मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

Thirteenth day of corona locked down

मागे - पुढे

06.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा तेरावा दिवस सुरू झाला . आज सोमवार . वीज जाण्याचा वार. सद्या संपर्काचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल. तो रिचार्ज हवाच. मी दोघांचे मोबाईल चार्जिंगला लावले. लाईट आहे तोपर्यंत मागच्या दारी जाऊन पंपाने पाण्याची व्यवस्था केली. पुढे आलो तर पुढे खालच्या बाजूला अजिबात मासळीबाजार नव्हता. काल रविवार असल्याने दोन तीन तास चालला होता. सोमवार असल्याने ब-याचजणांचा उपवास . रस्त्यावर कोणीच नव्हते. मी परिसर स्वच्छता केली . तेवढयात मेसेंजरवर केरकळ सरांचा संदेश आला. मग तर त्यांनी फोनच केला. बराच वेळ बोलत होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सरांची निर्णय क्षमता, मोठमोठी कामे शांतपणे हातावेगळी करण्याची हातोटी आठवली.  कोणाच्याही सांगण्यात न येता परिस्थिती हाताळण्याचे कसब हे त्यांचे सर्वात मोठे कसब होय. त्यामुळे त्यांचे कान भरणे कुणालाही कधीच शक्य झाले नाही.  माझ्यासाठी ते वरदान ठरले. मी अधिक मन लाऊन व मोकळया वातावरणात काम करू शकलो , ते केवळ सरांमुळे ! ते इकडे असतांनाचे सुखी दिवस आठवले. जुने सहकारी आठवले. सरांना आणि मलाही एकमेकांशी बोलून खूप हलके वाटले. खरे तर , केरकळ सरांची बदली झाल्यानंतर आलेले ए.एम. जाधव सर आणि खुरसाडे सर यांच्या हाताखाली काम करतांनाही मला असेच चांगले वातावरण मिळाले. हे बोलत बोलत सौ.सोबत नाश्ता केला. टीव्ही लावून बसलो. दुपार झाली. बंदू बंदिनी वहिनीला डिस्चार्ज मिळाल्याने दवाखान्यातून घरी घेऊन आला, हे त्यांने लगेच मला फोन करून सांगितले. मीही त्याला पहिली सर्वांनी डेटाँलने आंघोळ करा , वहिनीला जेवायला द्या , विश्रांती घ्यायला लावा व नंतर बाकीच्यांनी जेवून विश्रांती घ्या, संघ्याकाळी बघायला येतो, म्हणून सांगितले.

            मग आमचेही जेवण झाले. वाचन, लेखन पार पडले. काही मिनिटांच्या वामकुक्षीसाठी जरा पहुडलो. मध्येच जागेपणीच मिटल्या डोळयांसमोर दृष्य तरळले. मी कुठल्या तरी घनदाट जंगलात आहे. बहुधा हिमालयाकडील भाग असावा. मी उभा असतो तिथून दहाबारा फुटावर एका प्रचंड वृक्षाभोवती चौकोनी पार बांधलेला आहे . वृक्ष पाराच्या मध्यभागी आहे व त्यालगतच त्याच्याभोवती वर्तुळाकार माती दिसते आहे.  त्या पाराला पातळ  फिकट हिरवा पोपटी रंग दिलेला आहे व तो आता जुना झालेला आहे.  त्या पारावर एक खूप उंच , धिप्पाड माणसासारखा दिसणारा प्राणी पूर्ण नग्नावस्थेत बसलेला असून त्याला मोठया साखळदंडांनी बांधलेले आहे. तो हातांची हालचाल करायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या डोक्यावर आणि सर्वांगावरच मोठे केस आहेत. त्याच्या नजरेत काहीतरी दिसते आहे. तो मला काही तरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. कदाचित सुटका करण्यासाठी असेल. पण मला ते समजत नाहीय. आजूबाजुच्या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर त्याचा मातेरी रंग आणि अंगावरचे केस उठून दिसत आहेत.  मला त्याच्या मागच्या हिरवळीचा एक कोपरा खूप कोवळा व ताजा टवटवीत असलेला दिसला आणि त्याचक्षणी माझी लिंक तुटली. मी पुन्हा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करूनही कनेक्ट होऊ शकलो नाही. अखेर तो प्रयत्न सोडून देऊन मी उठलोच. सौ.ला मी हे नंतर चहा पीता पीता सांगितले. माझ्या नजरेसमोर अगदी जागेपणीही अशी दृष्ये कधी कधी तरळतात आणि त्यांचा सहसा अर्थ लागत नाही पण कालांतराने प्रत्यंतर येते, हे तिला माहीत असूनही या वेळचे दृष्य तिला विचित्र वाटले. आपला पती यतीशी थेट कनेक्ट झाला होता की काय अशी शंका तिला आली आणि कोरोनाच्या उगमाशी त्या प्राण्याचा काही संबंध असावा काय अशी शंका मला आली.

          थोडया वेळाने बीनाची आई आली. मग लंबूवहिनीही आली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. लंबूवहिनी म्हणजे पेटते वार्तापत्र.  तिकडे शहरातही काही तणाव होता म्हणे. जमाव जमला होता म्हणे. पण पोलीसांनी नियंत्रणात आणला. हे खूप चांगले झाले. सर्वांनाच सद्बुध्दी येवो.  पावणेसहा वाजता सौ. ने मुलाला फोन केला. नंतर आम्ही बंदिनी वहिनी व बीनालाही बघायला गेलो. तिकडून येऊन मी झाडांना पाणी शेंदले . मग गच्चीवर फिरलो. तोवर संध्याकाळ झाली. शेजारच्या मंदिरात घंटानाद सुरू झाला . मग खाली येऊन दिवाबत्ती केली. लंबूवहिनी पुन्हा आली व  तिच्यासाठी ठेवलेला डाळभात घेऊन गेली. ती आता आमच्याकडे कामाला नसली तरी काही असेल तर तिला आम्ही फोन करून बोलावून ते देतोच. टाकून देण्यापेक्षा कुणाच्या तरी मुखी लागलेलं बरं असतं. कष्टकरी माणसाच्या मनात नको तो व्देष भरवण्यापेक्षा अन्न भरवणे हाच खरा धर्म आहे. तिकडे पुण्यात मुलगा वेळेवर आणि व्यवस्थित जेवत नाही ही आमची व्यथा आहे. सौ. ने त्याला फोन करून याबाबत पुन्हा विनंत्या केल्या. सूचना केल्या . सततच्या सूचना ऐकून तो टाळया वाजवू लागताच माझे प्रेशर वाढले. मी फोन घेतला आणि त्याला झापला. प्रसंग काय , तुला ती काळजीपोटी सांगतेय तर तू टाळया कसल्या वाजवतोस ? वेळ काय , तू करतोस काय ! स्वत:ची काळजी घेतलीस तर आम्हीही इथे व्यवस्थित राहू. जरा विचार कर व मेहेरबानी करून स्वत:ला फीट राख. माझा पारा चढल्याने सौ. ने फोन काढून घेतला व ती मुलाशी बोलू लागली. मी माझा राग स्वत:च शांत करू लागलो. अंगणात फिरू लागलो. सद्य परिस्थितीमुळे मी हल्ली काहीसा पटकन भडकतो व माझा नेहमीचा हसरा स्वभाव हरवून बसतो, हे विचार करता करता माझ्या लक्षात आले. मग मी शांत झालो आणि आपण पुन्हा मिश्कील झाले पाहिजे हेही कळले. मला जरा बरे वाटले. सौ. बहुधा थकली होती. साडेदहा वाजले तशी ती बेडरूमकडे वळली. सर्व दारेखिडक्यांचा बंदोबस्त करून मीही तिकडे गेलो. सौ. लवकर झोपली , पण मला झोप येईना. मुंबईची परिस्थिती बिघडत चालली आहे. एक तर जागा अपुरी व सगळेच घरात . माणसांना जागा नाही तिथे वस्तू साठवून तरी कुठे ठेवणार ? मग खरेदीला बाहेर पडावेच लागत असेल.  शिवाय हे उन्हाळ्याचे दिवस.  अंगाची लाही लाही होत असेल. बाहेर वा-यावर फिरणेही जिवाशी  गाठ ! आता बरेचसे चाकरमानी गावी यायला बघतील. काय होईल गावांचे ? गावात वैद्यकीय सेवा सक्षम नसतात. या परिस्थितीत तर कठीणच ! बारा वाजेपर्यंत नेटवर होतो. मग मीही झोपलो.

    ( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: