जगाच्या कोप-यातल्या टीचभर गावात व्देषयुक्त अफवा पसरवण्यासाठी हयांचा ते नालायक शिताफीने वापर करून घेत आहेत. शिकूनही लोक सद्या अडाणी वागत आहेत , तिथे लंबूवहिनीसारख्या अर्ध्या हळकुंडाने पिवळया होणा-या अशिक्षित अडाण्यांचे काय घेऊन बसलात ! अशात गरीबाला कोणी पाचशे रूपयाची फुकट मदत केली तर गरीबाला ते हिमालयाएवढे मोठे उपकार वाटणारच ! त्यांना कळतच नाही की त्यांच्याच शोषणातून कमावलेल्या रकमेतलाच तुकडा त्यांच्या तोंडावर फेकला जातो आहे ! खरे तर ही माणसाला लाचार बनवण्याची , त्याला आपला अंकीत करून ठेवण्याची , पुढच्या काळात तो आपलीच री ओढील असे करण्याची तजवीज आहे. ही भ्रष्टाचार निर्मूलनाच्या वल्गना करणा-यांनीच दिलेली लाच आहे , हे हया अडाण्यांना कसे समजणार ! कोरोना प्रसारकांइतकेच हे अडाणी लोकही धोकादायक आहेत. त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेवून त्यांना प्रबळ दुष्ट लोकांनी तसे बनवले आहे. हा विचार करत करत दुपार झाली. जेवण झाले. वाचन, लेखन पार पडले. काही मिनिटांची वामकुक्षीही झाली.

                पाच वाजले. चहा झाला. ही बीनाकडे गेली. मी उद्या सोमवार असल्याने पाणी येणार नसल्याने आज झाडांना पाणी लावले नाही. त्याऐवजी गच्चीवर फिरायला गेलो. तिथून सूचलेली कविता फेसबूकवर पोस्ट केली ती अशी

इमारती , माणसे आणि पाखरे ....

दूरवर नजर टाकली तर फक्त इमारतीच दिसत आहेत
इमारतींचे चेहरेही रंगीतसंगीत आहेत
माणसे मात्र कुठेच दिसत नाहीत
पाखरांचा चिवचिवाट सुरू आहे
माणसांचा शोध घेत असल्यासारखा
मी समजूत घालतो आहे पाखरांची
ती घराकडे परतत असतांना ....

           आणखीही एक कविता सुचली. ती अशी ....

तुझ्या घरी तू सुखी रहा !
माझ्याकडे येऊ नकोस असे नाही ,
पण येतांना सर्व आधुनिक अलंकार म्हणजे , मास्क , स्कार्फ , सँनिटायझर इतकेच काय
हेल्मेट वा ऐतिहासिक शिरस्त्राणासहच ये !
पण तुझं हे साग्रसंगीत रूप आरशात मात्र पाहू नकोस कारण तूच किंचाळशील तुला पाहून !
आणि यासाठी तुझ्या नेहमीच्या तयारीसाठीचा वेळ
किमान तासभर तरी नक्कीच वाढेल ,
शिवाय
तुझ्या आणि माझ्या मनात कोरोना धगधगत राहील तो वेगळाच !
त्यापेक्षा , तू तुझ्या घरीच रहा ,
काय दिवे लावायचे आहेत ते तिथेच लाव सँनिटायझर न वापरता ,
आणि दिवे ओवाळायचे असतील तर खुशाल ओवाळ तिथूनच !
परवा ढोल बडवलेस , फटाके फोडलेस गर्दी करून
आज कदाचित तुझ्यामुळे पुन्हा गर्दी वाढेल रस्त्यावर !
तू चुकूनही गर्दी होऊ नकोस आंबटशौकीनांची !
काहीही कर , पण घरातच कर !
खरे तर पेटता दिवा घालवणे अपशकून असतो असं माझी आज्जी सांंगायची आणि तिला तिची आज्ज्जी सांगायची असं पुन्हा मला तीच सांगायची !
तरी पण मी दिवे विझवूनच दिवे लावणार आहे !
जाणीवपूर्वक अंधार करून दिवे लावणार आहे !
पण माझ्या घरातच !
ते बघायलाही तू माझ्याकडे येऊच नकोस ...
तुझ्या घरी तू सुखी रहा !

       कविता संपली तोच बंदूचा फोन आला. अरे ही बघ मला कशी त्रास देते ती ! मी म्हटलं काय झालं ? तर म्हणे तिला घराजवळचा पर्या दिसतोय आणि शेजारची झाडं दिसतायत. घरी जायचंय म्हणते. उद्या दुपारी 12 वाजता डिस्चार्ज देणार आहेत. मी म्हटलं बारा सांगू नकोस , एक वाजता सांग. चुकून उशीर झालाच तर चला , चला करतील वहिनी . तो मला म्हणाला बोल हिच्याशी. मग मी बोललो वहिनींशी. त्या म्हणाल्या , मला सगळं सांगा. मग मी त्या दिवशीच्या सकाळपासूनची कथा त्यांना ऐकवली. जरा विनोद केले तश्या त्या हसू लागल्या. जरा मोकळया झाल्या. बोलणे संपले तरी मी गच्चीवर फिरतच होतो. शेवटी दिवाबत्तीची वेळ झाली तसा मी खाली आलो. दिवाबत्ती केली . रात्री नऊ वाजता आवाहनानुसार सर्वांनी वीज बंद करून दिवे लावले. पण अपेक्षेप्रमाणेच घडले. मागच्या वेऴेला घंटेसोबतच लोकांनी रस्त्यावर गर्दी करून ड्रम बडवले . यावेळी पणत्या लावून फटाके फोडले. गर्दी करून मोठा आरडाओरडा केला. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी आम्हांला वेळ काय , आवाहन काय आणि आम्ही करतो काय , हे कळत नाही ! बाकी झोपेपर्यंत वेळ चांगला गेला. काल रात्री फक्त एकदाच जाग आली हे विशेष !

    ( क्रमश: )


रविवार, ५ एप्रिल, २०२०

कोरोना लाॅक डाऊनचा अकरावा दिवस

मागे - पुढे

04.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा अकरावा दिवस सुरू झाला तोच मुळी मिलेशच्या फोनने. सहा वाजले तसा मी बेडवरून उठतच होतो तोच फोन वाजला. सकाळीच फोन वाजला की वाईट बातमीची शंका येतेच ! मी पटकन जवळच्याच टेबलावरचा फोन घेतला. काय झाले रे , विचारताच तो म्हणाला काकीला लगेच पाठवा. बंदिनी काकीला आकडया येतायत. मी हिला पाठवलं व घराला कुलूप करून पाठोपाठच बंदूकडे गेलो. तिथे स्नेहाही होतीच. स्नेहा दवाखान्यात नोकरी करते व ती आता बरीच अनुभवीही आहे. शिवाय अशा वेळी ती धावतेही. मिलेशची आईही होतीच. संत्या , चेतन व मिलेशही होताच. बंदिनी वहिनीला कालचा बीनाचा आरडाओरडा भारी पडला असावा. गाडीवरून पडून पूर्वी तिच्या डोक्याला दुखापत झाली होती.  काल रात्री बीनाच्या टेंशनमध्ये तिची नेहमीची गोळी चुकली असावी. त्यामुळे आकडी येत असणार हे उघड होतं . वेळ घालवून चालणार नव्हतं . बंदूला विश्वासला फोन करून गाडी घेवूनच ये म्हणून सांगायला सांगितलं . चेतनला दवाखान्यात फोन लावायला सांगितलं. मी स्वत: मेट्रनशी बोललो. आम्ही पेशंट घेवून येतोय म्हणून सांगितलं. मेट्रननी डाॅक्टरांशी संपर्क साधला व परत फोन करून पेशंटला आणा म्हणून सांगितलं. विश्वास येताच बंदिनी वहिनीला गाडीतून बाप बेटे घेवून गेले .  सौ. ने बंटीला सोबत जायला सांगितलं. तो बिचारा झोपेतूनच  उठला आणि गेला. कोरोनाच्या संचारबंदीमुळे आणखी कोणी जाऊही शकत नव्हते. अर्ध्या तासातच चेतनने फोन करून त्याच्या आईला दवाखान्यात अॅडमीट केल्याचं सांगितलं. तासाभराने मी बंदूला फोन केला तेव्हा बंदिनी वहिनी व्यवस्थित हातपाय हलवू लागली होती.

           तो फोन संपला आणि हिच्या फोनवर उर्मिलाचा फोन आला. तिने मीतला आयसीयूतून बाहेर आणल्याची चांगली बातमी दिली. मीतला अॅडमीट केल्याचंही सौ. नेच प्रथम उर्मिलाला सांगून दवाखान्यात पाठवलं होतं. तेव्हापासून उर्मिलाची खूप मदत मीतची पत्नी व भावाला होत होती.  फोनवर उर्मिलाने त्याच दवाखान्यात राजूलाही डोळयाच्या समस्येमुळे आणले होते , हेही सांगितले. मीत आणि बंदिनी वहिनी यांच्या दवाखान्यांमध्ये पाचच मिनिटांचे अंतर होते. हीने बंदिनी वहिनीची बातमी उर्मिलाला सकाळीच दिली होती. त्यामुळे मीतच्या बायकोसह ती बंदिनी वहिनीलाही बघायला गेली होती , हेही तिने हिला सांगितले. म्हणजे एकाच वेळी गावातले आमचे तीन शेजारी उर्मिला हया आमच्या आणखी एका सख्ख्या शेजारणीला भेटले होते , जे खरे तर गावात उर्मिलाचेही शेजारी आहेत. पण सद्या ती शहरात राहते आहे. पण ती गावात असती तरी ती धावलीच असती. आजही मी जेवणानंतर वामकुक्षी केली नाही. दुपारी बंदू त्याच्या घरी आला होता. आंघोळ करून पुन्हा दवाखान्यात जातांना तो आमच्याकडे आला व बायको बरी आहे म्हणून सांगून गेला. त्याने प्रवासाकरिताचा परवानगी पासही दाखवला आणि सोबतची सँनिटायजरची बाटलीही दाखवली. माझी बायको संध्याकाळी पाच वाजता बीनाकडे आणि तिथून स्नेहाकडे गेली. अंतर पाच मिनिटांचे पण गप्पा दोन तासांच्या. त्यामुळे ही सात वाजता आली. तत्पूर्वी सहाच्या दरम्याने चेतनने सल्ला घ्यायला फोन केला. बंदिनी वहिनीला आयसीयूतून बाहेर आणत होते. त्यामुळे जनरल वार्डात ठेवायचे की स्पेशल रूम घ्यायची , हे तो विचारत होता. एरव्ही प्रश्न नव्हता , पण कोरोनामुळे रिस्क न घेता स्पेशल रूमच घ्या म्हणून चेतनला व बंदूलाही सांगितलं. त्यानंतर मी झाडांना पाणी देवून सौ. घरी आली तेव्हा दिवाबत्तीॆकडे वळलो होतो. नंतर टीव्ही लावला. तेवढयात लंबूवहिनी नको नको सांगूनही कपडे धुवायला आलीच.  आज पंधरा मिनिटे लवकर म्हणजे सव्वा आठलाच जेवलो. म्हणजे पचायलाही बरं , शिवाय हल्लीच्या घटना बघता , काय घडलेच , तर आजही दहा अकरा वाजायचे आणि झोपायला बारा वाजायचे. म्हणजे मग झोपेचेही बारा वाजलेच म्हणून समजायचे. तरी आम्ही दोघं आपापल्या मोबाईलमध्ये व समोर टीव्ही चालूच असलेला , अशा अवस्थेत अकरा तरी वाजवलेच. नशीब मी भानावर आलो. मग हिला भानावर आणलं , म्हणून अकरा वाजता का होईना , झोपता तरी आलं.
 ( क्रमश: )

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दिवस

मागे - पुढे

03.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा दहावा दिवस सुरू झाला. कालचा दिवस आणि  अर्ध्याहून अधिक रात्र त्रासाचीच झाल्याने सकाळी साडेसात वाजता उठलो. नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. आज मी उशिराच बाहेर आलो. त्यामुळे संत्या दिसला नाही. पण बीनाची आई कचरा टाकायला आली ती दिसली. साडेसात वाजता दररोजप्रमाणे  शेजारच्या देवळात नेहमीप्रमाणे घंटानाद होत होता. गंमत म्हणजे आज सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत बीना सोडल्यास कोणीही आमच्याकडे आले नाही. बीनाने मासे दिले आणि  मी आता चांगली वागते. परवापासूनच मी चांगली झाले. आईशी पण चांगली वागते , असे सांगून ती निघून गेली. तेव्हाच मला शंका आली की ही काही तरी घोळ करणार. विशेषत: ' परवापासूनच ' हा शब्द मला खटकला. पण त्याचा संबंध लक्षात येईना म्हणून मी अधिक विचार करणे सोडून दिले.  त्यानंतर  नेहमीची सगळी कामे व्यवस्थित पार पडली. एक वाजता लंबूवहिनी आली. ती आली की काही तरी बातमी घेऊनच येते. गावात भाजीवाला आलाय हे सांगून सौ.ने दिलेली पिशवी व पैसे घेऊन भर उन्हातून ती भाजी घेऊन पण आली. ती गेली आणि बीनाची आई आली. तोपर्यंत दीड वाजला. जेवून घ्या असे सांगून ती गेली .  आज दुपारी जेवल्यानंतर मी न झोपता लेखन , वाचन केले.  आम्ही चहा घेतला. साडेपाच वाजता मुलाला फोन केला , तर त्याच्या अशोकमामाने साडेचारला फोन करून त्याची झोपमोड केली व तेव्हापासून तो जागाच होता. मुलाचा फोन संपला आणि लंबूवहिनी आली ती भयंकर बातमी घेवूनच. शहरात कोरोनाग्रस्त आढळला म्हणून ! लंबूवहिनी हिच्याबरोबर बोलत बसली आणि मी झाडे शिंपायला खालच्या कंपाऊंडमध्ये गेलो. तिथे भावाने कलम , दोन माड व आम्हीही एक माड लावला आहे. मी झाडांना पाणी लावून आलो आणि लंबूवहिनी परत येते म्हणून सांगून गेली. ये पण कसली बातमी आणू नकोस असे मी तिला म्हटले. ती बराच काळ आली नाही , पण टीव्हीने शहरात आणखी एक कोरोनाग्रस्त सापडल्याची बातमी दिली. दुपार पर्यंत एकही रूग्ण नसल्याच्या सगळयांच्या आनंदावर विरजण पडले. आम्ही बातम्या बघतच होतो तेवढयात बीनाची आई आली आणि पुढच्या पायरीवर बसून हमसाहुमशी रडूच लागली. आम्ही दोघांनी तिला शांत करीत आत आणून कोचावर बसवली . काय झाले असे विचारताच ती रडत रडत बीना तिला बघूनच घेत नाहीय , टीव्ही लावायला देत नाही , मीच आता तोंड घेवून जाते , हयाचा काय तो फैसला करा, मला आता हे रोज रोज सहन करणे शक्य नाही , असे सांगत असतांनाच बीना आली. मी तिला विचारले , सकाळीच तर तू सांगितलेस की तू आता आईशी चांगली वागतेस म्हणून , मग आता हे काय आहे , आता आईने तुझ्यासाठी आणखी काय करायला पाहिजे , तू असा तिचा छळ का करतेस , असे विचारताच ती फणका-याने बडबडत घरी निघून गेली. तिच्यापाठोपाठ हया दोघी गेल्या . तेवढयात खालच्या गेटवर विकी आला त्याच्याशी मी बोलत उभा राहिलो. पाचच मिनिटात बीनाचा मोठयाने आरडाओरडा ऐकू आला. पाठोपाठ मिलेशचा फोन आला की काका जरा घरी या. मी घर बंद केले आणि मागच्या बाजूला असलेल्या त्याच्या घरी गेलो. तिथे आसपासची माणसे गोळा झाली होती. बीना थरथरत होती. मी लगेच मिलेशला तिला बाईकवरून डाॅक्टरकडे न्यायला सांगितले . सोबतीला आणखी एक बाईकस्वार पाठवला. डाॅक्टरनी तिला तपासले , इंजेक्शन , गोळया दिल्या तसा मिलेश तिला घेवून आला. ती आता सावरली होती . मग मी तिची समजूत काढली आणि दूध प्यायला लावले. दूध पिवून ती झोपली तसे मिलेश व त्याच्या आईला जेवायला सांगितले व त्यांनी ताटे घेतल्याचे बघून आम्ही सारे आपापल्या घरी गेलो.

           घरी आलो तर पावणे दहा वाजलेले. ही जेवण वाढायला गेली तर कधी नाही ते भातात मुंग्या भरलेल्या. ती त्या घालवू लागली. पण त्या भरपूरच होत्या. मी तिला तो भात खाऊयाच नको , सरळ दूध बिस्कीटे खाऊन झोपूया , असे सांगितले. एरव्ही मी तो भात खाल्लाही असता . माझी आज्जी तर सांगायची की मुंग्या खाल्याने नजर सुधरते ! पण गेले काही दिवस घडत असलेले प्रसंग लक्षात घेतले आणि दूध बिस्कीटांचा निर्णय घेवून तो अंमलातही आणला.  त्यानंतर अंगणात शतपावली झाली. अंगणात हिला चिकू पडलेला दिसला. तो उचलून ती मला कुणीही खाल्ला नसल्याचे व चांगला असल्याचे दाखवू लागली. पण पुन्हा एकदा घडत असलेल्या प्रसंगांची आठवण देवून तो वरच्या बाजूच्या आमराईत फेकायला लावला. वटवाघळाने तो आणलेला होता. म्हटले निसर्गातून आलेला आहे तो निसर्गातच जावूदे , गाईगुरे खावूदे . कोरोनापासून घडणा-या घटनांचा क्रम पाहता मी काळजी घेतली होती. खालच्या घरातील लाईट घालवून व घर बंद करून आलो. हिने कुठली तरी मालिका लावली होती व ती मोबाईलवर यू टयूबचे व्हिडीओही पाहण्यात दंग झाली होती.  मग मी हे लेखन पूर्ण करत बसलो. नंतर टीव्हीवर आण्णा नाईक सिरियलचे मागचे भाग सुरू झाले. पावणेबारा झाले तरी ही हटत नव्हती. शेवटी झोपायला तिने बारा वाजवलेच  ! ( क्रमश: )

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

कोरोना लाॅक डाऊनचा भारतातील 9 वा दिवस

मागे - पुढे

02.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा नववा दिवस सुरू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. आज मी थोडा लवकरच बाहेर आलो. त्यामुळे संत्या फुले काढतांना दिसला नाही. पण काही मध्यम आकाराच्या चिमण्या मात्र चिवचिव करत होत्या. हया एक दोन वर्षापूर्वीच आमच्या भागात आल्या आहेत. त्या नेहमीच्या छोटया चिमण्यांपेक्षा आकाराने थोडया मोठयाच आहेत . त्या एकदम झुंडीने येतात आणि चिवचिव करत राहतात. त्यांच्या प्रवेशाने नैसर्गिक बदलांचे संकेत मिळूही शकतील . निरिक्षण करीत राहिले पाहिजे, असा विचार करीतच मी पुढे आलो.  पुढचा दरवाजा उघडून अंगणात आलो. शेजारच्या देवळात नेहमीप्रमाणे पिळणकर भावजी पुजा-याबरोबर बोलत होते. त्यांना भरपूर बोलायला आवडते.  खालच्या रस्त्यावरून खाडीच्या दिशेने एक स्त्री कालवी किंवा मुळे काढायला चालली होती.  दररोजसारखी मी  तुळशीची दहा पाने काढून आणली. धुतली आणि पाच पाने मी खाल्ली , पाच हिला दिली. ग्लासभर गरम पाणी प्यालो.  आज पाणी थोडे उशिरा आले. मग आम्ही पाणी भरले.  साफसफाई केली. नाश्ता करतानाच मला पडलेले स्वप्नं मी सौ. ला सांगितले. आमचा मुलगा कुठे तरी दुस-या मजल्यावरच्या खोलीच्या मध्यभागी फूलपँट आणि इनशर्ट घालून रात्रीचा डाराडूर झोपलेला असतो. त्याच्या पायाखालील भिंतीकडे एकाखाली एक असे सावंतवाडीतले मोहन सावंत व अनंत दळवी हे झोपलेले असतात. नऊ वाजता मी त्या खोलीत झोपायला जातो तर मोहन सावंत न बोलता गडबडीने उठून मुलाच्या बाजूला जाऊन झोपतात. मी त्यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर झोपतो. आम्ही काहीच बोलत नाही. असे ते स्वप्नं होते. मला बरेचदा माझ्या स्वप्नांची अनुभुती आलेली आहे. त्यामुळे काही तरी घडणार या शंकेने व्याकुळ होतो. नाश्त्यानंतर आम्ही टीव्ही लावला. बातम्या फारशा आशादायक नाहीत. अजूनही परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आलेली नाही. प्रशासन , पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्र यांवरचा ताण वाढतो आहे.  अजूनही लोक जीवनानश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करतात. काही तर चक्क गर्दी जमवणारे कार्यक्रम करतात. अवैध प्रवास करतात.  अजूनही अशा जीवघेण्या गोष्टी केल्या जातात , कोरोना मेंदूवर पण परिणाम करतो की काय , असा प्रश्न पडतो ! परदेशांची अवस्था दररोज टीव्हीवर बघूनही , स्वत:चा आणि दुस-याचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न लोक का करतात , हेच कळत नाही.  अजूनही आपण गंभीर होत नाही. एकोप्याने वागत नाही, घरातच रहात नाही, देशाशीच प्रतारणा करतो, याचे वाईट वाटते. वेळ काय , आपण करतो काय !  मी टीव्ही बंद केला. व्हॉट्सॲप पाहिले. आज रामनवमी ! त्यानिमित्ताने इकडून आलेले संदेश तिकडे पाठवले.  तोच लंबूवहिनी रामायण बघा म्हणून सांगत आली. टीव्ही लावून लावून कंटाळलोय म्हणून तिला सांगितले . खरंच , जे रामायण आता घडते आहे , त्याने टीव्ही बघणेही कठीण होते आहे .

          आंघोळ करून देवपूजा केली आणि अध्याय वाचायला सुरुवात केली.  आजही सलग दोन्ही अध्यायांचे वाचन झाले. कोणीही आले नाही.  कोरोना नष्ट व्हावा म्हणून पुन्हा एकदा  प्रार्थना केली.  दुपारी जेवून वामकुक्षी करायला गेलो . अर्धा तास झाला नाही तोच रूपाचा फोन आला. तिला ताक ढवळण्यासाठी रवी पाहिजे होती. पाच मिनीटांनी ती आलीच . हिने रवी दिली पण रूपा अर्धा तास बोलत बसली. मी आतल्या खोलीत पडूनच राहिलो. रूपा गेली तेव्हा चार वाजले. ही अर्धा तास झोपली तोवर बीनाची आई गच्चीवरच्या मिरच्या काढायला आली. तिने हाक मारली तसे आम्ही  उठलोच. आज ती चहा पिवूनच आली असल्याने चहा नको म्हणाली व मिरच्या घेवून तिकडूनच घरी गेली. आम्ही चहा घेतला. नंतर बाहेर हवेवर येवून जरा बसलो. तेवढयात लंबूवहिनी आली . ती बोलत बसली. सहाला पाच मिनिटे असतांना मुलाला फोन करायचे माझ्या लक्षात आले. मी सौ.ला फोन करायला सांगितले .  हा टर्नींग पाँईंट होता. मुलगा फोन उचलत नाही , हे बघून सौ. पँनिक झाली. ती फोन करत सुटली. मी फोन करीत राहिलो. अनेक वेळा फोन करूनही तो फोन उचलत नव्हता. सौ.चं प्रेशर वाढू लागलं. अखेर फ्लॅटमालकाच्या मुलाला , कांतीला फोन केला. तो बिचारा धावत गेला. त्याने फोन चालूच ठेवला होता. त्यामुळे तो वाजवीत असलेल्या दाराच्या कडीचा आवाज मला ऐकू येत होता. पण आतून प्रतिसादच नव्हता. हे बघून मला सकाळचे स्वप्नं पुन्हा पुन्हा आठवू लागले. सौ.लाही तेच स्मरत असावे. तिचे प्रेशर वाढल्याचे बघून माझेही प्रेशर वाढू लागले. मी कांतीला पुन्हा थोडया वेळाने परत कडी वाजवायला सांगितले. दहा मिनिटांनी पुन्हा कांती गेला , पण आतून प्रतिसादच नव्हता. मुलगा फोनही उचलत नव्हता. मी कांतीला पुन्हा साडेसहाला बघायला सांगितले. लंबूवहिनी होती म्हणून जरा धीर होता. बीनाही धीर देवून गेली. सौ. सतत फोन करीतच होती. तिकडे बीनाने सांगितल्याने मिलेशही फोन करीत होता.  काय करावे सुचत नव्हते. सगळे देव आठवून झाले , आणि पाच मिनिटांनी कुठला तरी देव पावला . मुलाने फोन उचलला . सौ.ने त्याला लगेच संगणक चालू करून कामाला सुरूवात करायला सांगितले. दुपारी तो उशिरा झोपला होता आणि उशिरानेच त्याला जाग आली होती. मी लगेच कांतीला फोन करून मुलगा उठल्याचे सांगितले. त्याने कसलीही काळजी करू नका म्हणून सांगितले , हे ऐकून खूप बरे वाटले. कांती माझ्या मुलाच्याच वयाचा आहे व तोही इंजिनियर आहे. कांती , त्याचा भाऊ व आई वडील हेच आमचा एकमेव आधार आहेत आता !

          लंबूवहिनी सांगत होती.  मीतला शहरातल्या दवाखान्यात घेवून गेले आहेत. हे सांगून लंबूवहिनी गेली. मीतला आयसीयूत ठेवल्याचे नंतर त्याच्या आईने सांगितले. त्यावेळी सत्त्याही आला होता. सोबत मीतची पत्नी , भाऊ व मित्र आहेत. सौ.ने मीतच्या पत्नीला फोन लावला तेव्हा रिपोर्टस आलेले होते व डाॅक्टर येऊन ते बघणार होते. मीतच्या पत्नीसोबत अन्य कुणी महिला कर्फ्यूमुळे जाऊ शकली नव्हती. पण उर्मिलाचे गावातले घर पाडून नवीन बांधत असल्याने उर्मिलाचे कुटुंब शहरात नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये रहात आहेत . सौ.ने उर्मिलाला फोन करून मीतच्या पत्नीला धीर द्यायला हॉस्पिटलला जायला सांगितले. सुदैवाने हॉस्पिटल उर्मिला राहते तिथून पाच मिनिटांच्याच अंतरावर आहे. ती तिच्या मुलीसह पाच मिनीटात गेलीही. तिने तिथून फोनही केला. मीतच्या मानेतील शीर दबली आहे. प्रेशरही वाढले आहे. सात दिवस औषधे देणार व त्यानंतर आँपरेशनबाबत निर्णय घेणार , असे ती म्हणाली.  उर्मिला अशा प्रसंगी नेहमीच पुढे असते. त्याबाबत तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ! उर्मिलाचा फोन सुरू असतांना बीनाची आई आमच्याकडे आली.  तीही बोलत बसली.  हे सगळं घडत असतांना तिकडे  वर्षभर रागाने माहेरी राहिलेली विरेशची धाकटी सून नांदायला आल्याने त्यांच्याकडे काही जण तावातावाने बोलत होते. ते लवकरच शांत झाले. काही तरी निर्णय झाला असावा.

           आधी मुलाचा तो प्रसंग आणि आता ही मीतची हकीगत. याने जेवायची ईच्छाच मेली. अखेर जेवण तयार असूनही न जेवता दूध पिऊन मोकळे झालो. आजचा दिवसच तणावपूर्ण गेला. त्यातच गावच्या स्मशानभूमीजवळ एकाचा मृतदेह सापडला असून मृतदेहाजवळ एक दुचाकी उभी आहे, अद्याप या व्यक्तीची ओळख पटली नसून तपास सुरू अाहे अशी बातमी व्हॉट्सॲप वरून प्राप्त झाली. या सगळयाच प्रसंगांचा परिणाम आमच्यावर झाला. रात्री 01 ते 02 या वेळात तर टेंशनमुळे मी पोटात गॅस झाल्याने इस्त्री गरम करून पोट शेकवत होतो. त्यातच नाईट वाॅकही केले. माझ्यासोबत सौ.ही फिरत होती.  रात्री तीननंतर कधी तरी झोप लागली.  ( क्रमश: )

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

The Third World #तिसरे जग

02.04.2020

ह्या विश्वात अदृष्य शक्ती आहे आणि ती सदैव कार्यरत आहे ! जगातल्या काही जणांच्या उघडया डोळ्यांसमोर ही शक्ती काही काळ तरळतेही. ती कोणत्या स्वरूपात काय करीत आहे हे क्षणभर वा थोडा अधिक काळ दिसतेही. इतरांना स्वप्नांत ती दिसते. मात्र त्या स्वप्नांचे अर्थ समजू शकत नाहीत किंवा समजले तरी घटना घडून गेल्यानंतर समजतात. अनेकदा  उघडया डोळयांनी ही शक्ती दिसत नाही पण तिच्या हालचालींचे परिणाम दिसतात. आतले विश्व , बाहेरचे दृष्य विश्व आणि अदृष्य शक्तींचे हे तिसरे विश्व आहे ! नक्कीच , कोणी तरी आहे तिथे  ! adrushya shakti हया लिंकला क्लिक केल्यास माझ्या दुस-या ब्लाॅगवर मी पूर्वी लिहिलेले लेखन वाचावयास मिळेल.

सद्या कोरोनाचा कहर जगात सुरू आहे. हया काळातही हे अदृष्य विश्व कार्यरत आहे. काळाने सफाईचे काम हाती घेतले आहे. काही  अदृष्य शक्तींनी गूढ मानवी स्वरूपात काम करण्यास सुरूवातही केली आहे. लवकरच कोरोनाचाच नव्हे तर मानवी दुष्टपणाचाही नाश होईल , ही आशा करूया ! 

बुधवार, १ एप्रिल, २०२०

कोरोना लाॅक डाऊन

मागे - पुढे

01.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा आठवा दिवस सुरू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. तेव्हा संत्या जास्वंदीची फुले काढत होता.  पुढचा दरवाजा उघडला . खिडक्या उघडल्या. सूर्याची सुंदर , सोनेरी , कोवळी किरणे घरात आली आणि मी बाहेर अंगणात गेलो. पुढे खालच्या रस्त्यावर किरकोळ रहदारी होती. मी  तुळशीची दहा पाने काढून आणली. धुतली आणि पाच पाने मी खाल्ली , पाच हिला दिली. ग्लासभर गरम पाणी प्यालो. पाणी पीतापीताच मनात बंदूचा विचार येतोे न येतो तोच पाणी आले हे सांगण्यासाठी त्याची हाकच आली.  मनाचे हे असे टयुनिंग कसे काय असते कुणास ठाऊक ! बरेचदा हे अनुभवास येते .  मग आम्ही पाणी भरले.  मी दोन्ही परसातली झाडे शिंपली.  साफसफाई केली. तेवढयात लंबूवहिनी आली. तिच्यासह आम्ही नाश्ता केला.  गेले काही महिने ती आमची धुणीभांडी करीत होती. तिची खूप मदत अजूनही होतेच. पण आजपासून कामाला येवू नकोस , अशीच बसायला ये , असे सौ. ने तिला मनाविरूध्द सांगितले. आम्ही दोघेच असल्याने आता फारसे काही कामच नाही आणि आम्हांला घरातल्या घरात व्यायाम हवा असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. शिवाय संचारबंदी उठली की आम्ही कधीही पुण्याला जाऊ.  कितीही वाईट वाटले तरी काही निर्णय वेळीच घेणे चांगले असते. यानंतर आम्ही टीव्ही लावला. बातम्या फारशा आशादायक नाहीत. मात्र परिस्थिती थोडी नियंत्रणाखाली आहे. प्रशासन , पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्र यांवरचा ताण वाढतो आहे.  अजूनही लोक गर्दी करतात. घरात बसायची सवय नसलेल्यांचे तर फार हाल होत आहेत. पण स्वत:चा आणि दुस-याचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न लोक का करतात , हेच कळत नाही. आपण देशाला  तिस-या टप्प्यात जाणूनबुजून का ढकलत आहोत , हेच कळत नाही. सारे एकाच नावेत असतांना एकमेकांकडे बोटे दाखवण्याची संधी एकमेकांना का देत आहोत ?  समाजमाध्यमांमध्ये हीन दर्जाची भाषा का वापरली जात आहे ? यावरही नियंत्रण येणे गरजेेचे आहे. अजूनही आपण गंभीर होत नाही. एकोप्याने वागत नाही, याचे वाईट वाटते. वेळ काय , आपण करतो काय ! रत्नागिरीतील केसही निगेटीव्ह आल्याने कोणीही कोरोनाबाधित नाही. पण देशात अजूनही भीती आहेच आणि  परदेशात तर अजूनही कहर आहे. तिकडे अमेरिकेने चीनला मागे टाकले आहे. बळींची संख्या वाढते आहे. आता जास्त वेळ बातम्या बघवत नाहीत. मी टीव्ही बंद केला. व्हॉट्सॲप पाहिले. विकास ढोकणे सर व वसुंधरा जाधव मॅडमनी मी त्यांच्या रचनामंध्ये सुचवलेले बदल त्यांना आवडल्याचे आवर्जून मेसेज केले आहेत. मी वेळ दिला म्हणून  त्यांनी माझे आभार मानले आहेत. खरे तर मीच त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला समर्थ समजून माझ्यावर केवढा विश्वास ठेवला ! मी हया दोघांकडून चांगल्या मराठी गझलांची निश्चितच अपेक्षा ठेवून आहे. व्हॉट्सॲपवर कालपासूनच मेसेज येत होते की एक तारीखला समाजमाध्यमांवर एप्रिल फूल केल्यास वा अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणून. हे उत्तम झाले ! अत्यंत योग्य निर्णय ! असाच निर्णय फेसबूकवर जी हीन भाषा वापरली जाते त्याबाबत तातडीने घेतला जावा ! तसेच मोबाईलवरून व्देष पसरवणा-यांनाही बंदी घातली जावी. माणसांनी माणसांचा व्देष करण्याची ही वेळ नाही. खरे तर कधीत नसते ! इकडे माणूसकी हरते आहे , रडते आहे ! आक्रंदते आहे ! माणसांनाच त्याचे काही नसेल तर करायचे काय , हा खरा प्रश्न आहे. विचारांनी डोके भणाणून जाते आहे....

          विचार करण्यापेक्षा आंघोळ करून देवपूजा केली आणि अध्याय वाचायला सुरुवात केली.  आज सलग दोन्ही अध्यायांचे वाचन झाले. कोणीही आले नाही.  कोरोना नष्ट व्हावा म्हणून प्रार्थना केली. दुपारी जेवून वामकुक्षी करावी म्हणून पुढचा दरवाजा बंद करायला गेलो तितक्यात गेट उघडून लंबूवहिनी धावत आली . काही मुले गरम होते म्हणून भर दुपारी डोंगरावर वारा खायला गेली होती. त्यात हिचा एक नातूही होता. त्याला फोन लावून द्या म्हणून ती सांगायला आली होती. गावात पोलीसांना राऊंड मारावे लागत आहेत. मी फोन लावून दिला . फोन झाल्यावर तिने दुसरी बातमी दिली. परवा आमच्याकडे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. तेव्हा मीतला सांगूनही त्यांने तोंडाला रूमालवगैरे बांधला नव्हता. आता त्याला वांत्या होत आहेत , म्हणून गावातल्या दवाखान्यात घेवून गेले आहेत. पण थोडया वेळाने मीत परत आला. त्याला संध्याकाळी पुन्हा तपासून बहुतेक सलाईन लावतील असे चौकशी करता समजले. लंबूवहिनी गेली तसे आम्ही वामकुक्षीकडे वळलो. पाच वाजता बीनाच्या आईने पुढच्या दरवाज्यात येवून हाक मारली तसे आम्ही उठलो. मग आम्ही चहा घेतला आणि त्या दोघी नेहमीप्रमाणे गप्पा मारू लागल्या.  मी काही काळ टीव्ही लावला. बंद केला आणि खालच्या परसात झाडांना पाणी द्यायला गेलो. नंतर लेखन केले. अंगणात फे-या मारल्या. मीतला पुन्हा दवाखान्यात नेले गेले आणि सलाईन लावण्यात आल्याचे समजले. तोवर संध्याकाळ झाली. दिवेलागणीची वेळ झाली. दोन्ही घरात दिवाबत्ती केली. का कुणास ठाऊक पण आज प्रार्थना करतांना मन जरा शांत होते ! मला ते जाणवले. बहुतेक कोरोना समस्येवर उपाय लवकरच सापडणार असावा किंवा कोरोना नष्ट होण्याची जगात कुठे तरी या क्षणाला सुरूवात झाली असावी किंवा कोरोना हे नेमके काय प्रकरण आहे , ते तरी जगापुढे उघड होणार असेल. काही तरी चांगले व्होवो , असे म्हणत मी बातम्या पाहू लागलो. पण दुर्दैवाने अजूनही मुंबईत हजारोंच्या संख्येने भाज्या , अन्नधान्य , गँस सिलेंडर्स यासाठी लोक गर्दी करत आहेत. काही तर कार्यक्रमात सहभागी होवून देशभर फिरत आहेत . हे लोक प्रवास कसा करू शकतात ? सर्वत्रच लोक एवढे बेअक्कल का होत आहेत, हेच कळत नाही !

           जेवायला जाणार एवढयात बीना आली. ती तिच्या शेजारी काही तरी झाले ते सांगून गेली. मग आम्ही जेवलो . नंतर अंगणात शतपावली करत असतानाच लंबूवहिनीचा धाकटा नातू आला . तो बोलत बसला. त्याची कहाणी पुढे कधी तरी सांगेनच. सामान्यांच्या जीवनाचीही प्रत्येकाची एक कहाणी असते. साडे दहा वाजले तशी मी खालच्या घरातली लाईट बंद करून ते कुलूपबंद करून आलो. अकरा वाजत आले आहेत. चला , झोपतो आता. शुभ रात्री.

तळटीप : रात्रीत काही घडले तर ते उद्या सांगतो. ( क्रमश:)

कोरोना पुढे चालू

मागे - पुढे

31.03.2020
       
आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा सातवा दिवस सुरू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. मग आठ वाजता नळाला पाणी आले. ते आम्ही भरले.  झाडे शिंपली. मागच्या बाजूला बंदूकडचेही पाणी भरत होते. नंतर नाश्ता केला.  नंतर आम्ही टीव्ही लावला आणि बातम्या बघत होतो एवढ्यात मागच्या बंदूचा मुलगा बीनाची आई काकीला बोलवतेय असा निरोप घेवून आला. ही तिकडे गेली. परत आल्यावर कळले की बीना मिलेशशी भांडत होती. आता थांबलीय. म्हटले बरे झाले.  एवढयात मुलाचा फोन आला. बोलणे झाले. सद्या हेच संपर्काचे साधन आहे. मग आंघोळ करून देवपूजा केली आणि अध्याय वाचायला सुरुवात केली.  मी दररोज दोन अध्याय वाचतो. लहानपणी शिवलीलामृत , अकरावा अध्याय आणि काही वर्षांनी काहीच नाही , नंतर तीस चाळीस वर्षांनी मालवणला असतांना गणपतीस्तोत्र , पुन्हा खंड अशा अवस्थेतून अनेक वर्षांनी पुन्हा अध्याय वाचन सुरू झाले आहे.  पहिला अध्याय संपत येत असतांनाच शेजारच्या देवळातले पुजारी केटीसह आले.  मग वाचन बंद करून मी त्यांना सामोरा गेलो. पुजा-याला गावाला जायचे होते. त्यांची आई आजारी होती. कोरोना लाॅक्ड डाऊनमुळे त्यांना तिकडे जाता येत नव्हते. त्यांना पोलीसांच्या परवानगीचा अाॅनलाईन अर्ज भरायचा होता. अर्ज भरून सबमिट केल्यावर तो सबमिट होईना . म्हणून मी अर्जाचे शिर्षक पाहिले त्यावरून कळले की तो अर्ज सेवापुरवठादारांसाठी होता. मी त्यांना तसे सांगितले तसे ते गेले.  त्यानंतर मी लगेच अध्याय वाचन केले. थोडा सोशल मिडियावर हिंडलो. तोपर्यंत दुपार झाली. मग अर्थातच जेवण . पण आधी मुलगा जेवला की नाही ते पाहण्यासाठी मुलाला फोन केला . रात्रभर जागरण असल्याने तो नुकताच उठला होता आणि त्याने दूध बिस्कीटे खाल्ली होती ! सकाळचा नाश्ता दुपारच्या जेवणाच्या वेळी झाला होता. आम्ही तिकडे असतो तर हे शेडयूल बदलले असते. पण आता काहीच करता येत नाही. आम्ही अपराधी मनाने चार घास पोटात ढकलले. कोरोना संपल्याशिवाय तिकडे जाता येणार नाही , हे निश्चित आहे . 

            आज जरा वामकुक्षी लांबली. पाच वाजता पुढचा दरवाजा उघडला तोच गेट उघडून बीनाची आई आली. सौ. तिच्याबरोबर बोलू लागली . थोडया वेळाने चहा घेतला. त्या दोघी पुन्हा गप्पा मारू लागल्या. बीनाचे सद्या बिनसलेले असल्याने त्यांना बिनधास्त राहता येत नाहीय. वेळेवर लग्नं जमलं तर निम्मे प्राँब्लेम्स कमी होतात. लवकरच तिचे लग्न ठरो. मध्येच लंबूबाई दूध , बिस्कीटे आणि टोस्ट पाकीट घेवून आली. ही आपली मास्क लावून फिरत असते आणि गावातल्या दुकानातून जीवनावश्यक वस्तू आणून देत असते . साठीनंतरही ती एवढी अॅक्टीव्ह कशी हे कोडेच आहे ! सगळीकडे मदतीसाठी धावत असते. तीही त्यांच्या गप्पात सामील झाली . मी जाधव मँडमच्या गझलकडे वळलो. खरे तर कालच वळायला हवे होते , पण कालची परिस्थिती तुम्ही वाचलीच असेल . त्यांच्या रचनेत फारसा बदल करायची आवश्यकता नव्हती.  अपेक्षेप्रमाणेच त्यांनी गझलचा हात लवकर पकडला आहे. चांगल्या गझलांची त्यांच्याकडून निश्चितच अपेक्षा आहे . त्यांची ती गझल गुणगुणण्यात संध्याकाळ झाली. दोन्ही घरात देवबत्ती केली. जगातून कोरोना हद्दपार होऊदे , म्हणून प्रार्थना केली. आज नेहमीचे जेवण घेण्याऐवजी रव्याची पेज पिणेच आम्ही पसंत केले. मुलगा तिकडे काय खात असेल, कसा असेल,  या विचाराने मनावर ताण येतो. अशा वेळी पोट हलके असणे महत्वाचे आहे . नाही तर काल रात्रीसारखा प्रकार होतो. आता आम्हांलाही तब्ब्येतीची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जाधव मँडमना व्हॉट्सॲपवर गझल पाठवली. नंतर अाम्ही अंगणात तासभर फिरलो. दरम्याने पोलीस गाडी गावातून येवून गेली. साडे दहाला आम्ही झोपायला आलो. सुरूवातीला झोप लागली . पण रात्री पाऊण वाजता जाग आली. मग थोडे नेट पाहिले आणि परत अंथरूणावर पडलो. कधीतरी झोप लागली. पण पुन्हा पहाटे पाच आणि मग नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता जाग आलीच. तसा मी उठलोच. ( क्रमश:)