रविवार, ५ एप्रिल, २०२०

कोरोना लाॅक डाऊनचा अकरावा दिवस

मागे - पुढे

04.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा अकरावा दिवस सुरू झाला तोच मुळी मिलेशच्या फोनने. सहा वाजले तसा मी बेडवरून उठतच होतो तोच फोन वाजला. सकाळीच फोन वाजला की वाईट बातमीची शंका येतेच ! मी पटकन जवळच्याच टेबलावरचा फोन घेतला. काय झाले रे , विचारताच तो म्हणाला काकीला लगेच पाठवा. बंदिनी काकीला आकडया येतायत. मी हिला पाठवलं व घराला कुलूप करून पाठोपाठच बंदूकडे गेलो. तिथे स्नेहाही होतीच. स्नेहा दवाखान्यात नोकरी करते व ती आता बरीच अनुभवीही आहे. शिवाय अशा वेळी ती धावतेही. मिलेशची आईही होतीच. संत्या , चेतन व मिलेशही होताच. बंदिनी वहिनीला कालचा बीनाचा आरडाओरडा भारी पडला असावा. गाडीवरून पडून पूर्वी तिच्या डोक्याला दुखापत झाली होती.  काल रात्री बीनाच्या टेंशनमध्ये तिची नेहमीची गोळी चुकली असावी. त्यामुळे आकडी येत असणार हे उघड होतं . वेळ घालवून चालणार नव्हतं . बंदूला विश्वासला फोन करून गाडी घेवूनच ये म्हणून सांगायला सांगितलं . चेतनला दवाखान्यात फोन लावायला सांगितलं. मी स्वत: मेट्रनशी बोललो. आम्ही पेशंट घेवून येतोय म्हणून सांगितलं. मेट्रननी डाॅक्टरांशी संपर्क साधला व परत फोन करून पेशंटला आणा म्हणून सांगितलं. विश्वास येताच बंदिनी वहिनीला गाडीतून बाप बेटे घेवून गेले .  सौ. ने बंटीला सोबत जायला सांगितलं. तो बिचारा झोपेतूनच  उठला आणि गेला. कोरोनाच्या संचारबंदीमुळे आणखी कोणी जाऊही शकत नव्हते. अर्ध्या तासातच चेतनने फोन करून त्याच्या आईला दवाखान्यात अॅडमीट केल्याचं सांगितलं. तासाभराने मी बंदूला फोन केला तेव्हा बंदिनी वहिनी व्यवस्थित हातपाय हलवू लागली होती.

           तो फोन संपला आणि हिच्या फोनवर उर्मिलाचा फोन आला. तिने मीतला आयसीयूतून बाहेर आणल्याची चांगली बातमी दिली. मीतला अॅडमीट केल्याचंही सौ. नेच प्रथम उर्मिलाला सांगून दवाखान्यात पाठवलं होतं. तेव्हापासून उर्मिलाची खूप मदत मीतची पत्नी व भावाला होत होती.  फोनवर उर्मिलाने त्याच दवाखान्यात राजूलाही डोळयाच्या समस्येमुळे आणले होते , हेही सांगितले. मीत आणि बंदिनी वहिनी यांच्या दवाखान्यांमध्ये पाचच मिनिटांचे अंतर होते. हीने बंदिनी वहिनीची बातमी उर्मिलाला सकाळीच दिली होती. त्यामुळे मीतच्या बायकोसह ती बंदिनी वहिनीलाही बघायला गेली होती , हेही तिने हिला सांगितले. म्हणजे एकाच वेळी गावातले आमचे तीन शेजारी उर्मिला हया आमच्या आणखी एका सख्ख्या शेजारणीला भेटले होते , जे खरे तर गावात उर्मिलाचेही शेजारी आहेत. पण सद्या ती शहरात राहते आहे. पण ती गावात असती तरी ती धावलीच असती. आजही मी जेवणानंतर वामकुक्षी केली नाही. दुपारी बंदू त्याच्या घरी आला होता. आंघोळ करून पुन्हा दवाखान्यात जातांना तो आमच्याकडे आला व बायको बरी आहे म्हणून सांगून गेला. त्याने प्रवासाकरिताचा परवानगी पासही दाखवला आणि सोबतची सँनिटायजरची बाटलीही दाखवली. माझी बायको संध्याकाळी पाच वाजता बीनाकडे आणि तिथून स्नेहाकडे गेली. अंतर पाच मिनिटांचे पण गप्पा दोन तासांच्या. त्यामुळे ही सात वाजता आली. तत्पूर्वी सहाच्या दरम्याने चेतनने सल्ला घ्यायला फोन केला. बंदिनी वहिनीला आयसीयूतून बाहेर आणत होते. त्यामुळे जनरल वार्डात ठेवायचे की स्पेशल रूम घ्यायची , हे तो विचारत होता. एरव्ही प्रश्न नव्हता , पण कोरोनामुळे रिस्क न घेता स्पेशल रूमच घ्या म्हणून चेतनला व बंदूलाही सांगितलं. त्यानंतर मी झाडांना पाणी देवून सौ. घरी आली तेव्हा दिवाबत्तीॆकडे वळलो होतो. नंतर टीव्ही लावला. तेवढयात लंबूवहिनी नको नको सांगूनही कपडे धुवायला आलीच.  आज पंधरा मिनिटे लवकर म्हणजे सव्वा आठलाच जेवलो. म्हणजे पचायलाही बरं , शिवाय हल्लीच्या घटना बघता , काय घडलेच , तर आजही दहा अकरा वाजायचे आणि झोपायला बारा वाजायचे. म्हणजे मग झोपेचेही बारा वाजलेच म्हणून समजायचे. तरी आम्ही दोघं आपापल्या मोबाईलमध्ये व समोर टीव्ही चालूच असलेला , अशा अवस्थेत अकरा तरी वाजवलेच. नशीब मी भानावर आलो. मग हिला भानावर आणलं , म्हणून अकरा वाजता का होईना , झोपता तरी आलं.
 ( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: