बुधवार, १ एप्रिल, २०२०

कोरोना लाॅक डाऊन

मागे - पुढे

01.04.2020
     
          आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा आठवा दिवस सुरू झाला. सकाळी नेहमीप्रमाणे मागचा दरवाजा उघडला आणि वरच्या पाण्याच्या टाकीत पंपाने पाणी लावून घेतले. तेव्हा संत्या जास्वंदीची फुले काढत होता.  पुढचा दरवाजा उघडला . खिडक्या उघडल्या. सूर्याची सुंदर , सोनेरी , कोवळी किरणे घरात आली आणि मी बाहेर अंगणात गेलो. पुढे खालच्या रस्त्यावर किरकोळ रहदारी होती. मी  तुळशीची दहा पाने काढून आणली. धुतली आणि पाच पाने मी खाल्ली , पाच हिला दिली. ग्लासभर गरम पाणी प्यालो. पाणी पीतापीताच मनात बंदूचा विचार येतोे न येतो तोच पाणी आले हे सांगण्यासाठी त्याची हाकच आली.  मनाचे हे असे टयुनिंग कसे काय असते कुणास ठाऊक ! बरेचदा हे अनुभवास येते .  मग आम्ही पाणी भरले.  मी दोन्ही परसातली झाडे शिंपली.  साफसफाई केली. तेवढयात लंबूवहिनी आली. तिच्यासह आम्ही नाश्ता केला.  गेले काही महिने ती आमची धुणीभांडी करीत होती. तिची खूप मदत अजूनही होतेच. पण आजपासून कामाला येवू नकोस , अशीच बसायला ये , असे सौ. ने तिला मनाविरूध्द सांगितले. आम्ही दोघेच असल्याने आता फारसे काही कामच नाही आणि आम्हांला घरातल्या घरात व्यायाम हवा असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. शिवाय संचारबंदी उठली की आम्ही कधीही पुण्याला जाऊ.  कितीही वाईट वाटले तरी काही निर्णय वेळीच घेणे चांगले असते. यानंतर आम्ही टीव्ही लावला. बातम्या फारशा आशादायक नाहीत. मात्र परिस्थिती थोडी नियंत्रणाखाली आहे. प्रशासन , पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्र यांवरचा ताण वाढतो आहे.  अजूनही लोक गर्दी करतात. घरात बसायची सवय नसलेल्यांचे तर फार हाल होत आहेत. पण स्वत:चा आणि दुस-याचाही जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न लोक का करतात , हेच कळत नाही. आपण देशाला  तिस-या टप्प्यात जाणूनबुजून का ढकलत आहोत , हेच कळत नाही. सारे एकाच नावेत असतांना एकमेकांकडे बोटे दाखवण्याची संधी एकमेकांना का देत आहोत ?  समाजमाध्यमांमध्ये हीन दर्जाची भाषा का वापरली जात आहे ? यावरही नियंत्रण येणे गरजेेचे आहे. अजूनही आपण गंभीर होत नाही. एकोप्याने वागत नाही, याचे वाईट वाटते. वेळ काय , आपण करतो काय ! रत्नागिरीतील केसही निगेटीव्ह आल्याने कोणीही कोरोनाबाधित नाही. पण देशात अजूनही भीती आहेच आणि  परदेशात तर अजूनही कहर आहे. तिकडे अमेरिकेने चीनला मागे टाकले आहे. बळींची संख्या वाढते आहे. आता जास्त वेळ बातम्या बघवत नाहीत. मी टीव्ही बंद केला. व्हॉट्सॲप पाहिले. विकास ढोकणे सर व वसुंधरा जाधव मॅडमनी मी त्यांच्या रचनामंध्ये सुचवलेले बदल त्यांना आवडल्याचे आवर्जून मेसेज केले आहेत. मी वेळ दिला म्हणून  त्यांनी माझे आभार मानले आहेत. खरे तर मीच त्यांचे आभार मानतो. त्यांनी मला समर्थ समजून माझ्यावर केवढा विश्वास ठेवला ! मी हया दोघांकडून चांगल्या मराठी गझलांची निश्चितच अपेक्षा ठेवून आहे. व्हॉट्सॲपवर कालपासूनच मेसेज येत होते की एक तारीखला समाजमाध्यमांवर एप्रिल फूल केल्यास वा अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणून. हे उत्तम झाले ! अत्यंत योग्य निर्णय ! असाच निर्णय फेसबूकवर जी हीन भाषा वापरली जाते त्याबाबत तातडीने घेतला जावा ! तसेच मोबाईलवरून व्देष पसरवणा-यांनाही बंदी घातली जावी. माणसांनी माणसांचा व्देष करण्याची ही वेळ नाही. खरे तर कधीत नसते ! इकडे माणूसकी हरते आहे , रडते आहे ! आक्रंदते आहे ! माणसांनाच त्याचे काही नसेल तर करायचे काय , हा खरा प्रश्न आहे. विचारांनी डोके भणाणून जाते आहे....

          विचार करण्यापेक्षा आंघोळ करून देवपूजा केली आणि अध्याय वाचायला सुरुवात केली.  आज सलग दोन्ही अध्यायांचे वाचन झाले. कोणीही आले नाही.  कोरोना नष्ट व्हावा म्हणून प्रार्थना केली. दुपारी जेवून वामकुक्षी करावी म्हणून पुढचा दरवाजा बंद करायला गेलो तितक्यात गेट उघडून लंबूवहिनी धावत आली . काही मुले गरम होते म्हणून भर दुपारी डोंगरावर वारा खायला गेली होती. त्यात हिचा एक नातूही होता. त्याला फोन लावून द्या म्हणून ती सांगायला आली होती. गावात पोलीसांना राऊंड मारावे लागत आहेत. मी फोन लावून दिला . फोन झाल्यावर तिने दुसरी बातमी दिली. परवा आमच्याकडे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. तेव्हा मीतला सांगूनही त्यांने तोंडाला रूमालवगैरे बांधला नव्हता. आता त्याला वांत्या होत आहेत , म्हणून गावातल्या दवाखान्यात घेवून गेले आहेत. पण थोडया वेळाने मीत परत आला. त्याला संध्याकाळी पुन्हा तपासून बहुतेक सलाईन लावतील असे चौकशी करता समजले. लंबूवहिनी गेली तसे आम्ही वामकुक्षीकडे वळलो. पाच वाजता बीनाच्या आईने पुढच्या दरवाज्यात येवून हाक मारली तसे आम्ही उठलो. मग आम्ही चहा घेतला आणि त्या दोघी नेहमीप्रमाणे गप्पा मारू लागल्या.  मी काही काळ टीव्ही लावला. बंद केला आणि खालच्या परसात झाडांना पाणी द्यायला गेलो. नंतर लेखन केले. अंगणात फे-या मारल्या. मीतला पुन्हा दवाखान्यात नेले गेले आणि सलाईन लावण्यात आल्याचे समजले. तोवर संध्याकाळ झाली. दिवेलागणीची वेळ झाली. दोन्ही घरात दिवाबत्ती केली. का कुणास ठाऊक पण आज प्रार्थना करतांना मन जरा शांत होते ! मला ते जाणवले. बहुतेक कोरोना समस्येवर उपाय लवकरच सापडणार असावा किंवा कोरोना नष्ट होण्याची जगात कुठे तरी या क्षणाला सुरूवात झाली असावी किंवा कोरोना हे नेमके काय प्रकरण आहे , ते तरी जगापुढे उघड होणार असेल. काही तरी चांगले व्होवो , असे म्हणत मी बातम्या पाहू लागलो. पण दुर्दैवाने अजूनही मुंबईत हजारोंच्या संख्येने भाज्या , अन्नधान्य , गँस सिलेंडर्स यासाठी लोक गर्दी करत आहेत. काही तर कार्यक्रमात सहभागी होवून देशभर फिरत आहेत . हे लोक प्रवास कसा करू शकतात ? सर्वत्रच लोक एवढे बेअक्कल का होत आहेत, हेच कळत नाही !

           जेवायला जाणार एवढयात बीना आली. ती तिच्या शेजारी काही तरी झाले ते सांगून गेली. मग आम्ही जेवलो . नंतर अंगणात शतपावली करत असतानाच लंबूवहिनीचा धाकटा नातू आला . तो बोलत बसला. त्याची कहाणी पुढे कधी तरी सांगेनच. सामान्यांच्या जीवनाचीही प्रत्येकाची एक कहाणी असते. साडे दहा वाजले तशी मी खालच्या घरातली लाईट बंद करून ते कुलूपबंद करून आलो. अकरा वाजत आले आहेत. चला , झोपतो आता. शुभ रात्री.

तळटीप : रात्रीत काही घडले तर ते उद्या सांगतो. ( क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: