शनिवार, ४ एप्रिल, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दिवस

मागे - पुढे

03.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा दहावा दिवस सुरू झाला. कालचा दिवस आणि  अर्ध्याहून अधिक रात्र त्रासाचीच झाल्याने सकाळी साडेसात वाजता उठलो. नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. आज मी उशिराच बाहेर आलो. त्यामुळे संत्या दिसला नाही. पण बीनाची आई कचरा टाकायला आली ती दिसली. साडेसात वाजता दररोजप्रमाणे  शेजारच्या देवळात नेहमीप्रमाणे घंटानाद होत होता. गंमत म्हणजे आज सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत बीना सोडल्यास कोणीही आमच्याकडे आले नाही. बीनाने मासे दिले आणि  मी आता चांगली वागते. परवापासूनच मी चांगली झाले. आईशी पण चांगली वागते , असे सांगून ती निघून गेली. तेव्हाच मला शंका आली की ही काही तरी घोळ करणार. विशेषत: ' परवापासूनच ' हा शब्द मला खटकला. पण त्याचा संबंध लक्षात येईना म्हणून मी अधिक विचार करणे सोडून दिले.  त्यानंतर  नेहमीची सगळी कामे व्यवस्थित पार पडली. एक वाजता लंबूवहिनी आली. ती आली की काही तरी बातमी घेऊनच येते. गावात भाजीवाला आलाय हे सांगून सौ.ने दिलेली पिशवी व पैसे घेऊन भर उन्हातून ती भाजी घेऊन पण आली. ती गेली आणि बीनाची आई आली. तोपर्यंत दीड वाजला. जेवून घ्या असे सांगून ती गेली .  आज दुपारी जेवल्यानंतर मी न झोपता लेखन , वाचन केले.  आम्ही चहा घेतला. साडेपाच वाजता मुलाला फोन केला , तर त्याच्या अशोकमामाने साडेचारला फोन करून त्याची झोपमोड केली व तेव्हापासून तो जागाच होता. मुलाचा फोन संपला आणि लंबूवहिनी आली ती भयंकर बातमी घेवूनच. शहरात कोरोनाग्रस्त आढळला म्हणून ! लंबूवहिनी हिच्याबरोबर बोलत बसली आणि मी झाडे शिंपायला खालच्या कंपाऊंडमध्ये गेलो. तिथे भावाने कलम , दोन माड व आम्हीही एक माड लावला आहे. मी झाडांना पाणी लावून आलो आणि लंबूवहिनी परत येते म्हणून सांगून गेली. ये पण कसली बातमी आणू नकोस असे मी तिला म्हटले. ती बराच काळ आली नाही , पण टीव्हीने शहरात आणखी एक कोरोनाग्रस्त सापडल्याची बातमी दिली. दुपार पर्यंत एकही रूग्ण नसल्याच्या सगळयांच्या आनंदावर विरजण पडले. आम्ही बातम्या बघतच होतो तेवढयात बीनाची आई आली आणि पुढच्या पायरीवर बसून हमसाहुमशी रडूच लागली. आम्ही दोघांनी तिला शांत करीत आत आणून कोचावर बसवली . काय झाले असे विचारताच ती रडत रडत बीना तिला बघूनच घेत नाहीय , टीव्ही लावायला देत नाही , मीच आता तोंड घेवून जाते , हयाचा काय तो फैसला करा, मला आता हे रोज रोज सहन करणे शक्य नाही , असे सांगत असतांनाच बीना आली. मी तिला विचारले , सकाळीच तर तू सांगितलेस की तू आता आईशी चांगली वागतेस म्हणून , मग आता हे काय आहे , आता आईने तुझ्यासाठी आणखी काय करायला पाहिजे , तू असा तिचा छळ का करतेस , असे विचारताच ती फणका-याने बडबडत घरी निघून गेली. तिच्यापाठोपाठ हया दोघी गेल्या . तेवढयात खालच्या गेटवर विकी आला त्याच्याशी मी बोलत उभा राहिलो. पाचच मिनिटात बीनाचा मोठयाने आरडाओरडा ऐकू आला. पाठोपाठ मिलेशचा फोन आला की काका जरा घरी या. मी घर बंद केले आणि मागच्या बाजूला असलेल्या त्याच्या घरी गेलो. तिथे आसपासची माणसे गोळा झाली होती. बीना थरथरत होती. मी लगेच मिलेशला तिला बाईकवरून डाॅक्टरकडे न्यायला सांगितले . सोबतीला आणखी एक बाईकस्वार पाठवला. डाॅक्टरनी तिला तपासले , इंजेक्शन , गोळया दिल्या तसा मिलेश तिला घेवून आला. ती आता सावरली होती . मग मी तिची समजूत काढली आणि दूध प्यायला लावले. दूध पिवून ती झोपली तसे मिलेश व त्याच्या आईला जेवायला सांगितले व त्यांनी ताटे घेतल्याचे बघून आम्ही सारे आपापल्या घरी गेलो.

           घरी आलो तर पावणे दहा वाजलेले. ही जेवण वाढायला गेली तर कधी नाही ते भातात मुंग्या भरलेल्या. ती त्या घालवू लागली. पण त्या भरपूरच होत्या. मी तिला तो भात खाऊयाच नको , सरळ दूध बिस्कीटे खाऊन झोपूया , असे सांगितले. एरव्ही मी तो भात खाल्लाही असता . माझी आज्जी तर सांगायची की मुंग्या खाल्याने नजर सुधरते ! पण गेले काही दिवस घडत असलेले प्रसंग लक्षात घेतले आणि दूध बिस्कीटांचा निर्णय घेवून तो अंमलातही आणला.  त्यानंतर अंगणात शतपावली झाली. अंगणात हिला चिकू पडलेला दिसला. तो उचलून ती मला कुणीही खाल्ला नसल्याचे व चांगला असल्याचे दाखवू लागली. पण पुन्हा एकदा घडत असलेल्या प्रसंगांची आठवण देवून तो वरच्या बाजूच्या आमराईत फेकायला लावला. वटवाघळाने तो आणलेला होता. म्हटले निसर्गातून आलेला आहे तो निसर्गातच जावूदे , गाईगुरे खावूदे . कोरोनापासून घडणा-या घटनांचा क्रम पाहता मी काळजी घेतली होती. खालच्या घरातील लाईट घालवून व घर बंद करून आलो. हिने कुठली तरी मालिका लावली होती व ती मोबाईलवर यू टयूबचे व्हिडीओही पाहण्यात दंग झाली होती.  मग मी हे लेखन पूर्ण करत बसलो. नंतर टीव्हीवर आण्णा नाईक सिरियलचे मागचे भाग सुरू झाले. पावणेबारा झाले तरी ही हटत नव्हती. शेवटी झोपायला तिने बारा वाजवलेच  ! ( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: