बुधवार, १ एप्रिल, २०२०

कोरोना पुढे चालू

मागे - पुढे

31.03.2020
       
आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा सातवा दिवस सुरू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. मग आठ वाजता नळाला पाणी आले. ते आम्ही भरले.  झाडे शिंपली. मागच्या बाजूला बंदूकडचेही पाणी भरत होते. नंतर नाश्ता केला.  नंतर आम्ही टीव्ही लावला आणि बातम्या बघत होतो एवढ्यात मागच्या बंदूचा मुलगा बीनाची आई काकीला बोलवतेय असा निरोप घेवून आला. ही तिकडे गेली. परत आल्यावर कळले की बीना मिलेशशी भांडत होती. आता थांबलीय. म्हटले बरे झाले.  एवढयात मुलाचा फोन आला. बोलणे झाले. सद्या हेच संपर्काचे साधन आहे. मग आंघोळ करून देवपूजा केली आणि अध्याय वाचायला सुरुवात केली.  मी दररोज दोन अध्याय वाचतो. लहानपणी शिवलीलामृत , अकरावा अध्याय आणि काही वर्षांनी काहीच नाही , नंतर तीस चाळीस वर्षांनी मालवणला असतांना गणपतीस्तोत्र , पुन्हा खंड अशा अवस्थेतून अनेक वर्षांनी पुन्हा अध्याय वाचन सुरू झाले आहे.  पहिला अध्याय संपत येत असतांनाच शेजारच्या देवळातले पुजारी केटीसह आले.  मग वाचन बंद करून मी त्यांना सामोरा गेलो. पुजा-याला गावाला जायचे होते. त्यांची आई आजारी होती. कोरोना लाॅक्ड डाऊनमुळे त्यांना तिकडे जाता येत नव्हते. त्यांना पोलीसांच्या परवानगीचा अाॅनलाईन अर्ज भरायचा होता. अर्ज भरून सबमिट केल्यावर तो सबमिट होईना . म्हणून मी अर्जाचे शिर्षक पाहिले त्यावरून कळले की तो अर्ज सेवापुरवठादारांसाठी होता. मी त्यांना तसे सांगितले तसे ते गेले.  त्यानंतर मी लगेच अध्याय वाचन केले. थोडा सोशल मिडियावर हिंडलो. तोपर्यंत दुपार झाली. मग अर्थातच जेवण . पण आधी मुलगा जेवला की नाही ते पाहण्यासाठी मुलाला फोन केला . रात्रभर जागरण असल्याने तो नुकताच उठला होता आणि त्याने दूध बिस्कीटे खाल्ली होती ! सकाळचा नाश्ता दुपारच्या जेवणाच्या वेळी झाला होता. आम्ही तिकडे असतो तर हे शेडयूल बदलले असते. पण आता काहीच करता येत नाही. आम्ही अपराधी मनाने चार घास पोटात ढकलले. कोरोना संपल्याशिवाय तिकडे जाता येणार नाही , हे निश्चित आहे . 

            आज जरा वामकुक्षी लांबली. पाच वाजता पुढचा दरवाजा उघडला तोच गेट उघडून बीनाची आई आली. सौ. तिच्याबरोबर बोलू लागली . थोडया वेळाने चहा घेतला. त्या दोघी पुन्हा गप्पा मारू लागल्या. बीनाचे सद्या बिनसलेले असल्याने त्यांना बिनधास्त राहता येत नाहीय. वेळेवर लग्नं जमलं तर निम्मे प्राँब्लेम्स कमी होतात. लवकरच तिचे लग्न ठरो. मध्येच लंबूबाई दूध , बिस्कीटे आणि टोस्ट पाकीट घेवून आली. ही आपली मास्क लावून फिरत असते आणि गावातल्या दुकानातून जीवनावश्यक वस्तू आणून देत असते . साठीनंतरही ती एवढी अॅक्टीव्ह कशी हे कोडेच आहे ! सगळीकडे मदतीसाठी धावत असते. तीही त्यांच्या गप्पात सामील झाली . मी जाधव मँडमच्या गझलकडे वळलो. खरे तर कालच वळायला हवे होते , पण कालची परिस्थिती तुम्ही वाचलीच असेल . त्यांच्या रचनेत फारसा बदल करायची आवश्यकता नव्हती.  अपेक्षेप्रमाणेच त्यांनी गझलचा हात लवकर पकडला आहे. चांगल्या गझलांची त्यांच्याकडून निश्चितच अपेक्षा आहे . त्यांची ती गझल गुणगुणण्यात संध्याकाळ झाली. दोन्ही घरात देवबत्ती केली. जगातून कोरोना हद्दपार होऊदे , म्हणून प्रार्थना केली. आज नेहमीचे जेवण घेण्याऐवजी रव्याची पेज पिणेच आम्ही पसंत केले. मुलगा तिकडे काय खात असेल, कसा असेल,  या विचाराने मनावर ताण येतो. अशा वेळी पोट हलके असणे महत्वाचे आहे . नाही तर काल रात्रीसारखा प्रकार होतो. आता आम्हांलाही तब्ब्येतीची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जाधव मँडमना व्हॉट्सॲपवर गझल पाठवली. नंतर अाम्ही अंगणात तासभर फिरलो. दरम्याने पोलीस गाडी गावातून येवून गेली. साडे दहाला आम्ही झोपायला आलो. सुरूवातीला झोप लागली . पण रात्री पाऊण वाजता जाग आली. मग थोडे नेट पाहिले आणि परत अंथरूणावर पडलो. कधीतरी झोप लागली. पण पुन्हा पहाटे पाच आणि मग नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता जाग आलीच. तसा मी उठलोच. ( क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: