शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

कोरोना लाॅक डाऊनचा भारतातील 9 वा दिवस

मागे - पुढे

02.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा नववा दिवस सुरू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. आज मी थोडा लवकरच बाहेर आलो. त्यामुळे संत्या फुले काढतांना दिसला नाही. पण काही मध्यम आकाराच्या चिमण्या मात्र चिवचिव करत होत्या. हया एक दोन वर्षापूर्वीच आमच्या भागात आल्या आहेत. त्या नेहमीच्या छोटया चिमण्यांपेक्षा आकाराने थोडया मोठयाच आहेत . त्या एकदम झुंडीने येतात आणि चिवचिव करत राहतात. त्यांच्या प्रवेशाने नैसर्गिक बदलांचे संकेत मिळूही शकतील . निरिक्षण करीत राहिले पाहिजे, असा विचार करीतच मी पुढे आलो.  पुढचा दरवाजा उघडून अंगणात आलो. शेजारच्या देवळात नेहमीप्रमाणे पिळणकर भावजी पुजा-याबरोबर बोलत होते. त्यांना भरपूर बोलायला आवडते.  खालच्या रस्त्यावरून खाडीच्या दिशेने एक स्त्री कालवी किंवा मुळे काढायला चालली होती.  दररोजसारखी मी  तुळशीची दहा पाने काढून आणली. धुतली आणि पाच पाने मी खाल्ली , पाच हिला दिली. ग्लासभर गरम पाणी प्यालो.  आज पाणी थोडे उशिरा आले. मग आम्ही पाणी भरले.  साफसफाई केली. नाश्ता करतानाच मला पडलेले स्वप्नं मी सौ. ला सांगितले. आमचा मुलगा कुठे तरी दुस-या मजल्यावरच्या खोलीच्या मध्यभागी फूलपँट आणि इनशर्ट घालून रात्रीचा डाराडूर झोपलेला असतो. त्याच्या पायाखालील भिंतीकडे एकाखाली एक असे सावंतवाडीतले मोहन सावंत व अनंत दळवी हे झोपलेले असतात. नऊ वाजता मी त्या खोलीत झोपायला जातो तर मोहन सावंत न बोलता गडबडीने उठून मुलाच्या बाजूला जाऊन झोपतात. मी त्यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर झोपतो. आम्ही काहीच बोलत नाही. असे ते स्वप्नं होते. मला बरेचदा माझ्या स्वप्नांची अनुभुती आलेली आहे. त्यामुळे काही तरी घडणार या शंकेने व्याकुळ होतो. नाश्त्यानंतर आम्ही टीव्ही लावला. बातम्या फारशा आशादायक नाहीत. अजूनही परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आलेली नाही. प्रशासन , पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्र यांवरचा ताण वाढतो आहे.  अजूनही लोक जीवनानश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करतात. काही तर चक्क गर्दी जमवणारे कार्यक्रम करतात. अवैध प्रवास करतात.  अजूनही अशा जीवघेण्या गोष्टी केल्या जातात , कोरोना मेंदूवर पण परिणाम करतो की काय , असा प्रश्न पडतो ! परदेशांची अवस्था दररोज टीव्हीवर बघूनही , स्वत:चा आणि दुस-याचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न लोक का करतात , हेच कळत नाही.  अजूनही आपण गंभीर होत नाही. एकोप्याने वागत नाही, घरातच रहात नाही, देशाशीच प्रतारणा करतो, याचे वाईट वाटते. वेळ काय , आपण करतो काय !  मी टीव्ही बंद केला. व्हॉट्सॲप पाहिले. आज रामनवमी ! त्यानिमित्ताने इकडून आलेले संदेश तिकडे पाठवले.  तोच लंबूवहिनी रामायण बघा म्हणून सांगत आली. टीव्ही लावून लावून कंटाळलोय म्हणून तिला सांगितले . खरंच , जे रामायण आता घडते आहे , त्याने टीव्ही बघणेही कठीण होते आहे .

          आंघोळ करून देवपूजा केली आणि अध्याय वाचायला सुरुवात केली.  आजही सलग दोन्ही अध्यायांचे वाचन झाले. कोणीही आले नाही.  कोरोना नष्ट व्हावा म्हणून पुन्हा एकदा  प्रार्थना केली.  दुपारी जेवून वामकुक्षी करायला गेलो . अर्धा तास झाला नाही तोच रूपाचा फोन आला. तिला ताक ढवळण्यासाठी रवी पाहिजे होती. पाच मिनीटांनी ती आलीच . हिने रवी दिली पण रूपा अर्धा तास बोलत बसली. मी आतल्या खोलीत पडूनच राहिलो. रूपा गेली तेव्हा चार वाजले. ही अर्धा तास झोपली तोवर बीनाची आई गच्चीवरच्या मिरच्या काढायला आली. तिने हाक मारली तसे आम्ही  उठलोच. आज ती चहा पिवूनच आली असल्याने चहा नको म्हणाली व मिरच्या घेवून तिकडूनच घरी गेली. आम्ही चहा घेतला. नंतर बाहेर हवेवर येवून जरा बसलो. तेवढयात लंबूवहिनी आली . ती बोलत बसली. सहाला पाच मिनिटे असतांना मुलाला फोन करायचे माझ्या लक्षात आले. मी सौ.ला फोन करायला सांगितले .  हा टर्नींग पाँईंट होता. मुलगा फोन उचलत नाही , हे बघून सौ. पँनिक झाली. ती फोन करत सुटली. मी फोन करीत राहिलो. अनेक वेळा फोन करूनही तो फोन उचलत नव्हता. सौ.चं प्रेशर वाढू लागलं. अखेर फ्लॅटमालकाच्या मुलाला , कांतीला फोन केला. तो बिचारा धावत गेला. त्याने फोन चालूच ठेवला होता. त्यामुळे तो वाजवीत असलेल्या दाराच्या कडीचा आवाज मला ऐकू येत होता. पण आतून प्रतिसादच नव्हता. हे बघून मला सकाळचे स्वप्नं पुन्हा पुन्हा आठवू लागले. सौ.लाही तेच स्मरत असावे. तिचे प्रेशर वाढल्याचे बघून माझेही प्रेशर वाढू लागले. मी कांतीला पुन्हा थोडया वेळाने परत कडी वाजवायला सांगितले. दहा मिनिटांनी पुन्हा कांती गेला , पण आतून प्रतिसादच नव्हता. मुलगा फोनही उचलत नव्हता. मी कांतीला पुन्हा साडेसहाला बघायला सांगितले. लंबूवहिनी होती म्हणून जरा धीर होता. बीनाही धीर देवून गेली. सौ. सतत फोन करीतच होती. तिकडे बीनाने सांगितल्याने मिलेशही फोन करीत होता.  काय करावे सुचत नव्हते. सगळे देव आठवून झाले , आणि पाच मिनिटांनी कुठला तरी देव पावला . मुलाने फोन उचलला . सौ.ने त्याला लगेच संगणक चालू करून कामाला सुरूवात करायला सांगितले. दुपारी तो उशिरा झोपला होता आणि उशिरानेच त्याला जाग आली होती. मी लगेच कांतीला फोन करून मुलगा उठल्याचे सांगितले. त्याने कसलीही काळजी करू नका म्हणून सांगितले , हे ऐकून खूप बरे वाटले. कांती माझ्या मुलाच्याच वयाचा आहे व तोही इंजिनियर आहे. कांती , त्याचा भाऊ व आई वडील हेच आमचा एकमेव आधार आहेत आता !

          लंबूवहिनी सांगत होती.  मीतला शहरातल्या दवाखान्यात घेवून गेले आहेत. हे सांगून लंबूवहिनी गेली. मीतला आयसीयूत ठेवल्याचे नंतर त्याच्या आईने सांगितले. त्यावेळी सत्त्याही आला होता. सोबत मीतची पत्नी , भाऊ व मित्र आहेत. सौ.ने मीतच्या पत्नीला फोन लावला तेव्हा रिपोर्टस आलेले होते व डाॅक्टर येऊन ते बघणार होते. मीतच्या पत्नीसोबत अन्य कुणी महिला कर्फ्यूमुळे जाऊ शकली नव्हती. पण उर्मिलाचे गावातले घर पाडून नवीन बांधत असल्याने उर्मिलाचे कुटुंब शहरात नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये रहात आहेत . सौ.ने उर्मिलाला फोन करून मीतच्या पत्नीला धीर द्यायला हॉस्पिटलला जायला सांगितले. सुदैवाने हॉस्पिटल उर्मिला राहते तिथून पाच मिनिटांच्याच अंतरावर आहे. ती तिच्या मुलीसह पाच मिनीटात गेलीही. तिने तिथून फोनही केला. मीतच्या मानेतील शीर दबली आहे. प्रेशरही वाढले आहे. सात दिवस औषधे देणार व त्यानंतर आँपरेशनबाबत निर्णय घेणार , असे ती म्हणाली.  उर्मिला अशा प्रसंगी नेहमीच पुढे असते. त्याबाबत तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ! उर्मिलाचा फोन सुरू असतांना बीनाची आई आमच्याकडे आली.  तीही बोलत बसली.  हे सगळं घडत असतांना तिकडे  वर्षभर रागाने माहेरी राहिलेली विरेशची धाकटी सून नांदायला आल्याने त्यांच्याकडे काही जण तावातावाने बोलत होते. ते लवकरच शांत झाले. काही तरी निर्णय झाला असावा.

           आधी मुलाचा तो प्रसंग आणि आता ही मीतची हकीगत. याने जेवायची ईच्छाच मेली. अखेर जेवण तयार असूनही न जेवता दूध पिऊन मोकळे झालो. आजचा दिवसच तणावपूर्ण गेला. त्यातच गावच्या स्मशानभूमीजवळ एकाचा मृतदेह सापडला असून मृतदेहाजवळ एक दुचाकी उभी आहे, अद्याप या व्यक्तीची ओळख पटली नसून तपास सुरू अाहे अशी बातमी व्हॉट्सॲप वरून प्राप्त झाली. या सगळयाच प्रसंगांचा परिणाम आमच्यावर झाला. रात्री 01 ते 02 या वेळात तर टेंशनमुळे मी पोटात गॅस झाल्याने इस्त्री गरम करून पोट शेकवत होतो. त्यातच नाईट वाॅकही केले. माझ्यासोबत सौ.ही फिरत होती.  रात्री तीननंतर कधी तरी झोप लागली.  ( क्रमश: )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: